पंतप्रधान मोदी : आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित
नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारताचा सांस्कृतिक वारसा हा जगाला जोडणारा सर्वार्ंत मजबूत पूल आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारताच्या सभ्यतागत यात्रेने शतकानुशतकांच्या सांस्कृतिक आदानप्रदान आणि ज्ञानाच्या सामायिक प्रयत्नातून स्वतःला समृद्ध केले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी बुधवारी (दि. 14) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू झालेल्या ’बृहत्तर भारत : जगभरातील भारताच्या सांस्कृतिक संबंधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद’ ला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केले.
पंतप्रधानांनी आपल्या लेखी संदेशात म्हटले की, भारताचे संगीत, नृत्य, सिनेमा आणि खाद्यसंस्कृती आजही जगभरातील समाजाला भारताशी जोडत आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढती ओळख मिळवत आहे.
केवळ स्मारके जतन करण्यापुरतेच सरकारचे काम मर्यादित नाही, तर ’ज्ञान भारतम’ उपक्रमाद्वारे देशाच्या हस्तलिखित वारशाचेही जतन केले जात आहे. तसेच परदेशातून प्राचीन मूर्ती आणि पुरातन वस्तू परत आणण्याच्या प्रयत्नांना नवी गती मिळाली आहे.
50 देशांचे प्रतिनिधी सहभागी
ही तीन दिवसीय परिषद इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातर्फे आयोजित करण्यात आली आहे. यात चीन, जपान, मंगोलिया, नेपाळ, इराणसह 50 देशांचे राजदूत, प्रतिनिधी आणि अभ्यासक सहभागी झाले आहेत. या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व आहे. 14 ऑक्टोबर 1926 रोजी कोलकाता येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली ’ग्रेटर इंडिया सोसायटी’ अर्थात ’बृहत्तर भारत परिषदे’ची स्थापना झाली होती. त्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही परिषद भरवण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय संस्कृतीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सांस्कृतिक सचिव विवेक अग्रवाल उपस्थित होते.
Indian civilization enriched through cultural exchange