हायड्रोजनवर चालणारी पहिली गाडी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वांत कार्यक्षम मंत्री आहेत. आपल्या खात्यात सतत काहीतरी प्रयोग करून  आपल्या खात्याचा जनकल्याणासाठी कसा उपयोग होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्या खात्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अनेक प्रकल्पांमध्ये नवीन प्रयोग त्यांनी केले आहेत. इलेक्ट्रिक वाहने हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग होता. आता तो पूर्णत्वास गेला आहे. नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देऊ लागल्याने रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसत आहेत.  इलेक्ट्रिक वाहनांनंतर आता हायड्रोजनवर चालणार्‍या वाहनांचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. देशात त्याची तयारी चालू आहे. बुधवारी ते हायड्रोजनवर चालणार्‍या गाडीने लोकसभेत आले आणि सर्वांना चकित करून सोडले. टोयोटा मिराई ही हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली गाडी आहे. भारतीय रस्त्यांवर आणि भारतीय हवामानात  या गाड्या कशा प्रभावी ठरतील याची सध्या चाचणी सुरू आहे. या चाचणीचा एक भाग म्हणून नितीन गडकरी स्वतः या गाडीतून प्रवास करून लोकसभेत आले. इलेक्ट्रिक वाहनांनंतर हायड्रोजनवर चालणार्‍या वाहनांचा प्रयोग यशस्वी झाला तर देशाचे पेट्रोल, डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. इंधन म्हणून वापरले जाणारे हे हायड्रोजन पाण्यापासून तयार केले जाते. शिवाय, या इंधनामुळे प्रदूषणही होत नाही. झिरो पोलूशन म्हणजे शून्य प्रदूषण करणारी ही गाडी आहे. जपानमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असून, जपानच्याच टोयोटा या कंपनीने ही गाडी गडकरी यांना दिली आहे. हायड्रोजनवर चालणार्‍या या गाडीचा प्रयोग भारतात यशस्वी झाला तर भारताला पेट्रोल, डिझेलची फार गरज भासणार नाही. हायड्रोजनची निर्मिती पाण्याद्वारे होत असल्याने तो बाहेरून आयतही करावा लागणार नाही. फक्त त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभारावे लागतील अर्थात गडकरींसारखे कार्यक्षम मंत्री असल्याने हे प्रकल्प वेळेत पूर्णत्वास जातील यात शंका नाही. या प्रकल्पांमुळे देशात रोजगारही निर्माण होईल. नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे स्वप्न पाहिले, आज ते साकार झाले आहे. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक वाहने ही परिकल्पना वाटत होती, आज ते वास्तव बनले आहे. आताही  नितीन गडकरी यांनी हायड्रोजनवर चालणार्‍या वाहनांचे स्वप्न पाहिले आहे. भविष्यात तेही प्रत्यक्षात येणार आहे. स्वतः गडकरीच हायड्रोजन चालणारी गाडी घेऊन लोकसभेत आल्यामुळे अशा गाड्या निर्माण होणे शक्य आहे. आता ते गाडी वापरून पाहणार आहेत. त्यानंतर त्याचे व्यावसायिक दृष्टीने उत्पादन होऊ शकते की नाही हे पाहणार आहेत. एकदा ते निश्चित झाले की या गाड्यांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊन हायड्रोजनवर चालणार्‍या गाड्या रस्त्यांवर धावू लागतील.
श्याम ठाणेदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *