आस्वाद

आठवणींच्या सावलीत…

– अफजल पठाण
तू गेलास आणि घरातील
आवाजही शांत झाले,
हसरे क्षण सारे जणू काळाच्या
पडद्याआड गेले.
तुझ्या आठवणींचा दिवा
अजूनही मनात तेवत आहे,
पण तुला पुन्हा पाहण्याची आस
मात्र कायमची अधुरी राहिली आहे…
जीवनात काही माणसं अशी असतात की, त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. ती आपल्या प्रत्येक दिवसाचा भाग असतात. सकाळच्या शुभेच्छांपासून ते रात्रीच्या काळजीपर्यंत, आपल्या आनंदापासून ते
दुःखापर्यंत, आपल्या यशापासून ते अपयशापर्यंत ती आपल्यासोबत उभी असतात. पण नियतीचा एक नियम आहे, ती कधी कोणाला, कुठल्या क्षणी आणि किती दूर घेऊन जाईल हे कोणालाच माहीत नसते आणि जेव्हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली एखादी व्यक्ती अचानक काळाच्या झडपेत सापडून कायमची निघून जाते, तेव्हा फक्त एक व्यक्ती हरवत नाही, तर आपल्या आयुष्यातील संपूर्ण विश्वच उद्ध्वस्त होते.
मृत्यू हा काही क्षणांचा असतो, पण त्यानंतरचे वेदना आयुष्यभराची असते. कालपर्यंत आपल्या शेजारी बसून गप्पा मारणारी व्यक्ती, आपल्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारी व्यक्ती, आज अचानक आपल्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे खूप कठीण असते. सुरुवातीला मनाला वाटत राहते की हा एक वाईट स्वप्न असेल. आता दारावर टकटक होईल, फोनची रिंग वाजेल आणि ती व्यक्ती पुन्हा समोर येईल. पण दिवस पुढे जातात, वेळ पुढे सरकतो आणि वास्तव अधिक ठळकपणे समोर उभे राहते ती व्यक्ती आता कधीच परत येणार नसते.
खरी वेदना अंत्यसंस्काराच्या दिवशी होत नाही. त्या दिवशी आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. सांत्वन करणारे हात असतात, धीर देणारे शब्द असतात. पण काही दिवसांनी जेव्हा सगळे आपापल्या आयुष्यात परत जातात आणि आपण एकटे उरतो, तेव्हा आठवणींचे वादळ सुरू होते. घरातील एखादी रिकामी खुर्ची बोलकी वाटू लागते. त्या खुर्चीकडे पाहिल्यावर वाटतं, आत्ताच ती व्यक्ती येईल आणि नेहमीसारखी बसून गप्पा मारेल. जेवणाच्या ताटात एखादा आवडता पदार्थ दिसला की आठवतं, हा पदार्थ त्यांना किती आवडायचा. आणि नकळत डोळे पाणावतात.
मोबाइलमध्ये जतन केलेला त्यांचा नंबर अनेकदा उघडून पाहिला जातो. माहित असतं की त्या नंबरवरून आता कधीच फोन येणार नाही, तरीही तो नंबर डिलीट करण्याची हिंमत होत नाही. जुन्या फोटोमध्ये त्यांचा हसरा चेहरा दिसतो आणि मन पुन्हा त्या काळात जाऊन पोहोचतं. जुन्या व्हिडिओमधील त्यांचा आवाज ऐकला की काही क्षणांसाठी वाटतं, ते अजूनही आपल्या जवळच आहेत. पण व्हिडिओ संपतो, स्क्रीन काळी होते आणि पुन्हा वास्तव समोर येतं.
आठवणींना ना वेळ असतो, ना ठिकाण. त्या अचानक येतात. एखाद्या रस्त्यावरून जाताना त्यांच्यासारखी चालणारी व्यक्ती दिसते आणि हृदय एक क्षणासाठी धडधडू लागतं. एखादं गाणं ऐकताना त्यांच्यासोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. एखाद्या सणाच्या दिवशी, वाढदिवशी किंवा कौटुंबिक कार्यक्रमात त्यांची उणीव अधिकच जाणवते. सगळे आनंदात असतात, पण मनाच्या एका कोपर्‍यात वेदनेचा एक दिवा सतत तेवत असतो.
सर्वांत जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा आयुष्यात एखादा आनंदाचा क्षण येतो. एखादं यश मिळतं, एखादं स्वप्न पूर्ण होतं किंवा घरात एखादा आनंदाचा प्रसंग घडतो. त्या क्षणी मनात पहिला विचार येतो, आज ते असते तर किती आनंदी झाले असते. आणि आनंदाच्या त्या क्षणालाही दुःखाची किनार लाभते. कारण काही आनंद असे असतात की ते आपल्या प्रिय व्यक्तींशिवाय पूर्ण वाटत नाहीत.
वेळ जखमांवर फुंकर घालतो, असं म्हणतात. पण काही जखमा कधीच भरून निघत नाहीत. त्या फक्त मनाचा एक भाग बनून राहतात. आपण हसायला शिकतो, जगायला शिकतो, पुढे चालायला शिकतो, पण मनाच्या एका कोपर्‍यात त्यांची जागा कायम राखून ठेवतो. त्यांच्या आठवणी आपल्या श्वासात मिसळलेल्या असतात. त्यांच्या शिकवणी, त्यांचे शब्द, त्यांचे प्रेम आणि त्यांचा सहवास आपल्यासोबत कायम राहतो.
काही माणसं शरीराने दूर जातात, पण आठवणींच्या रूपाने ती आपल्या हृदयात कायमची जिवंत राहतात. म्हणूनच अनेक वर्षे उलटून गेली तरी एखाद्या शांत रात्री, सगळं जग झोपलेलं असताना, त्यांची आठवण अलगद मनात येते. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. भूतकाळातील क्षण पुन्हा एकदा जिवंत होतात आणि आपण नकळत आकाशाकडे पाहत राहतो. कदाचित त्या तार्‍यांमध्ये कुठेतरी ते आपल्याला पाहत असतील, आपली काळजी घेत असतील, आपल्या आठवणींमध्ये जिवंत असतील. पण मन मात्र आजही एकच प्रश्न विचारत राहतं तू इतक्या लवकर का निघून गेलास रे? या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळत नाही. उरतात फक्त आठवणी, डोळ्यांत दाटलेले अश्रू, मनात साठलेली वेदना आणि त्या व्यक्तीने दिलेला अमूल्य सहवास. कारण काही नाती मृत्यूने संपत नाहीत, ती आठवणींच्या रूपाने आयुष्यभर आपल्या हृदयात जिवंत राहतात.

In the shadow of memories…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

7 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

7 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

8 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

8 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

8 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

8 hours ago