– प्रा.डॉ. सुधीर अग्रवाल
जागतिक पुरवठा साखळीतील गंभीर अडथळे आणि विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांना बसलेली मंदीची झळ यामुळे संपूर्ण मानवी समाज एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संक्रमणकाळातून जात आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ संपूर्ण जग या अनपेक्षित घटनांचे केंद्र बनले आहे. संकटे निवारण्यासाठी आणि देशाला योग्य दिशा देण्यासाठी निवडून आलेली प्रगत देशांतील सरकारे स्वतःच संकटात सापडून पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळत आहेत. याचा सविस्तर मागोवा घेतल्यास लक्षात येते की, अत्यंत प्रगत मानल्या जाणार्या ब्रिटनमध्ये तब्बल सहा पंतप्रधान बदलले, फ्रान्समध्ये नऊ पंतप्रधान झाले, तर जपान आणि इटलीसारख्या देशांमध्येही प्रत्येकी पाच पंतप्रधान झाले. नेतृत्वाचा जो लपंडाव तिथे पाहायला मिळत आहे, त्या जागतिक गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, भारताने मात्र गेल्या बारा वर्षांत जे अभूतपूर्व राजकीय सातत्य अनुभवले आहे, त्यामुळे आपला देश आज जागतिक पटलावर ’स्थिरतेचा आणि शांततेचा दीपस्तंभ’ म्हणून अतिशय खंबीरपणे उभा आहे. भारताची ही स्थिरता केवळ योगायोग मुळीच नाही, तर त्यामागे एक अत्यंत मजबूत राजकीय नेतृत्व, प्रशासकीय पकड आणि अनेक दशकांचा वेध घेणारी अचूक दूरदृष्टी दडलेली आहे. ’मोदी सिद्धांत’ याच अभेद्य स्थैर्यावर आणि त्यातून साध्य होणार्या शाश्वत विकासावर अतिशय अचूक प्रकाश टाकतो.
अशा या अशांत आणि अस्थिर जागतिक वातावरणात भारत एक स्थिर, सुरक्षित, विश्वासार्ह आणि बलशाली उगवती महासत्ता म्हणून समोर येत आहे. भारताची ही प्रगती केवळ आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून संरक्षण, तंत्रज्ञान, मुत्सद्देगिरी आणि जागतिक नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर दिसून येत आहे. या राजकीय स्थैर्याचा आणि धोरणात्मक सातत्याचा सर्वांत मोठा व दूरगामी लाभ भारताच्या परराष्ट्र धोरणात आकडेवारीसह अत्यंत स्पष्टपणे दिसून येतो. कोणत्याही बाह्य दबावाला, महासत्तांच्या धमक्यांना किंवा गटाच्या प्रभावाला बळी न पडता, निव्वळ ’राष्ट्रीय हित सर्वोपरी’ मानून ’धोरणात्मक स्वायत्ततेचे’ अत्यंत कौशल्याने पालन करण्याचे तत्त्व भारताने आता ठामपणे स्वीकारले आहे आणि ते कृतीतून सिद्धही केले आहे. एकाच वेळी अमेरिकेशी सामरिक आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी अधिकाधिक दृढ करायची आणि त्याच वेळी रशियासोबतचे आपले ऐतिहासिक संबंध तितक्याच आत्मविश्वासाने आणि निष्ठेने जपायचे, हे केवळ एका खंबीर परराष्ट्र धोरणामुळेच शक्य झाले आहे. एका बाजूला ’ब्रिक्स’सारख्या व्यासपीठावरून विकसनशील देशांच्या आणि ’दक्षिणी जगाच्या’ म्हणजेच ग्लोबल साऊथ समस्यांना जागतिक पटलावर अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात भारताने पुढाकार घेतला आहे, तर दुसर्या बाजूला ’जी-सात’ आणि ’क्वाड’ सारख्या जगातील सर्वाधिक प्रगत अर्थव्यवस्थांच्या बैठकांमध्येही भारताचा सहभाग आणि मत आता निर्णायक ठरू लागले आहे.
इस्रायलशी अत्यंत घनिष्ट तंत्रज्ञानविषयक आणि संरक्षणविषयक संबंध ठेवत असतानाच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, संपूर्ण अरब जगताशी आणि इराणशी संवादाचे सेतू अबाधित राखणे, हे भारतीय मुत्सद्देगिरीचे आणि राजकीय प्रगल्भतेचे सर्वोत्तम उदाहरण ठरते. आर्थिक आघाडीवरही भारताने आपली अफाट ताकद आणि लवचिकता संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असताना आणि अनेक प्रगत देश महागाई व बेरोजगारीच्या दुष्टचक्रात अडकले असताना, भारतीय अर्थव्यवस्थेने सात दशांश आठ टक्के असा लक्षणीय आणि हेवा वाटण्याजोगा विकास दर गाठला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील प्रचंड मागणी, रस्ते-रेल्वे आणि विमानतळ अशा पायाभूत सुविधांमध्ये होत असलेली अभूतपूर्व गुंतवणूक आणि तळागाळापर्यंत पोहोचलेला डिजिटल अर्थव्यवस्थेचा विस्तार यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रमुख इंजिन बनला आहे. आज भारताने अडतीस देशांसोबत तब्बल नऊ मुक्त व्यापार करार करत देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात भक्कमपणे उभे केले असून, वाढत्या निर्यातीमुळे देशाच्या परकीय चलनसाठ्याने सप्टेंबर दोन हजार सव्वीसमध्ये सातशे ऐंशी अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडून आजवरची सर्वोच्च विक्रमी पातळी गाठली आहे. याच आर्थिक लवचिकतेवर आणि धोरणात्मक स्पष्टतेवर विश्वास ठेवत, जपानच्या पतमानांकन संस्थेने तब्बल पस्तीस वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन वाढवून ते ’ए’ श्रेणीत आणले आहे. हा केवळ एक आकडा नसून, तो जागतिक गुंतवणूकदारांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरील अढळ आणि वाढता विश्वास आहे.
या सर्व आर्थिक आणि राजकीय प्रगतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अत्यंत भक्कम जोड मिळाली असून, धोरणात्मक सातत्यामुळेच आज देशाला अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचे आणि ते अविरतपणे तडीस नेण्याचे बळ प्राप्त झाले आहे. याचे सर्वार्ंत ज्वलंत आणि ताजे उदाहरण म्हणजे सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताने घेतलेली गरुडझेप. नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे 17 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान ‘सेमीकॉन इंडिया 2026’ या भव्य आंतरराष्ट्रीय परिषदेचे अत्यंत दिमाखदार आयोजन करण्यात आले. ‘सिलिकॉन ते सिस्टिम : परिसंस्थेची उभारणी’ अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या परिषदेने भारताला जागतिक पुरवठा साखळीतील एक अत्यंत विश्वासार्ह आणि महत्त्वाचा घटक म्हणून प्रस्थापित केले आहे. एकेकाळी चिप निर्मितीच्या क्षेत्रात केवळ आयातदार असणारा भारत आज
स्वतःच्या बळावर या तंत्रज्ञानाची संपूर्ण परिसंस्था उभारण्याच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. मोहाली आणि सुरत येथे नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक प्रकल्पांमधून व्यावसायिक तत्त्वावर चिप्सचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे. जागतिक विश्वासाच्या याच बळावर सरकारने तब्बल एक लाख अठरा हजार कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करत ‘सेमीकॉन दोन दशांश शून्य’ हा या अभियानाचा दुसरा मोठा टप्पा जाहीर केला आहे.
या जागतिक प्रदर्शनात बावन देशांतील प्रतिनिधी, सहाशेहून अधिक प्रदर्शक, तीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि देशातील दोनशेहून अधिक स्टार्टअप्स सहभागी झाले होते. या तंत्रज्ञान प्रवासात मायक्रॉन, एएसएमएल, एप्लाइड मटेरियल्स आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांचा सक्रिय सहभाग म्हणजे भारताच्या धोरणांवरील जागतिक मोहरच मानली जाते. देशांतर्गत पातळीवर घेतलेले धाडसी आणि दूरदर्शी निर्णय हे या अढळ स्थिरतेचा मुख्य पाया आहेत. ’इस्रो’च्या एकामागून एक यशस्वी ठरणार्या अवकाश मोहिमा, चांद्रयान आणि उपग्रह प्रक्षेपणाचे जागतिक विक्रम ही भारताच्या अमर्याद वैज्ञानिक क्षमतेची जागतिक घोषणा आहे. या वैज्ञानिक क्रांतीसोबतच भारताने देशाच्या ऊर्जा सुरक्षेतही अतिशय मोठी झेप घेतली आहे. दोन हजार तीस सालापर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवणारे एकोणीस हजार कोटी रुपयांचे ’हरित हायड्रोजन’ अभियान, जगातली सर्वार्ंत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे आणि ’शांती कायद्याच्या’ माध्यमातून दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत शंभर गिगावॉट अणुऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट, हे देशाच्या सर्वांगीण विकासाचे आणि भविष्यातील तयारीचे दर्शन घडवते. जगाला जेव्हा दिशाहीनतेने ग्रासले आहे, तेव्हा सुस्पष्ट धोरणांच्या, अभेद्य राजकीय स्थिरतेच्या आणि वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर भारत एका प्रगत ज्ञान-केंद्रीत समाजाची उभारणी करत आहे. हे सर्वंकष आणि अभ्यासपूर्ण विवेचन एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामाजिक, आर्थिक न्यायाच्या आणि महासत्तेच्या दिशेने जाणार्या प्रवासाचा एक अतिशय वस्तुनिष्ठ आलेख असून, नव्या आणि बलशाली भारताच्या उज्ज्वल भविष्याची ती एक ठाम आणि आश्वासक नांदी आहे.
India’s soaring leap!