गणेश विसर्जनाच्या दिवशी सुरक्षेच्या उपाययोजना करा

पोलिस प्रशासनाचे महापालिकेला पत्र

नाशिक : प्रतिनिधी 
गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी पत्र पाठवत केल्या आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेला 16 उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात गणेश विसर्जन मार्ग, तसेच घाटांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था, क्रेन आणि जीवरक्षक दलाची नियुक्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत. अग्निशमन दलाचे पथक तैनात ठेवणे, जीवरक्षकांची नावे व संपर्क क्रमांक दर्शविणारे फलक लावणे आणि गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
लाडक्या गणरायाला येत्या शुक्रवारी (दि. 25) निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका व विसर्जन स्थळांवर आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे. विसर्जन मिरवणुकीवेळी मिरवणूक मार्ग तसेच घाटांवर प्रकाशयोजना करण्यासह जीवरक्षक दल, बॅरिकेडिंगसह 16 उपाययोजनांची यादीच पोलिसांनी महापालिकेकडे पाठवली आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे. गणेश विसर्जनाची तयारी आता प्रशासकीय पातळीवरून केली जात आहे. येत्या शुक्रवारी गणरायाला निरोप दिला जाणार असून, त्याची सज्जता केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील हातगाड्या व अतिक्रमणांबाबत स्वतंत्र पथक नेमण्याची सूचनाही केली आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत पोस्टर्स-बॅनर्स काढणे, मोडकळीस आलेल्या इमारतींच्या मालकांना नोटिसा देणे, धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आणि आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करणे यावर भर देण्यात आला आहे.

मूर्ती वाहतूक वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन
निर्माल्य संकलनाची व्यवस्था, घाट निसरडा होऊ नये यासाठी उपाययोजना, तसेच कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्याचेही निर्देश आहेत. गणेशमूर्ती वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन करण्यासही महापालिकेला सांगण्यात आले आहे.

 

 

Implement security measures on the day of Ganesh Visarjan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *