आस्वाद

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो… आणि मग वाटतं आपल्या जवळ पावसाचं बटन असावं किंवा रिमोट तरी असावा.जसं रिमोटचं बटन दाबलं की आपल्याला हवा तो कार्यक्रम पाहता येतो तसं… रिमोटचं बटण दाबलं की मस्त धुवाधार पाऊस, त्यात चिंब चिंब भिजावं… ती पाऊस फुलं ओंजळीत घेऊन अगदी खोल खोल श्वसात तो तुषार सुगंध साठवावा… खड्ड्यात साठलेलं पाणी पायानं हलकेच उडवत आठवणींच्या गावी थोडा वेळ रमावं…आणि हो… खरपूस भाजलेलं कणीस खात खात खूप भटकंती करावी…. आणि निसर्गाच्या मैफलीचा समरसून आस्वाद घ्यावा. तुम्हालापण वाटतं ना कधीकधी?
आपणच आपल्या मनाचे राजे असा दिवस यावा कधीतरी… आणि योगायोगानं ती संधी मला मिळालीच. काल सूनबाई आणि मुलं पिकनिक साठी बाहेर गेली. त्यामुळे आजचा हा दिवस मनसोक्त, मुक्तपणे, बंधनविरहित जगायचा असं मी ठरवलं… घरातली सगळी ट्रीपला गेल्यानंतर मी स्वतःभोवती गिरकी घेत ‘मीच माझ्या मनाची राणी गं’ असं म्हणत दूरदर्शन बटण दाबलं तर… रंगोली कार्यक्रम सुरू होता… मग काय! माझा मूड एकदमच छान! मस्तपैकी कडक कॉफी करून सोफ्यावर पाय पसरून रंगोलीतील जुनी गाणी गुणगुणत कॉफीचा आस्वाद चवीचवीनं घेऊ लागले… आणि आज काय बरं जेवणाचा बेत करूया? याचा विचार करू लागले. ठरलं तर मग… आज मस्तपैकी खमंग खमंग कांदा घालून भाजणीचं थालीपीठ, काकडी, टोमॅटो, गाजर अशी मिक्स दह्यातील कोशिंबीर आणि मसालेभात… बस्स.. जास्त पदार्थ नको आणि काही नको.
आज जरा निवांतपणा होता म्हणून बरेच दिवस कपड्याचं कपाट आवरलं नव्हतं म्हणून ते आवरायचं ठरवलं… पुस्तकाचं कपाट देखील माझी वाटच बघत होतं..तेही आवरायला घेतलं… वाचून झालेली जुनी पुस्तकं बाजूला काढली… आणि सर्व पुस्तकं एकदा हातात घेऊन मायेनं कुरवाळत परत छान ओळीत ठेवली. हे सगळं करता करता दोन तास चटकन गेले. आता खूप भूक लागली होती. नाश्ता करावा म्हणून सोफ्यावर बसले. यूट्यूबवर ओल्ड सिनेसंगीत लावून नाश्ता करू लागले तोच फोनची रिंग वाजली…
हॅलो, सावी, काय करते आहेस? किती दिवसात तुझा फोन नाही, भेट नाही, इथंच आहेस की कुठे बाहेरगावी?
इथंच आहे गं. दररोजच्या कामाच्या धावपळीत फोन करायचा राहून गेलं… तू कशी आहेस निशी?
मी पण मस्त. आज आमच्या ऑफिसमधला सर्व स्टाफ जरा पिकनिक साठी माथेरानला आलाय.
सगळे मस्त मजा करताहेत. असा चेंज बरं वाटतो गं कधी कधी.
मी पण निशीला आजचा एकटेपणाचा आनंद, आजचा जेवणाचा मेनू सांगितला. ती लगेचच म्हणाली, काय गं सावे? तुला स्वतः करायचा आणि खायचा कंटाळा कसा येत नाही? तू पण कधीतरी तुझ्या मैत्रिणींबरोबर अशी बाहेर भटकंती करत जा. रोज तेच ते कामाचं रहाटगाडगं ओढत बसायचं… मला तर बाई अगदी कंटाळा येतो अशा गोष्टींचा….चल, माझ्या मैत्रिणी हाक मारतात. चल बाय… माझी आठवण काढत थालीपीठ खा बरं का? असं म्हणून तिनं व मी फोन खाली ठेवून दिला.
आपलं मन कसं असतं बघा हं… निशीचा फोन येण्याअगोदर माझ्या अंगात जणू उत्साहाचं वारं
संचारलं होतं. पण निशीचा फोन आला आणि उगाचच मला थकल्यासारखं वाटायला लागलं… तुला नाही का कंटाळा येत? या वाक्याचं आवर्त उगाचच डोक्यात घोंगाऊ लागलं… म्हणजे कोणी आपल्याला चांगलं म्हटलं की आपल्याला लगेच आनंद होतो. पण कोणी निंदा केली की आपण दिवसभर त्याचाच विचार करत बसतो. नकारात्मक विचारांचा प्रभाव आपल्या मनावर नेहमीच जास्त होतो, हे निशीचा फोन आल्यानंतर लक्षात आलं.
म्हणजे आपला उत्साह, आनंद असा दुसर्‍याच्या बोलण्यावर अवलंबून असतो? आपण आपला उत्साह, आनंद कसा काय दुसर्‍याच्या हातात देतो? नाही, नाही. असं होता कामा नये. उलट आपणच निशीला ‘मीच माझ्या मनाची राणी गं’ असं वागण्याची मजा सांगायला हवी…. तिला घरी स्वतः केलेल्या पदार्थांची, ते खाण्याची मजा काही निराळीच असते… हे पटवून सांगायचा आपण का प्रयत्न केला नाही? दुरुन बोलणार्‍या व्यक्तीच्या बोलण्याचा प्रभाव इतका पडू शकतो? माझी उत्साहाची जागा कंटाळ्यानं लगेच घेतली ? अजबच आहे मानवी मन!
मला क्षणभर असं वाटलं…. फक्त थालिपीठच करुया… कशाला हवाय मसालेभात?… पण लगेच माझा आतला आवाज.. मनातली सखी का नाही येऊन म्हणाली.. अगं, निशीचं काय एवढं मनावर घेतेस? तुला परत अशी एकटेपणाची मजा लवकर करता येणार नाही. ऊठ, मस्त मोकळेपणाने श्वास घे..आणि सकाळी जे मनाशी ठरवलं आहेस ते अगदी उत्साहानं कर… मी डोळे मिटून दीर्घ श्वसन केलं आणि थकव्याला मार दो गोली असं म्हणत स्वतःभोवती गिरकी घेतली आणि नाही, नाही, आज मीच माझ्या मनाची राणी गं म्हणत कपाटातील माझ्या आवडीचा स्काय ब्लू कलरचा ड्रेस काढला आणि चला, मसालेभात करूया म्हणून किचनकडे निघाले…
निशीच्या फोनमुळं एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली ती म्हणजे आपण आपला आनंद, उत्साह हा कधीच दुसर्‍याच्या हाती देऊ नये. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो… तसं प्रत्येक जण त्याच्या मनाला वाटेल तसं बोलणार… त्यातलं आपण किती मनावर घ्यायचं आपण ठरवायचं आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करायचं. मग कधी मैत्रिणींबरोबर मनसोक्त भटकंती करा… आपला आवडता ड्रेस घालून आपली छबी आरशात बघून आज तू खरंच खूप सुंदर दिसतेस असं म्हणा… स्वतःवर खूप प्रेम करा… येणारा प्रत्येक क्षण मस्त आनंदात जगा… मग चला तर… मसालेभात होईपर्यंत आपण छान डान्स करूया… ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’… येताय ना? … आणि हो….तुम्हीपण कधीतरी एकटेपणाची मजा अनुभवा..!

I am the empress of the mind.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

10 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

15 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

27 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

41 minutes ago

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

48 minutes ago