दिवाळीच्या दिवशी पूजेच्या वेळी लक्ष्मीची पावले असलेला छापा काही सापडेना. सध्याच तर घर आवरले, तेव्हा तर होता, पण आता कुठे ठेवलाय हे काही केल्या आठवेना. म्हणून मुलाने पटकन दुकानात जाऊन दहा रुपयाचा नवा छापा आणला आणि विषय संपवला. खरेतर विषय संपवला नाही तर फक्त बाजूला ठेवला. दहा- वीस रुपयाची तर वस्तू आहे, त्यावरून एवढा काय विचार करायचा असे म्हणतं अशा किती तरी वस्तू आपण चटकन पर्याय म्हणून घेऊन टाकतो.
अनेक वस्तू आपण गरज असेन तेव्हाच शोधतो बाहेर काढतो, एरवी ती वस्तू कुठल्यातरी कोपर्यात किंवा कपाटात किंवा एखाद्या ड्रॉवरमध्येे पडून असते. अनेकदा तर आपल्या लक्षात हीं नसते ती वस्तू आपलीकडे असल्याचे. अगदीच खूप गरज भासली तर मग शोधाशोध सुरू होते. पूर्वी या वस्तूंनाही फारसा पर्याय उपलब्ध नसल्याने आहे ते नीट आठवणीने जपून ठेवले जायचे. शिवाय ते कोठे ठेवले आहे याचीही आठवण ठेवली जायची.वस्तू फक्त गरजे्पुरत्या वापरून फेकायच्या नसतात तर त्यांना सांभाळून ही ठेवायचे असते हा विचार मनावर बिंबलेला असावा. हल्ली अनेक पर्याय सहज उपलब्ध होतं असल्यामुळे पटकन नवीन खरेदी केली जाते.
आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय सहज उपलब्ध असतात. त्यातील नेमके काय घ्यावे हा आणखी आपला गोंधळ उडतो. जेवढे जास्त पर्याय उपलब्ध तेवढा जास्त गोंधळ. असे अनेक पर्याय उपलब्ध असणे हे काही ठिकाणी चांगले हीं असते. जसे की शिक्षण घेताना विषयांचा पर्याय निवडता येणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. जे उत्तम जमते ते निवडून प्रगती करता येते. पण या पर्याय मधून योग्य निवड करता आली नाही तरी दिशा भरकटू शकते. त्यामुळे निर्णय हा विचार पूर्वकच घ्यावा.
सध्या तर फक्त वस्तूच नाही तर व्यक्तीकडे आणि नात्याकडेही पर्याय म्हणून पहिले जाते. आपणहून बोलणार्या आणि जोडून राहण्यासाठी प्रयत्नशील असणार्यांंना तर हमखास पर्याय म्हणून च बघितले आणि वागवले जाते. प्रेम, मैत्री किंवा नाती जपणार्या व्यक्तीच्या भावनांचा आदरसुद्धा केवळ गरजेनुसार केला जातो. ही व्यक्ती नेहमीच उपलब्ध असतेच किंवा ही व्यक्ती कुठेच जाऊ शकत नाही हे गृहीत धरून अनेकदा त्यांना केवळ एक पर्याय म्हणून वागवले जाते. त्यांच्या त्यागाची वेळेची मुळीच किंमत ठेवली जात नाही. आणि अशा व्यक्ती सोडून गेल्या तरी त्याची फारशी दाखल घेतली जात नाही.
अशा वेळी आपल्याकडे केवळ पर्याय म्हणून बघणार्यांना वेळीच दूर करायला हवे. आपल्या वाचून त्यांचे काही अडत नाही, केवळ गरजेच्या वेळी आठवण काढली जाणे आणि इतर वेळी दुर्लक्षित करणे किंवा चक्क विसरून जाणे असे वागणार्या व्यक्ती या घातक असू शकता. त्यांच्या स्वार्थासाठी ते कधी गोड बोलून आपला बळी देतील हे लक्षतही येत नाही. या सगळ्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होऊ शकतो. एकटेपणा आणि नैराश्याच्या गर्तेत अडकले जाऊ शकते.
स्वतःवरचा विश्वास उडू शकतो. अशावेळी स्वतःला सांभाळणेे ही प्राथमिकता असावी. ज्या नात्यात आपल्याला कायम पर्याय म्हणून बघितले जात असेन, तेथून शांतपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. हे शक्य नसेन तर किमान दुर्लक्ष करावे. आपला मौल्यवान वेळ, आपल्या भावना अशा लोकांसाठी वाया घालवू नये. तुमची किंमत ही समोरच्या व्यक्तीच्या वागणुकीवरून ठरत नाही. तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात आणि तुम्हाला सन्मानाने वागवले जाणे हा तुमचा अधिकार आहे. नाते हे एका बाजूने कधीही चालत नाही. जर तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीला महत्त्व देत असाल, तर त्याबदल्यात तुम्हालाही तेवढेच महत्त्व मिळणे गरजेचे आहे, अन्यथा अशा लोकांच्या मागे धावणे थांबवा. वस्तू हा पर्याय असू शकतो पण माणूस नाही. आणि माणसाला पर्याय म्हणून बघणार्यांचा आपण पर्याय म्हणूनसुद्धा विचार न केलेलाच बरा.
Isn’t that an option for you?