संपादकीय

अशाने गावात सुखसमृद्धी नांदेल कशी?

न्हाळी सुट्टीत गावाकडे गेल्यावर गावातील काही वाईट गोष्टी आणि गावाचे ओंगळवाणे रूप मनाला खटकले. गावाकडचे लोक पूर्वीप्रमाणे मायाळू, दयाळू, परोपकारी, समंजस आणि सहनशील राहिले नाहीत.शेजार्‍यांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडणे होत आहेत, रस्त्यावर जागोजागी सांडपाणी तुंबलेले आहे, शेताची वाटणी, धुर्‍याचे भांडण, वैयक्तिक टीकाटिप्पणी इत्यादी कारणांमुळे गावात नेहमी भांडणतंटा सुरू आहे. गावे आता ओसाड, उजाड आणि भकास दिसू लागली आहेत. गावात सगळ्या सुखसुविधा आल्या आहेत, पण गावकर्‍यांनी आदर्श जीवन परंपरा सोडून दिली आहे. सगळे काही शासनाने करावे, सगळे काही ग्रामपंचायतीने करावे, आम्ही साधी काडीसुद्धा इकडची तिकडे करणार नाही अशी लोकांची धारणा बनली आहे.
एक काळ असा होता की, खेडेगावातील सगळे लोक एकसंघपणे गुण्यागोविंदाने नांदत होते. एकत्र येऊन सण-उत्सव, महामानवांचे जयंती सोहळे आणि लेकीबाळींचे लग्न साजरे करायचे. सगळे गावकरी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे आणि एकमेकांच्या मदतीला धावून जायचे. पण कालांतराने गावातील काही हौशी व्यक्ती काही राजकीय पक्षांचे राजकीय कार्यकर्ते बनले आणि गावात राजकीय डावपेचांचा खेळ सुरू झाला. गावात राजकीय गटतट निर्माण झाले आणि गावातील राजकारणाने खेडेगावात अशांतता आणली. जसे राजकीय क्षेत्रात राजकारणी लोकांचे अनेक राजकीय गट निर्माण झाले, तसे गावातील लोकांचे वेगळे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडले आहे.लोक एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. राजकारण बाजूला ठेवून गावाच्या भल्यासाठी, गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यायचे असते हे गावकरी विसरून गेले आहेत.
गावाच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात निर्व्यसनी लोक फार कमी आहेत आणि व्यसनी लोकांची संख्या जास्त वाढली असल्याचे स्पष्ट दिसले. जवळपास सगळेच तरुण, प्रौढ व्यक्ती आणि वयोवृद्ध लोकसुद्धा दारूच्या नशेत झिंगताना दिसले. लहानपणापासून ज्यांना चांगले वागताना, चांगले बोलताना आणि आदर्श जीवन जगताना पाहिले होते ते लोकसुद्धा दारूच्या आहारी गेल्याचे पाहून मनाला खूप वेदना झाल्या. व्यसनी लोक निर्व्यसनी लोकांना नावे ठेवतात. वाईट लोक चांगल्या लोकांची टिंगलटवाळी करतात. यामुळे सामाजिक अशांतता, डोकेदुखी वाढवत आहे. पैसेवाल्या लोकांनी इंग्रजी शाळेच्या मोहापायी आपली मुले-मुली शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवली आहेत. त्यामुळे गावातील शाळा ओस पडत आहेत.ज्या जिल्हा परिषद शाळेने गावातील अनेक पिढ्या घडवल्या, त्या शाळेची अवस्था आता बघवत नाही. शिक्षण अर्ध्यावर सोडून दिलेले तरुण व युवा मंडळ तोंडात गुटखा व हातात मोबाइल यालाच खरे सुखी जीवन समजत आहेत. हाताला मिळेल तो रोजगार दिवसभर करायचा आणि संध्याकाळी दारू पिऊन धिंगाणा घालायचा हे गावात प्रामुख्याने
सुरू आहे.
संध्याकाळ झाली की, दारू पिणारे एकत्र येतात आणि एकमेकांना दारू पाजतात. दारू पिऊन धिंगाणा घालतात, एकमेकांना घाण घाण शिव्या हासडतात. त्यामुळे गावाचे गावपण आता हरवत चालले आहे. गावाची ही बिकट परिस्थिती पाहून गड्या माझा गाव बरा असे म्हणण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. ही दयनीय अवस्था प्रत्येक गावाची मोठी समस्या बनली आहे. हे नेहमी असेच होणार असेल तर गावात शांतता राहणार नाही, गावातील सुखसमृद्धी कायमची
नष्ट होईल.

बबन गुळवे    9545442648

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

13 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

14 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

14 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

14 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

14 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

15 hours ago