– विष्णू वाघ
सध्या अनेक वनस्पतींच्या जाती दुर्लभ होत आहे. काही तर दिसतच नाही. काही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या वनस्पतींचे अधिकाधिक वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. साधारण 1990 च्या काळात घामोळीचे खूप झाडे अस्तित्वात होते. त्याचा पाला शेळ्या मेंढ्या खात. लहान मुले त्या झाडाच्या शेंगा तोडून खायचे. त्यातून मुलांना शरीराला लागणारे घटकदेखील मिळत होते. आता जवळपास ही वनस्पती कुठे दिसतच नाही.
गुंज ही वनस्पतीदेखील सध्या कुठे तरीच दिसते. गुंज ही वनस्पती आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी वापरली जाते. आता एखादी अंत्ययात्रा जेव्हा स्मशानभूमीकडे जाते तेव्हा तांदळाच्या लाह्या टाकतात. मात्र, पंचवीस वर्षांपूर्वी गुंजाच्या लाल बिया काही भागात टाकत होते. त्यातूनच त्या बियांचे त्या भागात रोपे उगवली जायची. त्यामुळे गावकुसात अनेक गुंजांच्या वनस्पती दिसायच्या. काही प्रथा याा निसर्ग संवर्धनासाठी चांगल्या देखील असतात. पूर्वीच्याच काळात सोन्या-चांदीचे वजन करण्यासाठी गुंजाच्या बिया वापरत असत. लाल, पांढर्या, काळ्या अशा प्रकारच्या बिया असणार्या साधारणपणे गुंजांच्या वनस्पती आढळतात.
शेर ही अतिशय कडू असणारी औषधी वनस्पती शेताच्या बांधावर, डोंगराच्या कपारीला दिसायची, तीही आता दिसेनाशी झाली आहे. शोध घेतल्यानंतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी सापडते. पांढरा चिक हा शेराचा बहुगुणी होता. अनेक ठिकाणी औषध म्हणून वापरला जात होता. तर वह्यामध्ये कात्रणे चिकटवण्यासाठीदेखील तो चीक वापरला जात होता. घरात चाचण्या जास्त झाल्या तर शेराचा एक डगळा घरात अडकवला की, सर्व चाचण्या त्याला चिटकून बसत असत. थोडक्यात, कीटकांपासून सुरक्षा करण्यासाठीदेखील शेराचा वापर होत होता.
साबरकांडी ही वनस्पती शेताला, घराला, कुंपणासाठी जास्त प्रमाणात वापरली जाणारी होती. ही वनस्पती औषधी म्हणून पण वापरली जाते. तिचा जास्त वापर औषधासाठी होत होता. ती वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
निवडुंग ही डोंगर भागात येणारी वनस्पती, तिचे लाल बोंडेदेखील औषधी म्हणून वापरले जातात. जवळपास ज्या ज्या वनस्पती आयुर्वेदात वापरल्या जात होत्या त्या त्या वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सर्व निसर्गप्रेमींनी या पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात या दुर्मिळ वनस्पतींचे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. त्यातून सर्वच दुर्मिळ वनस्पतींचे जतन होईल.
हनुमान फळ याचे झाडसुद्धा आता कुठे दिसत नाही. वयोवृद्ध लोक असेही म्हणतात की, हनुमान फळ खाल्ले की शरीरात असलेला कर्करोगदेखील बरा होतो. हनुमान फळाचा आकार हनुमानाचा जसा चेहरा आहे तसाच असतो आणि खायला तर फळ खूप आंबट गोड असते.
मानवी जीवनात या सर्व वनस्पतींचा औषध निर्माणात खूप मोठा वाटा आहे. त्याचे वृक्षारोपण व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
दुर्मिळ झाडे लावूया, पर्यावरण रक्षण करूया!
The Need to Plant Species of Plants Facing Extinction