पंतप्रधानपदाने 1991 आणि 1999 ला हुलकावणी दिल्यानंतर पवारांनी आपल्या भक्तांच्या सहाय्याने संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा यूपीएचे अध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला असावा असे वाटते. 2004 पासून गेली अठरा वर्षे यूपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे आणि अर्थात यूपीएचा प्रमुख पक्ष कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसने अथवा सोनिया गांधींनी अध्यक्ष बदलण्याची किंवा सोडण्याची इच्छा व्यक्त केली नाही. तरीही आपल्याच पक्षाच्या युवा शाखेद्वारे आपल्यालाच यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव पवारांनी आपल्यासमोर पारित करून घेतला.
1991 साली देशातील अग्रगण्य मीडिया हाऊसमध्ये एक व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या या व्यंगचित्रात पुढे देशाचे पंतप्रधान झालेले नरसिंह राव, त्यांच्या पक्षातील प्रतिस्पर्धी अर्जुन सिंग आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार उभे आहेत, अस दाखवलं आहे. चर्चा अर्थात पंतप्रधानपद कोणाकडे जाणार याविषयीच होती. पवारांना पाहून राव यांच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव दाखवले होते आणि तुम्ही इथे कसे, हा प्रश्न त्यांनी पवारांना विचारला. त्यावर राजकारणात काहीही घडू शकतं असं हसर्या चेहर्याच्या पवारांनी उत्तर दिल्याचं व्यंगचित्रात लिहिलं आहे. आणि पवारांच्या हातात एक पैशाची थैली दाखवली आहे. देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याचा पवारांचा तो पहिला प्रयत्न होता. कॉंग्रेसचं नेतृत्व आणि अर्थात देशाचं पंतप्रधानपद कोणाकडे जाईल याविषयी या तीन नेत्यांमध्येच स्पर्धा होती. त्यात नरसिंह राव विजयी ठरले आणि देशाचं पंतप्रधानपद प्रथमच दक्षिण भारताला मिळालं. तेव्हा पवार 51 वर्षांचे होते. आज ते 81 वर्षांचे आहेत आणि त्यांच्याच पक्षाच्या अर्थात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणीच्या त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावं असा ठराव मंजूरही करण्यात आला. वाढतं वयोमान, ढासळती प्रकृती याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. 1978 साली पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि तेव्हापासून गेली 44 वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवली. अर्थात पवार आपली पकड ठेवू शकले ते पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या पट्ट्यात मराठा समाजात त्यांच्या असलेल्या प्रभावामुळे. याच प्रभावाच्या भरवशावर पवार त्यांचे 50 आमदार निवडून आणू शकले. पण राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या पक्षाच्या खासदारांची संख्या ही महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आठ आणि देशातून नऊच्या पुढे गेली नाही. आणि तिथेच देशाच नेतृत्व करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसली.
नाही म्हणायला कॉंग्रेसमध्ये असताना पवार 1998 ते 1999 विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी वाजपेयी सरकारवर त्यांनी आणलेला अविश्वास ठराव पारित झाला आणि वाजपेयी सरकार केवळ एका मताने पडलं. त्यावेळी पत्रकारांनी तेव्हाच्या ज्येष्ठ मंत्री स्व. सुषमा स्वराज यांना आता पंतप्रधान कोण होईल, असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी पवारांचे प्रवक्ते असल्याच्या थाटात, पवार पंतप्रधान व्हावेत असं मत व्यक्त केलं. पण तसं घडलं नाही. उलट सोनिया गांधी या इटालियन असल्याच्या मुद्यावर पवारांनी सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाला विरोध केला आणि त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. केंद्रीय राजकारणात
सर्वोच्च स्थान मिळविण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन केली. पण त्यांच्या खासदारांची संख्या नऊच्या पुढे कधीही गेली नाही.पण त्या नऊ खासदारांच्या भरवशावर त्यांनी दहा वर्षे कृषी खातं सांभाळलं. त्याचबरोबर महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार सतत तीन टर्म आणलं. आणि अडीच वर्षांपूर्वी त्यांच्याच पुढाकाराने तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं.पण गेल्या दोन वर्षांपासून पवारांचे शिवसेनेतील भक्त संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना द्यावं ही मागणी सुरू केली. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष बनलेली नसताना राऊतांनी पवारांना यूपीएचे अध्यक्षपद मिळावं ही मागणी करणं म्हणजे ज्या घरावर आपला हक्कच नाही, त्या घराची सजावट कशी करायची हे सांगण्याचा हा प्रकार!
पंतप्रधानपदांनी 1991 आणि 1999 ला हुलकवणी दिल्यानंतर पवारांनी आपल्या भक्तांच्या सहाय्याने संयुक्त पुरोगामी आघाडी किंवा यूपीएच अध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असावा असं वाटतं. 2004 पासून गेली अठरा वर्षे यूपीएच अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे आणि अर्थात यूपीएचा प्रमुख पक्ष कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसने अथवा सोनिया गांधींनी अध्यक्ष बदलण्याची किंवा सोडण्याची इच्छा व्यक्त केली नाही. तरीही आपल्याच पक्षाच्या युवा शाखेद्वारे आपल्यालाच यूपीएच अध्यक्ष करण्याचा ठराव पवारांनी आपल्यासमोर पारित करून घेतला. देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याचा हा त्यांचा तिसरा प्रयत्न! पंतप्रधानपदाने दोन वेळा हुलकवणी दिल्यानंतर पवारांचा निदान यूपीएच अध्यक्षपद मिळवण्याचा प्रयत्न दिसत आहे.
पवारांचे सर्वपक्षीय संबंध पाहता हे त्यांनाच मिळावं असं त्यांचे सहकारी प्रतिपादन करीत आहेत. पण पवारांच्या बरोबरीने अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक हे पक्षनेतेसुद्धा आपापल्या राज्यात आपला प्रभाव राखून आहेत. त्यांचं ही नाव यूपीएच्या अध्यक्ष पदाकरिता त्यांचे समर्थक पुढे करू शकतात. कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी याआधीच कॉंग्रेस आप, तृणमूल कॉंग्रेसशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचं सांगितलं.अशा परिस्थितीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यूपीए अध्यक्ष पद सोडण्याची सुतराम शक्यता नाही. किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना वगळता तशी मागणी कोणीही केलेली नाही. या परिस्थितीत देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याचा पवारांचा हा तिसरा आणि कदाचित शेवटचा प्रयत्न म्हणावा.आणि तो यशस्वी होण्याची शक्यता दिसत
नाही.