– ज्योती काळे- जाधव
तरुणाईच्या डोळ्यांत स्वप्नं,
मनात नवी उमेद आहे,
तरी तिच्याच भविष्याभोवती
आज प्रश्नांची गर्दी आहे,
जिच्या खांद्यावर उद्याच्या
भारताची सारी जबाबदारी आहे,
तिच्याच भविष्याची आज
रस्त्यावर लढाई सुरू आहे!
विकासाच्या गप्पांआधी शिक्षणाचा पाया मजबूत हवा! मी दिल्लीत जाऊ शकत नाही. मी संसदेसमोर उभी राहून प्रश्न विचारू शकत नाही. माझ्या हातात सत्तेची ताकदही नाही आणि निर्णय घेण्याचे अधिकारही नाहीत. पण माझ्या हातात लेखणी आहे… आणि प्रश्न विचारण्याइतकी ती नक्कीच ताकदवान आहे. आज म्हणूनच ही लेखणी एका अस्वस्थ प्रश्नासाठी उचलावीशी वाटते ज्या देशाला आपल्या शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून शिक्षक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना आंदोलन करावे लागते, त्या देशाने विकासाच्या गप्पा तरी कोणत्या तोंडाने माराव्यात? उंच इमारती म्हणजे विकास? चकचकीत रस्ते म्हणजे विकास? आकाशाला भिडणारे पूल, धावणार्या मेट्रो आणि हातात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच देश पुढे गेला, असे समजायचे का? जर एखाद्या गावातील मुलाला आजही दर्जेदार शिक्षणासाठी मैलोन्मैल चालावे लागत असेल, एखाद्या गरीब बापाला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे लागत असेल, शिक्षकांना आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल आणि शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनाच आवाज उठवावा लागत असेल, तर आपल्या विकासाच्या व्याख्येतच कुठेतरी मोठी चूक झाली आहे. कारण देशाचा खरा विकास आकाशाला भिडणार्या इमारतींच्या उंचीने मोजला जात नाही; तो शाळेच्या बाकावर बसलेल्या शेवटच्या मुलाच्या डोळ्यांत किती मोठं स्वप्न जिवंत आहे, यावर मोजला जातो. आणि ज्या दिवशी त्या मुलाच्या हातातील पुस्तकासाठी रस्त्यावर आंदोलन करावे लागते, त्या दिवशी प्रश्न फक्त शिक्षणव्यवस्थेचा राहत नाही तो संपूर्ण देशाच्या भविष्याचा प्रश्न बनतो.
नुकतेच एक चित्र समोर आले. ते चित्र पाहिले आणि मन अक्षरशः सुन्न झाले. एक विद्यार्थी एका हातात फुल, तर दुसर्या हातात ‘माझं भविष्य वाचवा’ अशी आर्त विनवणी करणारा फलक घेऊन उभा होता. ज्या वयात त्याने भविष्याची स्वप्ने पाहायची, त्या वयात तो स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी जणू भीक मागत होता. त्याच्या हातातील ते फूल शांततेची भाषा बोलत होते; पण त्याच्या डोळ्यांतील प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला जाब विचारत होता…मला फक्त शिकायचं आहे माझं भविष्य घडवायचं आहे त्यासाठीही मला रस्त्यावर उतरावं लागणार का?’
एखाद्या देशासाठी यापेक्षा वेदनादायी चित्र दुसरे कोणते असू शकते? कारण जेव्हा देशाचा विद्यार्थी हातात पुस्तकाऐवजी आंदोलनाचा फलक घेऊन आणि हक्काऐवजी भविष्याची भीक मागताना दिसतो, तेव्हा पराभव त्या एका विद्यार्थ्याचा नसतो….तो संपूर्ण व्यवस्थेचा असतो.शिक्षणासाठी आंदोलन हीच शोकांतिका…. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना विद्यार्थ्यांना त्यासाठी रस्त्यावर का उतरावं लागतं? विद्यार्थ्याला त्याच्या हक्काच्या शिक्षणासाठी हात जोडावे लागत असतील, तर प्रश्न त्या विद्यार्थ्याच्या भविष्याचा नाही; प्रश्न आपल्या व्यवस्थेच्या वर्तमानाचा आहे. जेव्हा देशाची तरुणाई रस्त्यावर उतरून प्रश्न विचारते, तेव्हा तिच्या आवाजाकडे केवळ आंदोलन म्हणून पाहून चालणार नाही. त्या घोषणांच्या मागे कित्येक वर्षांची मेहनत, आई-वडिलांची स्वप्ने आणि स्वतःच्या भविष्याची चिंता दडलेली असते. विद्यार्थ्याला वर्ग सोडून रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर त्याला गप्प करण्याआधी तो रस्त्यावर का उतरला, हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे.
प्रश्न विचारणारी तरुणाई देशासाठी धोकादायक नसते; उलट प्रश्न विचारण्याची हिंमत गमावलेली तरुणाई ही अधिक चिंतेची बाब असते. आजचा तरुण केवळ स्वतःसाठी बोलत नाही. तो शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी, समान संधीसाठी आणि आपल्या सुरक्षित भविष्यासाठी आवाज उठवत असतो. त्याचा आवाज ऐकणे म्हणजे त्याच्यावर उपकार करणे नव्हे; तर त्याच्या भविष्याप्रती असलेली व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारणे होय.
आज प्रश्न एवढाच नाही की विद्यार्थी रस्त्यावर का उतरले आहेत. खरा प्रश्न हा आहे की त्यांना वर्गखोल्यांतून रस्त्यावर आणणारी परिस्थिती निर्माणच का झाली? त्यांच्या हातात पुस्तक असायला हवे होते, पण फलक का आला ओठांवर स्वप्नांची भाषा असायला हवी होती, पण घोषणा का आल्या; आणि ज्या वयात भविष्य घडवायचे होते, त्याच वयात ‘आमचे भविष्य वाचवा’ म्हणण्याची वेळ का आली. यापेक्षा मोठे व्यवस्थेचे अपयश कोणते असू शकते? आपण उद्याच्या भारताची कितीही सुंदर चित्रे रंगवू, पण आजच्या विद्यार्थ्याचे भविष्यच सुरक्षित नसेल, तर विकास अपूर्णच राहील. कारण देश नकाशावरच्या सीमांनी मोठा होत नाही, तो आपल्या तरुणांच्या स्वप्नांना किती मोठे आकाश देतो यावर मोठा होतो.
चंद्रावर जाण्याचे नवे रस्ते शोधण्यापेक्षा, शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईच्या पायाखालचा रस्ता आधी मजबूत करण्याची गरज आहे. कारण चंद्र गाठणारा देश तेव्हाच खर्या अर्थाने प्रगत म्हणता येईल, जेव्हा त्याच्या तरुणाईला आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागणार नाही.कारण भविष्य अंतराळात नाही, तर आज न्यायासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या या तरुणांच्या डोळ्यांत आहे
शेवटी एवढंच….देशाच्या भविष्याची स्वप्नं पाहताना त्या भविष्याच्या शिल्पकारांनाच विसरू नका. विद्यार्थ्यांच्या हातात आंदोलनाचे फलक नव्हे, पुस्तकं शोभतात.. त्यांच्या ओठांवर ‘माझं भविष्य वाचवा’ ही विनवणी नव्हे, तर ‘माझं भविष्य मी घडवेन’ हा आत्मविश्वास शोभतो. कारण आज आपण विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला नाही, तर उद्या इतिहास आपल्याला एकच प्रश्न विचारेल…देश विकासाच्या गप्पा मारत राहिला, पण त्या विकासाचे भविष्य रस्त्यावर का उभे होते?
शिक्षणासाठी उठलेला आवाज कधीच व्यर्थ जात नाही, कारण त्या आवाजात एका संपूर्ण पिढीचे भविष्य दडलेले असते.
आज त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या,
उद्या तेच देशाला नवी दिशा देतील;
कारण विद्यार्थ्यांचे भविष्य वाचले,
तरच या देशाचे भविष्य वाचेल!
तरुणाईचा आवाज दाबून
विकास साधता येणार नाही,
तिच्या स्वप्नांना तोडून
देश घडवता येणार नाही
शिक्षणासाठी जिथे
भविष्यालाच रस्त्यावर उतरावं लागतं,
तिथे विकासाच्या गप्पांनी
वास्तव बदलता येणार नाही!
Is Education a Right or a Struggle?