पत्नीशी भांडणानंतर पतीची तीन मुलांसह कालव्यात उडी

दोन मुलांचे मृतदेह सापडले; रानवडची घटना

निफाड : तालुका प्रतिनिधी
रानवडमध्ये पवार कुटुंबावर मोठा आघात करणारी दुर्घटना रविवारी उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये घरातील किरकोळ वादानंतर मुलांचे डोक्यावरील केस कापण्यासाठी घेऊन जातो, असे सांगून बाहेर पडलेल्या दीपक पोपट पवार (वय 28) यांनी आपल्या तीन मुलांसह घर सोडले. अन् काही तासांनी नांदुर्डी हद्दीतील पालखेड डाव्या कालव्यात दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी रानवड येथे राहणारे पूजा व दीपक यांच्यात पाणी भरण्यावरून किरकोळ वाद झाला. परिणामी, केस कापण्याचे निमित्त करून दीपक मुलांसह घराबाहेर पडला. मात्र, दोन मुले नदीपात्रात आढळून आल्याने सापडलेल्या मुलांची ओळख निफाड पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने व चौकशीतून पटवून दिली. मृत मुलांची नावे प्रसाद दीपक पवार (वय दीड वर्ष) आणि वीर दीपक पवार (वय पाच वर्षे) अशी आहेत. हे दोघे रानवड येथील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दीपक पवार आणि त्यांचा तिसरा मुलगा अविनाश यांचा शोध सुरू करण्यात आला.
दीपक, त्यांची पत्नी पूजा आणि भाऊ राहुल हे तिघेही सात वर्षांपासून शिवप्रसाद वाघा वायनरी येथे काम करत होते. त्यामुळे ही दुर्घटना अधिकच काळजाला चटका लावणारी ठरली आहे. कालव्यात तसेच परिसरात शोधमोहीम सुरू असून, वडील आणि मुलगा दोघांचा शोध अद्यापही लागलेला नाही. या संपूर्ण घटनेचा तपास निफाडचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांकडून सुरू आहे.
काल निफाडजवळील बोकडदरे येथे याच कालव्यात पाय घसरून महिला पडल्याने तिचा अद्याप शोध लागलेला नाही. तर येथून जवळच असलेल्या देवपूर येथे शेततळ्यात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. परिणामी, वेगवेगळ्या घटनेत अनेकांचे मृत्यू झाल्याने तालुक्यात दुःखाची तसेच चिंतेची छाया पसरली आहे.

Husband jumps into canal with three children after fight with wife

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *