देशातील पेट्रोल-डिझेल इंधन, गॅस व खतांची चिंता मिटणार
तेहरान : तब्बल चार आठवड्यांहून अधिक काळ जगाचा श्वास रोखून धरलेला हार्मुझचा सामुद्रधुनी आखात अखेर खुला झाला. इराणने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला कळवले की, “शत्रुत्व न बाळगणार्या देशांच्या जहाजांना हार्मुझमधून सुरक्षित मार्गक्रमण करता येईल; मात्र अट एकच, इराणी अधिकार्यांशी समन्वय साधणे बंधनकारक असेल. या एका घोषणेने जागतिक तेल बाजार हलला आणि भारतात सुटकेचा नि:श्वास सोडला गेला. यामुळे देशातील पेट्रोल-डिझेल इंधन, गॅस आणि खतांची चिंता मिटू शकेल.
दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणवर समन्वित हवाई हल्ले केले, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचाही मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या सेनेने हार्मुझ बंद केला. जहाज वाहतूक एका झटक्यात दैनंदिन 129 वरून अक्षरश: 3-4 वर घसरली, म्हणजे तब्बल 97 टक्के घट! ब्रेंट क्रूडने प्रतिबॅरल 126 डॉलरचा उच्चांक गाठला. 1970 च्या ऊर्जा संकटानंतरचा हा सर्वांत मोठा धक्का ठरला. भारत आपल्या कच्च्या तेलाची 85 टक्के गरज आयातीतून भागवतो आणि त्यातील अध्यार्र्हून अधिक हार्मुझमधूनच येतो. परंतु, भारताची मुत्सद्देगिरी कामी आली. इराणने भारताला ‘मित्र देश’ मानत त्याच्या जहाजांना मार्गक्रमणाची परवानगी दिली. केंद्र सरकारने 24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन केला, 9 मार्च रोजी नैसर्गिक वायू नियंत्रण आदेश जारी केला आणि सांगितले की, पेट्रोल-डिझेल-विमान इंधनाचा पुरवठा पुरेसा आहे.
भारताच्या रशियाकडून सुरू असलेल्या एकतृतीयांश तेल आयातीनेही हार्मुझचा धक्का काही प्रमाणात कमी केला. मात्र, जलमार्ग खुला झाला तरी प्रत्यक्ष वाहतूक अत्यल्प आहे. 400 हून अधिक जहाजे अजूनही बाहेर प्रतीक्षेत उभी आहेत आणि विमा कंपन्या-शिपिंग कंपन्या पुरेसा आत्मविश्वास येण्याची वाट पाहत आहेत. अमेरिकेने आतापर्यंत इराणची 130हून अधिक नौदल जहाजे आणि 44 सुरुंग टाकणारी जहाजे नष्ट केली आहेत. पंतप्रधान मोदींनी इराणी राष्ट्रपती पेझेशकियान यांच्याशी संवाद साधत सागरी मार्गाची सुरक्षितता आणि मुक्त व्यापाराचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
भारतासह पाच देशांना थेट दिलासा
हार्मुझच्या पुनर्उद्घाटनाचा सर्वाधिक फायदा भारत, चीन, तुर्की, पाकिस्तान आणि इराण-मित्रदेश यांना होणार आहे. तेलाच्या किमती प्रतिबॅरल 10 डॉलरने घसरल्या तर ग्राहक खर्चात 2-3 टक्के सुधारणा होईल. शिपिंग सामान्य झाल्यास वार्षिक 50 अब्ज डॉलरची बचत होईल आणि खत स्वस्त झाल्यास अन्नधान्याच्या महागाईत 5 टक्के घट होऊ शकेल. भारतीय शेतकर्यांसाठी हे चिंता मिटविणारे ठरू शकते. जग अजून श्वास रोखूनच आहे. हार्मुझ उघडले खरे, पण पूर्णपणे शांतता येण्यासाठी युद्धविराम हाच खरा
मार्ग आहे.
Hormuz opens; a big relief for India!