– ज्योती जाधव
आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकी हरवत चालली आहे, असे अनेक प्रसंग पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला. एका मोराला गाडीची धडक बसली होती आणि तो रस्त्यावर वेदनेने तडफडत होता. मात्र, त्याला मदत करण्याऐवजी काही लोक त्याची पिसे घेऊन निघून जात होते. हा प्रसंग पाहून मन हेलावून गेले. त्या क्षणी एकच प्रश्न मनात आला…. माणसांना त्या मुक्या जीवाच्या वेदना समजल्या नसतील का? माणुसकी म्हणजे केवळ माणसांशी चांगले वागणे नव्हे, तर प्रत्येक सजीवाच्या दुःखाची जाणीव ठेवणे होय. माणुसकी हीच माणसाची खरी ओळख आहे; ती जपली तरच समाज खर्या अर्थाने प्रगत होईल.
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जग खूप पुढे गेले आहे, पण या प्रगतीच्या शर्यतीत माणूस माणसापासून दूर जाताना दिसत आहे. स्वार्थ, स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात माणुसकी हरवत चालली आहे. त्यामुळे आजच्या काळात माणुसकी ही केवळ एक भावना नसून समाजाची गरज बनली आहे. आज अनेकदा आपण स्वतःच्या गरजा आणि सुखाचा विचार करताना इतरांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतो. गरीब, गरजू, वृद्ध आणि मुक्या प्राण्यांप्रती असलेली संवेदनशीलता कमी होताना दिसते. संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. अशा परिस्थितीत माणुसकीची भावना जपणे आणि प्रत्येकाशी प्रेम, सहानुभूती व आदराने वागणे ही काळाची गरज बनली आहे.माणुसकी म्हणजे केवळ माणसांप्रती दया दाखवणे नव्हे, तर प्रत्येक सजीवाच्या दुःखाची जाणीव ठेवणे होय. दुसर्याच्या दुःखाची जाणीव ठेवणे आणि गरजूंना मदत करणे म्हणजे माणुसकी. स्वार्थ, स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनामुळे माणुसकी कमी होत आहे. माणुसकी ही केवळ माणसांप्रतीच नव्हे, तर प्राणी, पक्षी आणि निसर्गाप्रतीही असायला हवी. मदत करण्यापेक्षा केवळ तमाशा पाहण्याची वृत्ती वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. प्रेम, दया, सहानुभूती आणि आदर या मूल्यांमुळेच समाज अधिक सुंदर बनतो.
बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि वंचित लोकांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे जीवन माणुसकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांना आधार देऊन त्यांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. आज माणुसकी अनेक ठिकाणी हरवत चालली आहे. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर मदतीचा हात पुढे करण्याऐवजी अनेक जण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात किंवा त्याचे चित्रीकरण करण्यात व्यस्त होतात. स्वार्थ, स्पर्धा आणि भौतिक सुखांच्या मागे धावताना माणूस दुसर्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांनाच वृद्धाश्रमात सोडले जात आहे. मुक्या प्राण्यांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्याप्रती असलेली असंवेदनशीलता पाहून मन व्यथित होते. या सर्व घटना पाहिल्यावर खरोखरच माणुसकी हरवत चालली आहे की काय, असा प्रश्न मनात निर्माण होतो. धर्म, जात, भाषा सारे दुय्यम ठरतात, जेव्हा माणुसकीचे हात मदतीसाठी पुढे सरसावतात.
माणसाने कितीही प्रगती केली, कितीही यश संपादन केले, तरी माणुसकीशिवाय त्याचे जीवन अपूर्ण आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या कृतीतून माणुसकी जपली पाहिजे. कारण माणुसकी हीच माणसाची खरी ओळख आहे. या जगातून जाताना माणूस पैसा, संपत्ती किंवा प्रसिद्धी सोबत घेऊन जात नाही; त्याच्यासोबत जातात ती फक्त त्याची सत्कर्मे, माणुसकी आणि त्याने कमावलेले पुण्य. म्हणूनच प्रत्येकाने माणुसकीचा दिवा आपल्या अंतःकरणात सदैव तेवत ठेवला पाहिजे. या जगातून जाताना माणूस रिकाम्या हातानेच जातो. त्याच्यासोबत जातात ती फक्त त्याची सत्कर्मे, माणुसकी आणि त्याने कमावलेले पुण्य. माणुसकीचा दीप अंतरी सदैव तेवत राहू दे, प्रेम, दया, करुणेने हे जग सुंदर होऊ दे. दुसर्यांच्या दुःखात सहभागी होण्याचे बळ मिळू दे, आल्या जन्मी हातून सत्कर्म आणि पुण्य घडू दे. शेवटी इतकेच सांगावेसे वाटते की, या जगात पैसा, संपत्ती आणि प्रसिद्धीइतकेच माणुसकी देखिल श्रेष्ठ आहे. कारण आल्या जन्मी हातून केलेली सत्कर्मे आणि जपलेली माणुसकीच खर्या अर्थाने आपल्यासोबत राहते. कारण… माणुसकी जपणार्यांचे अस्तित्वच जगाला जगण्याची नवी उमेद देते.