आस्वाद

मनोरंजनाच्या नावाखाली विकृतीचा बाजार!

– वाहिद बागवान
समाजमाध्यमांवर नुकतेच महिलांबद्दल अत्यंत अवमानजनक आणि अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी एका स्टँडअप कॉमेडियन आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती किंवा एका व्हिडिओपुरती मर्यादित नाही, तर ती आजच्या डिजिटल युगातील एका भयानक सामाजिक आजाराची आणि आपल्या ढासळत्या मूल्यांची धोक्याची घंटा आहे. ’विनोद’, ’संगीत’ आणि ’अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ याच्या नावाखाली आजकाल समाजमाध्यमांवर जो स्वैराचार सुरू आहे, तो आपल्या समृद्ध संस्कृतीच्या मुळावरच घाव घालत आहे.
या निमित्ताने मनोरंजनाची बदललेली व्याख्या, शिवराळ भाषेचे ’क्रेझ’ आणि तरुणाईवर होणारा त्याचा घातक परिणाम यावर गांभीर्याने मंथन करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राला आणि भारताला कलेची आणि निखळ विनोदाची एक अत्यंत मोठी परंपरा लाभली आहे. पु. ल. देशपांडे, राम गणेश गडकरी यांसारख्या दिग्गजांनी समाजातील विसंगतीवर अत्यंत मार्मिक बोट ठेवले, पण त्यांची भाषा कधीही सभ्यतेची रेष ओलांडणारी नव्हती. आज मात्र ’स्टँडअप कॉमेडी’ किंवा ’रोस्टिंग’च्या नावाखाली परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. दुसर्‍याचे व्यंग काढणे, शिव्या देणे आणि अश्लील द्विअर्थी संवाद साधणे यालाच आज ’कला’ मानले जात आहे.
या सांस्कृतिक र्‍हासात भर घातली आहे ती आजच्या ’रॅप’ संस्कृतीने. ज्या रॅप संगीताचा जन्म पाश्चिमात्य देशांत अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी झाला, त्याचे आपल्याकडे अत्यंत विद्रूपीकरण झाले आहे. आजच्या अनेक रॅपर्सच्या गाण्यातून अर्थपूर्ण संदेश गायब आहे; त्याऐवजी जेवढ्या जास्त शिव्या आणि जेवढी खालची पातळी गाठली जाईल, तेवढे गाणे ’हिट’ होते, असा एक अलिखित नियमच बनला आहे. नशेचे उदात्तीकरण आणि महिलांचा अवमान हेच या गाण्यांचे मुख्य विषय असतात.
सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, या शिवराळ कार्यक्रमांना मिळणारा तरुणाईचा प्रतिसाद. शहरांमध्ये जेव्हा या रॅपर्सचे ’लाइव्ह कॉन्सर्ट’ होतात, तेव्हा हजारो रुपयांची महागडी तिकिटे खरेदी करून तरुण-तरुणी तुडुंब गर्दी करतात.
रोजच्या खर्चासाठी पैशांचा हिशोब करणारी तरुणाई, मंचावरून शिव्यांचा भडिमार ऐकण्यासाठी हजारो रुपये उधळते. शिवीगाळ करणे हा आता गुन्हा न वाटता एक ’उत्सव’ आणि ’स्वॅग’ वाटू लागला आहे.
जेव्हा तरुण पिढी असे कार्यक्रम पाहते, त्यासाठी पैसे मोजते आणि त्यातील विकृतीला दाद देते, तेव्हा त्याचे थेट परिणाम समाजावर उमटू लागतात.
कॉन्सर्टमधून किंवा समाजमाध्यमांवरून बाहेर पडलेला तरुण तीच शिवराळ भाषा आपल्या दैनंदिन जीवनात वापरू लागतो. सार्वजनिक ठिकाणी, मित्रांमध्ये असभ्य भाषेचा वापर करणे ही आता सामान्य बाब वाटू लागली आहे. सतत असा हिंसक आणि अश्लील कंटेट पाहिल्यामुळे मानवी स्वभाव अधिक आक्रमक बनत आहे. इतरांबद्दलचा, विशेषतः महिलांबद्दलचा आदर आणि संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे.
ज्या समाजात भाषेला ’मातृभाषा’ म्हणून पुजले जाते, तिथे भाषेचे हे विडंबन एकप्रकारे आपल्या संस्कारांचे पतन आहे. समाजमाध्यम हे खर्‍या अर्थाने अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक साधन आहे. ते समाज प्रबोधनाचे, ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे आणि भविष्याचा वेध घेणारे एक जागतिक व्यासपीठ असायला हवे. या माध्यमातून नवीन विज्ञान, तंत्रज्ञान, कला, आणि चांगल्या साहित्याचा प्रसार होणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने या व्यासपीठाचा वापर स्वस्त लोकप्रियतेसाठी आणि ’व्ह्यूज’ मिळवून पैसे कमावण्यासाठी होताना दिसत आहे. पैशांच्या हव्यासापोटी कंटेट क्रिएटर्स समाजाची सांस्कृतिक पातळी रसातळाला नेत आहेत. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाचे स्वरूप, त्याचे विषय आणि भाषा ही आपल्या सभ्यतेला आणि समृद्ध संस्कृतीला साजेशीच असली पाहिजे.
मनोरंजन हे मानवी जीवनाला समृद्ध करण्यासाठी असते, त्याला विकृत करण्यासाठी नाही. आपण जो कंटेंट पाहतो, ज्याला ’लाइक’ करतो आणि ज्याची तिकिटे विकत घेतो, तोच कंटेंट समाजमाध्यमे आणि बाजारपेठ आपल्याला वारंवार दाखवते.
समाजातील हा बदलता प्रवाह थांबवायचा असेल, तर केवळ कायद्याचा धाक आणि पोलिसांची कारवाई पुरेशी नाही. एक सुसंस्कृत समाज म्हणून आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. अश्लीलतेला ठामपणे नकार देणे, अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकणे आणि चांगल्या, दर्जेदार कलेला प्रोत्साहन देणे ही आता आपली सर्वांची आणि विशेषतः तरुणाईची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निखळ मनोरंजनाचा आग्रह धरणे, हीच या सांस्कृतिक प्रदूषणावरील खरी मात्रा आहे.

A marketplace of perversion in the name of entertainment!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago