कृषिमंत्री पंचतारांकित हॉटेलवर, शेतकरी वार्‍यावर!

नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीमुळे राजकीय भूकंप आला असून, सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकर्‍यांना याचा फटका बसतो आहे. खुद्द कृषिमंत्री दादा भुसे बंडखोर गटात सहभागी झाले आहेत. मात्र, यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्‍यांचे ऐन खरीप हंगामात हाल होत असल्याचे दिसत आहे. नुकताच खरीप हंगामास सुरुवात झाली असून, सर्वत्र पेरणीची लगबग सुरू आहे. दरम्यान, शेतकर्‍यांसाठी अगदी महत्त्वाचा असलेल्या खरीप हंगामातच राज्याचे कृषिमंत्री शेतकर्‍यांसाठी उपलब्ध नसल्याने यावरून शेतकर्‍यांमध्ये संताप दिसून येत आहे. शेतकरी वार्‍यावर अन् कृषिमंत्री पंचतारांकित हॉटेलवर, असा सूर शेतकरीवर्गात उमटू लागला आहे. बंडखोर आमदारांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये भव्य हॉटेल, त्यातच आमदार शाहू पाटील यांची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे शेतकर्‍यांमध्ये संताप आहे. त्यात त्यांनी हॉटेलमध्ये कशी मजा आहे, याची माहिती आपल्या कार्यकर्त्याला देत होते. दरम्यान, खरीप हंगामात मंत्री, आमदारांनी मतदारसंघात शेतकर्‍यांसाठी मदत करायची सोडून ते मजा मारत असल्याची संतप्त भावना होऊ लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील असलेले व एवढे महत्त्वाचे पद असलेले कृषिमंत्री ना. भुसे उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना खते, बियाणे, कीटकनाशके घेण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जातोय. याप्रश्‍नी त्यांना काही देणेघेणे नसल्याचा आरोप शेतकरीवर्गाकडून केला जातोय. शेतकर्‍यांना युरिया खत मिळत नाही, काही कृषी सेवा केंद्रांवर विक्रेते शेतकर्‍यांना युरिया हवा असेल तर इतर खते घेण्याचा आग्रह करत आहेत. म्हणजे ही खते घेतली तरच युरिया मिळेल, असे शेतकर्‍यांना सांगितले जात आहे. यावर लक्ष देण्यासाठी राज्याच्या कृषिमंत्र्यांची जबाबदारी असते. मात्र, तेच येथे नसल्याने याचा फायदा विक्रेते घेत असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवित आहे. यावरून शेतकर्‍यांमध्ये रोष आहे. गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडला आहे व सर्वत्र पेरणीला सुरुवात झाली आहे. परंतु, याचे राजकारण्यांना काही नाही. त्यांना राजकारणच महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या महागाईचा फटका शेतकर्‍यांना बसतो आहे. विशेषत: अल्पभूधारकांना याचा फटका अधिक बसतो आहे. त्यातच कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच चालू वर्षात खतांच्या किमती वाढल्याचा भार, अशा विविध समस्यांतून शेतकरी जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *