प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक विधान केले गेल्यानंतर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यापेक्षा अधिक तीव्र प्रतिक्रिया विदेशात विशेषतः इस्लामिक देशांमध्ये उमटत आहेत. देशविदेशात पैगंबर यांचा अवमान सहन केला जात नाही, हे अनेकदा सिध्द होऊनही अधूनमधून अवमानाचा विषय चर्चेत येत असतो. पैगंबर यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच पक्षाचे दिल्ली माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली. अवमानकारक विधान केल्यानंतर उत्तर प्रदेशातीस कानपूर येथे दंगल उसळली. मुंबईत याप्रकरणी एक गुन्हाही दाखल झाला.
या प्रकरणाची तीव्रता वाढत चालल्यानंतर आणि ते अंगाशी येत असल्याचे पाहून भाजपाने ही कारवाई आठवडाभराने केली आहे. तोपर्यंत प्रकरण तापत गेले. मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जगभरातील मुस्लिम धर्मियांना अपार आदर आहे. त्यांचा अवमान मुस्लिम धर्माचे लोक सहन करत नाहीत. हे यापूर्वी जगभरात अनेकदा सिध्द झाले आहे. विदेशातील काही वर्तमानपत्रांनी मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्रे काढून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या तेव्हा जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याचे एक उदाहरण म्हणजे फ्रान्समधील ’शार्ली हेब्दो’ हे साप्ताहिक. इस्लामचे संस्थापक पैगंबर यांची व्यंगचित्रे छापल्यावरुन शार्ली हेब्दोच्या कार्यालयावर 2015 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 12 कर्मचारी ठार झाले होते.
त्यानंतर सन 2020 साली फ्रान्समधील एका शाळेच्या इतिहास शिक्षकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? हे समजावून सांगण्यासाठी शार्ली हेब्दोमधील मोहम्मद पैगंबर यांची व्यंगचित्रे दाखविली. याचा राग आल्याने एका मुस्लिम तरुणाने त्या शिक्षकाचा शिरच्छेद केला. यानंतर फ्रेंच सरकारने इस्लामी कट्टरपंथियांच्या विरोधात मोहीम सुरू करत छापे टाकले. यावरुन मुस्लिम देशांमध्ये फ्रान्सविरुध्द संताप व्यक्त करण्यात येत असतानाच फ्रान्समधील नीस शहरातील एका चर्चमध्ये चाकू हल्ल्यात एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोराने ‘अल्लाह हू अकबर’चे नारे दिले होते. या घटनेचा उल्लेख फ्रान्सने दहशतवादी हल्ला, असा केला होता. हा इतिहास फार जुना नाही. कोणत्याही धर्मसंस्थापकाचा अवमान करणे उचित ठरत नाही. शेवटी हा भावनांचा प्रश्न आहे. अनेक मुस्लिम देशांमध्ये दहशतवादी संघटना कार्यरत आहेत.
इस्लाम किंवा मोहम्मद पैगंबरांविषयी काही विपरित घडले की, या संघटना बदला घेण्यास पुढे सरसावतात आणि रक्तपात घडवून आणतात. सर्वसामान्य मुस्लिमांचे अशा हिंसक घटनांनाना समर्थन लाभत नाही. मात्र, पैगंबरांचा अवमान होत असेल, तर त्यांच्या भावना दुखावल्या जाणे स्वाभाविक आहे. भारतात हिंदू-मुस्लिम संघर्ष अनेक कारणांनी होतच असतो. त्यात कधी मशीद, तर कधी मंदिर हे विषय येतात. सध्याही देशात तेच सुरू आहे. भारतातील मुस्लिमांचा संबंध नेहमीच पाकिस्तानशी जोडला जातो. पाकिस्तान आणि काश्मीर हा एक राजकारणासाठी वापरला विषय आहे.
परंतु, मोहम्मद पैगंबराचा संबंध केवळ पाकिस्तानशी नाही, तर संपूर्ण इस्लाम जगताशी आहे, हे लक्षात घेतले गेले पाहिजे. नुपूर शर्मा यांनी हेच लक्षात घेतले नाही. त्याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर हे प्रकरण गेले आणि इस्लामिक देशांच्या संघटनेने नुपूर शर्मा यांचाच नव्हे, तर भारत सरकार आणि भाजपाचा निषेध केला. इतकेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दोष दिला जात आहे.
इस्लामिक देशांची भूमिका
प्रकरण तापत असल्याचे पाहूनच नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्षावर कारवाई करण्यात आली. नुपूर शर्मा यांनी आपले विधान मागे घेत असल्याचे जाहीर केले. या कारवाईचे काही इस्लामिक देशांनी स्वागत करतानाच निषेधही केला. इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारणही केले. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेने नुपूर यांच्या विधानाची निंदा केली. तसेच संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. येथपर्यंत प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. मात्र, बहरीन आणि कुवेत देशातील नागरिकांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार घातला आहे.
तसेच कुवेतमधील काही कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले. यावरुन पैगंबर यांचा अवमान इस्लाम जगतात सहन केला जात नाही, हेही अधोरेखित होत आहे. भारतात अल्पसंख्यांकांवर अन्याय वाढला असल्याचे अमेरिकेतील एका अहवालात म्हटले होते. त्यावरुन भारताने अमेरिकेला चांगलेच फटकारले होते. ही ताजी घटना असताना भारतात सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या मोहम्मद पैगंबराचा अवमान करत असतील, तर त्यांचा मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, हेही जगभर जाऊन पोहचले आहे. फ्रान्सने मुस्लिम कट्टरपंथियांच्या विरोधात कारवाई केली तेव्हा फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी करत कुवेत, जॉर्डन आणि कतारच्या काही दुकानांमधून फ्रेंच उत्पादनं काढून टाकण्यात आली होती. इराक, लिबिया आणि सीरियामध्येही फ्रान्सच्या विरोधात निदर्शने झाली होती. सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान, बांगलादेश इत्यादी देशांतही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भारताबाबतही आता तसेच काहीसे होत आहे.
‘हे’ उचित नाही
रझा अकादमीचे मुंबईतील सहसचिव इरफान शेख यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईत 28 मे रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आपण कोणतेही आक्षेपार्ह किंवा चुकीचे विधान केले नसल्याचा दावा नुपूर शर्मा यांनी केला होता. प्रकरण तापल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले. मात्र, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, तर ही गंभीर बाब आहे. याची दखल दिल्ली पोलिसांनी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यावरुन अवमान केला जात असेल, तर तोही उचित म्हणता येत नाही. नुपूर शर्मा यांच्या विधानांवरुन कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केले होते. मात्र, कुवेतमधील प्रकरणावरुन कॉंग्रेसने देशाच्या पंतप्रधानांचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन कुवेतमधील घटनेचा निषेधही केला.
मोहम्मद पैगंबरांच्या अवमानाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेण्याची इस्लामिक देशांच्या भूमिकेवर भारताने टीका केली आहे. यातून या देशांची सांप्रदायिकता दिसून येत असल्याचे भारताने म्हटले आहे. धर्मावर जी अवमानकारक टिप्पणी करण्यात आली तिचा भारत सरकारशी संबंध नाही. अवमानकारक टिप्पणी करणार्या व्यक्तीवर संबंधित संस्थेकडून यापूर्वीच कठोर कारवाई करण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. ही भूमिका रास्त असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि केंद्र सरकारवर टीका करण्याची नवीन संधी इस्लामिक देशांना मिळाली आहे. भाजपाने या प्रकरणावर पडदा टाकला असला, तरी इस्लामिक देश आणि त्या देशांतील संघटनांचे समाधान होणे तितकेच महत्वाचे आहे.
हे ही वाचा :