मी पुन्हा फुटलो!

– प्रशांत पोतदार
नमस्कार,
मी पेपर बोलतोय. आणि मी पुन्हा फुटलो! हो, बरोबर ऐकलंत तुम्ही. काल-परवाच मी विद्येच्या माहेरघरी फुटलो. आणि संपूर्ण देशभरात चर्चा, आक्रोश, संताप सुरू झाला की, पेपर फुटला, पेपर फुटला. पेपर आहे आणि तो फुटणारच. असे समीकरणच जणू या देशात तयार झाले आहे. पेपर फुटणे ही जणू देशाची परंपरा होत चालली आहे. फुटला नाही तो सुटला कसा?
समाजव्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये बर्‍याचदा बरंच काही फुटत असतं. कधी हे फुटतात तर कधी ते फुटतात. मग मी तरी का मागे राहावे? मी फुटणारच! देशाच्या कानाकोपर्‍यात कुठे कुठे आणि कधी कधी मी फुटलो याची उजळणी पुन्हा करण्यात अर्थ नाही. आज देशाच्या सर्व थरांमधून माझ्या नावाने बोंब होत आहे. पेपर फुटला, पेपर फुटला असा टाहो केला जात आहे. परंतु, मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी फुटतो तेव्हा मी एकटा फुटत नसतो. मी लाखो-करोडो विद्यार्थ्यांचे नशीब आणि भविष्य अंधारमय करून फुटत असतो. अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या माता-पित्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून मी फुटत असतो. यात काही नवीन नाही की, नेहमी माणसाच्या चुकीचं खापर कधी निसर्गावर, किंवा अन्य कुणावर फुटलेलंच आहे. यावेळेस माझ्यावर फुटलं, त्यात नवीन काय?
परंतु मित्रांनो, माझ्या फुटक्या मनाची व्यथा मी तुम्हाला कशी सांगू? मित्रांनो, मी स्वतः फुटत नसतो. मला फोडले जाते. यामध्ये दोष कुणाचा-व्यवस्था, मनुष्य की यंत्रणा यांवर चर्चा करण्यापेक्षा मी फुटतो कसा आणि त्या फुटण्यामागे माझ्या मनात असलेले शल्य जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, माझी फुटण्याची इच्छा नसतेच. परंतु स्वार्थी मनुष्य आपल्या फायद्यासाठी मला फोडत असतो.
अहो, मी कागदाचा आणि अगदी तकलादू तुकडा आहे. मी माझ्या मनाविरुद्ध का फुटेल? साध्या हवेच्या फुंकरीने उडून जाणारा मी, कुणाची स्वप्नं घेऊन कसा उडू शकतो? मनुष्य नावाचा सजीव प्राणी माझ्यासारख्या निर्जीव कागदाच्या जिवावर कितीतरी जीवांशी खेळत असतो. निव्वळ पैशांसाठी माझा वापर करून स्वार्थ साधत असतो. माझी किंमत बाजारात ठरते, पण माझ्यावर लिहिलेल्या प्रत्येक प्रश्नाची खरी किंमत एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी जोडलेली असते. या पेपरफुटीच्या धक्क्यातून कितीतरी निष्पाप जीव वितभर कागदावर आपले शल्य लिहून, हातभर दोरीवर आपला जीव टांगणीला लावतात. कितीतरी विद्यार्थी आत्मविश्वास कायमचा गमावून बसतात. कितीतरी जीवांचे मानसिक खच्चीकरण होऊन पुन्हा कधी न बाहेर येणार्‍या मानसिक गर्तेत जातात.
मी जाणतो की, मीच असतो ज्याच्यासाठी विद्यार्थी रात्रीचा दिवस करून अभ्यास करत असतात. तो मीच असतो ज्याच्यासाठी कितीतरी आई-बाप कर्जबाजारी होतात व मुलांना शिकवतात. तो मीच असतो ज्याच्या जिवावर विद्यार्थी स्वप्नांचे मनोरे आणि भविष्याची मदार बांधतात. मी कागदाचा तुकडा असलो, तरी माझ्यावर लाखो स्वप्नांचा भार असतो. आणि एवढी सगळी आस मनाशी बांधून जगणार्‍या आई-बापांचा, मुलांचा विश्वासघात करून मला पुन्हा पुन्हा फोडले जाते. कागदाचा जीव माझा. परंतु, माझ्या वेदना मी कोणत्या कागदावर लिहू? किती आश्चर्याची गोष्ट! गेले कित्येक वर्षांपासून पेपर फुटण्याची परंपरा जणू सुरू आहे. वारंवार पेपर फुटला. मागील महिन्यातही आणि आज पुन्हा पेपर फुटला. आणि त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या संयमाचा, अश्रूंचा, भावनांचा बांध फुटला. आपल्या फुटक्या नशिबाचा जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने दुर्दैवी विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात एकत्र येऊन आक्रोश केला.
माझी किंमत कदाचित काही रुपयांत मोजता येईल, पण मला फोडल्याची किंमत लाखो विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याच्या वर्षांनी मोजावी लागते. इतिहासात अनेक महात्म्यांनी सामाजिक शिक्षणासाठी आपले जीवन बलिदान केले. त्या महात्म्यांच्या देशात शिक्षणासाठी त्यात पारदर्शकता असावी यासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागते? मोर्चे काढावे लागतात? आक्रोश करावा लागतो? टाहो करावा लागतो? जीवाचे बलिदान द्यावे लागते? यासारखी शोकांतिका ती काय? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा यात कुठलाही दोष नसताना विनाकारण ते या गलिच्छ व्यवस्थेमध्ये भरडले जात आहेत.
यासाठी जबाबदार कोण? चूक कोणाची? याचा ऊहापोह करण्यात अर्थ नाही. यंत्रणेतील त्रुटी, समाजव्यवस्था इत्यादी इत्यादी. एखाद्या व्यक्तीला अटक, शिक्षा होऊन हा प्रश्न सुटेल का? एकाला अटक करा, दुसरा तयारच आहे. मला फोडणारे हात मोजके असतात, पण माझ्या फुटण्याची किंमत लाखो हातांना मोजावी लागते. आज देशभरातून विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. व्यवस्थेविरोधात आवाज उठवला, जीवाचे रान केले. त्यांना समाजातील इतर घटकांनी किती साथ दिली? देशभरातून किती नागरिक, किती लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले? इतरांचे जाऊ द्या. एका सुजाण देशाचा नागरिक म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. एक नागरिक म्हणून मी फक्त सोशल मीडियावर निषेध नोंदवणे, एखाद्या चौकात जाऊन घोषणाबाजी करणे, काळ्या फिती लावणे, निरर्थक हळहळ व्यक्त करणे, कॅन्डल मोर्चे काढणे, एखाद्या टपरीवर, कट्ट्यावर बसून व्यवस्थेच्या विरोधात मोठ्या गप्पा मारणे याशिवाय अजून दुसरे काय करत असतो? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, काठावर उभे राहून बुडत असणार्‍या माणसासमोर मदतीचे सोंग आणणार्‍यांनी लक्षात ठेवायला हवे की, ही भ्रष्ट गटारगंगा एक दिवस आपल्या दारापर्यंत वाहत येईल. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर एक दिवस आपल्याही कुटुंबाला गिळंकृत करेल. पेपर फुटला म्हणून ओरडण्यापेक्षा, व्यवस्था कशी बदलेल याचाही विचार करायला हवा. लाखो-करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विषारी सही करणारे हात जोपर्यंत छाटले जात नाहीत, तोपर्यंत असे पेपर फोडले जाणारच. जोपर्यंत विचार बदलत नाही, तोपर्यंत समाजकंटक मला फोडत राहणारच.
म्हणून मी म्हणतो- मी फुटत नसतो. मला फोडले जाते. आणि पुन्हा सांगतो… जेव्हा जेव्हा मला फोडले जाते, तेव्हा फक्त पेपर नाही फुटत… नशीब फुटते, भविष्य फुटते, स्वप्नं फुटतात… आणि अख्ख्या मानवजातीवरचा विश्वाससुद्धा फुटतो. उरतो तो… निष्पाप जीवांच्या भविष्याला गिळंकृत करणारा काळाभिन्न अंधार…

I broke down again!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *