*जय जय श्री राम…!*

 

डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822447732

 

 

उद्या सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४, हा दिवस भारताच्या आणि सनातन धर्माच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिला जाणार आहे. हिंदू धर्माच्या दोन महान पौराणिक कथांपैकीचे रामायण या कथेचे आदर्श महानायक, मर्यादा पुरुषोत्तम, दशरथपुत्र भगवान श्री रामाच्या अतिभव्य अशा मंदिरात प्राण प्रतिष्ठापना या दिवशी होणार आहे. पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मस्थानी त्यांची प्रतिष्ठापना होणे, ही साधणार बाब नव्हे. या मुहूर्तावर खऱ्या अर्थाने दिवाळीच साजरी व्हायला हवी. देशातील प्रत्येक हिंदूंने आपापल्या घरी दिवाळी प्रमाणे रोषणाई करावी, गोड-धोड करावे, सडा-रांगोळ्या काढाव्या, पूजा-अर्चा-आरत्या कराव्या, गुढ्या उभराव्या, मिठाई-प्रसाद वाटावे. ही घटिकाच अशी आहे की, या जन्मी असा सोहळा बघणे होणार नाही. इतिहासाचे आपण सर्व जण साक्षीदार असणार आहोत. म्हणूनच तर, गेल्या काही महिन्यांनापासून केंद्रीय तसेच राज्य पातळीवर, सर्व हिंदू राजकीय पक्ष, संघ, संघटना यासाठी जीवाची पराकाष्ठा करत आहे. लाखो-करोडो कार्यकर्ते आणि स्वयंसेवक या सोहळ्याला आपले द्रव्य, श्रम, आणि वेळ अर्पण करण्यास उत्सुक आहेत. आपणही, या घटनेच्या क्षणांची आठवण आपल्या जीवनात कायमस्वरूपी स्मरणात राहतील, असे काहीतरी करावे, असे मला वाटते.

मला आठवतं, तीस वर्षापूर्वी हे राम मंदिर व्हावे म्हणून हिंदुत्ववादी राजकीय पक्षांनी देशभर रथयात्रा काढली होती. त्या रथयात्रेच्या सांगतेच्या ठिकाणी गदारोळ मजला असतांना, त्याच गडबडीत तिथे असलेली वस्तू जमीनदोस्त करण्यात आली होती. तेव्हापासून हा विषय भारतीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून खूप प्रभावी बनला आहे. नंतर हा मामला कोर्टात गेला आणि अखेरीस सर्व बाजू तपासून मा. सर्वोच्च न्यायालयाने यावर सर्वमान्य तोडगा काढून राम मंदिर उभारणीचा रस्ता मोकळा केला. हिंदू धार्जिन्या राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर अनेक निवडणुका लढल्या, त्या जिंकल्या सुद्धा. शेवटी मंदिर बांधण्यास यश आलेच. देशातील हिंदूंना दिलेला शब्द पाळला, जाहीरनामा खरा करूनच दाखवला. धार्मिक दृष्टीकोणातून हे मंदिर बनणे महत्वाचे आहेच, परंतु सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही याचे अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू राष्ट्रात पाच शतकाच्या संघर्षानंतर हिंदूंच्या देवतेचे मंदिर होणे, ही आनंदाची बाब नाही का?

आयोध्या प्रकारण मार्गी लागले, असे म्हणायला हरकत नाही. या खेरीज मथुरा, काशी, वृंदावन व इतर अनेक ठिकाणी अशाच स्वरूपाचा वाद आहे. आता हळू हळू एकेक मुद्दे मार्गी लागतील, अशी आशा करायलाही हरकत नाही. त्यासाठी किती अवधी लागेल, हे सांगणे जरा अवघड आहे. सध्याच्या भारत देशाची वाटचाल एका हिंदुत्ववादी देशापासून सुरू झाली असून ती एक हिंदू राष्ट्र बनून थांबेल, असेच दिसते आहे. एक हिंदू म्हणून मला याचा अभिमानच आहे. हिंदू कट्टरवाद वाढीस लागलेला जाणवतो आहे. अशीच काहीशी परिस्थिती धर्माच्या आधारावर भारतापासून वेगळे झालेल्या पाकिस्तानात होती, आणि आहे देखील. मागील पंचाहत्तर वर्षातील दोन्ही देशांचा प्रवास बघितला तर पहिलीच्या मुलालाही त्यातील फरक लक्षात येईल. भारत आज चांद्रवरच नव्हे तर सूर्य आणि मंगळावर जाण्याच्या तयारीत आहे. स्वावलंबन तर आहेच, त्याचसोबत जगाला तारण्याची क्षमता ठेवतो आपण. तीन ट्रेलियन अर्थव्यवस्था होऊ पाहत असून महासत्ता आणि विश्वगुरु होण्यास फारसा वेळ लागणार नाही, अशी चिन्हे आहेत. ही कमाल मागील पंचाहत्तर वर्षातील भारतीय जनतेच्या आणि नेत्यांच्या श्रमाचे फलित आहे. केवळ मागील दहा वर्षांच्या काळातील प्रयत्नांना श्रेय दिल्यास, त्याआधीच्या पायाभरणीच्या प्रयत्नांवर अन्याय केल्यासारखे होईल.

असो, हा आपला आजचा विषय नाही. विषय असा आहे की, गेली पंचाहत्तर वर्ष पाकिस्तान धर्माच्या आधारावर राजकारण करत आहे. त्याला जोड असते ती भारत द्वेषाची. या दोन मुद्द्यांच्या आधारावर पाकिस्तानला आजवरचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, सेना प्रमुख आणि हुकूमशहा लाभले आहेत. सर्वांचे मुद्दे एकसमान असतांनाही मागील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांची हत्या किव्हा जीवानिशी शिक्षा झालेली आहे. देशाच्या निर्मितीपासून तिथे धर्माच्या आधारावर नियम, कायदे तसेच समाज व्यवस्था आणि नागरिकांची मानसिकता निर्माण झालेली आहे. इस्लाम विरोधी व्यक्ती हा देशद्रोहीच आहे, तो देशासाठी धोकेदायक आहे, आतंकवादी आहे. इस्लामेतर धर्मांना तिथे मान्यता नाही, विशेषतः हिंदू धर्माविरुद्ध प्रचंड राग, संताप, द्वेष आणि मत्सर. त्या लोकांना मुख्य प्रवाहात स्थान नाही. हिंदू बहुल भारत देशाचा द्वेष करणे, आतंकी कारवाया करणे, त्रास देणे, विरोध करणे हेच संस्कार आणि विचार तेथील नेत्यांनी प्रत्येक पाकि नागरिकांत रुजवलेले आहे. प्रत्येक क्षेत्रात आणि स्तरावर स्वधर्म प्रेम आणि परधर्म द्वेष पेरला गेला आहे, आणि पुढेही येणारा प्रत्येक नेता असेच विचार पेरत राहणार आहे, यात काही शंकाच नाही.

मनात एक विचार शिवून गेला की, भारतातही असेच काहीसे सुरू झाले आहे की काय? नसेल तर उत्तमच. परंतु, असे असेल तर ती धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घ्यावे. देशाच्या अधोगतीची सुरवात झाली आहे, असेच समजावे. तिथे इस्लाम धार्जिन्या नेत्यांनी पाकिस्तानाला देशोधडीला लावले आहे. अर्थव्यवस्था तर कोलमडलेली आहेच, परंतु तेथील नागरिकांचे दैनंदिन जगणेही मुश्किल झाले आहे. त्यांना तारण्यासाठी कोण पुढे येणार, हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु वस्तुस्थिती अशी की धर्मांध आणि धर्मेतर द्वेषी राजकारणाने देशाला रसातळाला नेले आहे. तिथे मूलभूत विकास, प्रगती, निर्मिती, उद्योग, अर्थकारण, पर्यावरण हा विषयच नाही. शिक्षण, कृषी आणि आरोग्याचे तीनतेरा वाजलेले आहे. आपल्याकडे विकास होत आहे. परंतु, विकासावरचे लक्ष विचलित होऊन धर्मावर लक्ष केंद्रित होतांना दिसते आहे. हळू हळू धर्मावर आधारित राजकारण होत आहे. आता धर्माच्या पलीकडे जातीजातीत तेढ निर्माण होत आहे. प्रांतवाद तर आहेच, त्यात भर म्हणून भारतीय राजकारणाची पातळी घसरली आहे. नीतिमत्ता, तत्व, निष्ठा, ध्येय-धोरण, जनकल्याण ही वृत्ती भारतीय राजकारणातून गायब झाली आहे, हे आपणही मान्य करालंच. तसा विचार केला तर, आपल्याकडे खूप काही वेगळे चित्र आहे, असे अजिबात नाही. म्हणून धोक्याची घंटा!

बरं, वादग्रस्त रामजन्मभूमी ही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला विभाजित करून दिलेली आहे. हिंदूंनी त्यांना मिळालेल्या जागेत भव्य मंदिर बांधले आहे. असे समजते की मुस्लिम समाजही तिथे एक भव्य मस्जिद बांधण्याच्या तयारीत आहे. असे समजा की, कोण भव्य वस्तू बांधणार अशी दोन्ही समाजात चढाओढच लागलेली आहे. मुस्लिमांनी अतिभव्य मस्जिद बांधलेली ही बाब हिंदूंना रुचनार आहे का? हे ही बघणे महत्वाचे आहे. प्रथमतः त्याला इस्लामी राष्ट्रांकडून अर्थसहाय्य मिळणार, त्यांचे धर्मगुरू उद्धघाटनास व नमाज अदा करण्यास येतील. हे मान्य करण्याइतपत हिंदूंचे औदार्य आणि सहिष्णुता राहील का? हाही मुद्दा आहेच. आपापल्या धर्माचे अतिभव्य प्रार्थना स्थळ व्हावे, ही अस्मिता असणे स्वाभाविक आहे, परंतु हे कितपत गरजेचे आहे, याचा दोन्ही समाजाला व त्यांच्या नागरिकांना कितपत फायदेशीर राहणार आहे. याचा विचार व्हावा. धर्माच्या आधारावर जनतेत तिढा निर्माण करण्यात देशाचे हित आहे का? अशा वास्तूंच्या उभारणीत देशाचे आर्थिक, श्रमिक आणि वेळेचे संसाधने खर्च करण्यात शहाणपणा आहे का? या वास्तू देशाच्या विकासात कितपत योगदान देणार आहेत? आयोध्या झाले, आता वृंदावन, मथुरा, काशी, द्वारका आणि इतर ठिकाणीही याचीच पुनरावृत्ती होणार आहे का? याचा विचार भारताच्या सुज्ञ आणि पुरोगामी विचारधारेवाल्यांनी करावा, एव्हढीच अपेक्षा…! (क्रमशः)

*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822447732

Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago