संपादकीय

जो जिता वही सिकंदर…

देवयानी सोनार

निष्ठावानांना डावलून आयारामांना घातलेल्या पायघड्या, प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तपोवनातील वृक्षतोडीवरून पेटलेला वणवा आणि भाजपातीलच अंतर्गत कुरबुरी, रडारड, एबी फॉमर्र्र्र्र्र् वाटपाचा सावळा गोंधळ, आयारामांवरून झालेला राडा, अशा सर्व परिस्थितीत महापालिकेत भाजपाला फटका बसेल आणि शिवसेना शिंदे गटाची सरशी होईल, असे वातावरण निर्माण झालेले असताना, भारतीय जनता पार्टीने सलग दुसर्‍यांदा महापालिकेत ’कमळ’ फुलविले. मागील वेळेपेक्षा सहा जागा जास्त निवडून आणत कुंभमेळामंत्री आणि भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन हे खर्‍या अर्थाने विजयाचे सिकंदर ठरले आहेत.

नाशिक महापालिकेची तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या निवडणुकीत यावेळी अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले होते. त्यातही भाजपा हा सत्तेतील पक्ष असल्याने त्यांच्याकडेच सर्वाधिक ओढा होता. त्यामुळे इतर पक्षातील अनेक मंडळी भाजपात निवडणुकीच्या तोंडावर येत होती. बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत तशीच अवस्था भाजपाची झाली. नाशिकमध्ये तर येईल त्याला प्रवेश देण्याच्या प्रकारामुळे इच्छुकांची संख्या वाढत गेली. त्यातच भाजपाने शंभर प्लसचा नारा दिल्यामुळे भाजपाने इतर पक्षांतील वजनदार मंडळींना हेरून त्यांच्यासाठी रेडकार्पेट अंथरून दिले. इतर पक्षातील या आयारामांमुळे निष्ठावान दुखावले गेले. काहींनी राडा केला. अश्रू ढाळले. पण शंभर प्लसच्या इरेने पेटून उठलेल्या भाजपेयींपर्यंत हा विरोध पोहोचूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच तपोवनाचा मुद्दाही काही मंडळींनी चांगलाच पेटविला. निवडणुकीच्या रणधुमाळीत एबी फॉर्मच्या पळवापळवीचे प्रकार घडले. काही ठिकाणी पक्षीय उमेदवाराला माघार घ्यायला लावत अपक्षांना पुरस्कृत करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे प्रारंभी एकप्रकारचे नकारात्मक वातावरण भाजपाच्या बाजूने दिसत असतानाच संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांनी अखेरच्या टप्प्यात सूत्रे हाती घेतली. डॅमेज कंट्रोल केले. आरएसएसची मंडळी त्यांचे काम करीतच होती. महाजनांनीदेखील आपली यंत्रणा राबवत काटेकोर नियोजन केल्यामुळे भाजपा 66 वरून 72 वर पोहोचली. सलग दुसर्‍यादां भाजपाचा झेंडा ’रामायण’वर फडकणार आहे.
भारतीय जनता पार्टीत आयारामांवरून जो मोठा गहजब माजला होता तो महाजन यांनी या मंडळींना निवडून आणत आपला निर्णय योग्य होता. हे एकप्रकारे सिद्ध केल्याने आयारामांवर बोलणार्‍यांची आता बोलती बंद झाली आहे. सातपूरमधून दिनकर पाटील, पंचवटीतून गुरुमित बग्गा, बबलू शेलार, जयश्री गायकवाड, शाहू खैरे, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर या मंडळींना पक्षात केवळ प्रवेशच दिला नाही तर ते निवडूनही आले. माजी महापौर अशोक मुर्तडक, नितीन भोसले यांनी अगोदर भाजपात प्रवेश केला. मात्र, तिकीट न मिळाल्याने त्यांनी लगेच अन्य पक्षाची वाट धरली. दुर्दैवाने या मंडळींना महापालिका निवडणुकीत यश मिळू शकले नाही. सातपूर भागात मनसेतून भाजपात आलेल्या दिनकर पाटलांमुळे सातपूर भागात भाजपा मजबूत स्थितीत आली आहे. पंचवटीतही अशीच परिस्थिती आहे. माजी महापौर यतीन वाघ यांना भाजपा प्रवेश फारसा फलद्रूप होऊ शकला नाही. उलट भाजपाने काही मंडळींच्या अहंकारामुळे हातातील जागा घालविल्या. प्रभाग 26 मध्ये अलका अहिरे या विद्यमान नगरसेविका असताना तेथे नवख्या पवार नामक महिलेला उमेदवारी दिली. मुकेश शहाणे, कमलेश बोडके या मंडळींचा वॉर्डातील एकूणच प्रभाव लक्षात घेता त्यांच्या ऐवजी भलत्याच उमेदवाराला मैदानात उतरविले. पण जनमताचा कौल या मंडळींच्या बाजूने होता, हे लक्षात घ्यायला हवे होते. भारतीय जनता पार्टीचे शहरातील तिन्ही आमदारांनी आपापल्या मंडळींसाठी चांगली ताकद लावली होती. बबलू शेलार यांना उमेदवारी मिळते की नाही? याची चिंता आ. देवयानी फरांदे यांना लागून होती. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी देत फरांदेंना सुखद धक्का दिला. आ. सीमा हिरे यांच्या हट्टामुळे अलका अहिरेंना अधिकृत उमेदवारी असतानाही त्यांना माघार घ्यायला लावली. पण त्यांनी माघार न घेतल्याने दोघांच्या भांडणात शिंदे गटाच्या उमेदवाराला फायदा झाला. दीपक बडगुजर यांच्यासाठी मुकेश शहाणे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. उलट मागच्या वेळी बडगुजरांच्या घरात दोन नगरसेवक होते. आता ती संख्या एकवर आली आहे. सीमा हिरे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या. प्रभाग सातमध्ये त्यांचे दीर योगेश हिरे यांना शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांनी सात हजारांहून अधिक मतांनी हरविले. बडगुजर सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले. यात दिनकर पाटील उजवे ठरले. त्यांनी मुलाला निवडून आणतानाच संपूर्ण पॅनल तर निवडून आणलेच. शिवाय सातपूर भागात सर्वच ठिकाणी ’कमळ’ फुलविण्याचा चमत्कार केला. आपला वारसा आपल्या घरातील मंडळींकडे सोपविणार्‍या मंडळींनाही या निवडणुकीत बर्‍यापैकी यश आले. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांची कन्या संध्या कुलकर्णी, भाजप नेते विजय साने यांचा मुलगा अजिंक्य साने, माजी महापौर विनायक पांडे यांची सून आदिती पांडे आणि सध्या कारागृहात असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धिश निमसे, माजी नगरसेवक संतोष साळवे यांची कन्या रुचिता, दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल या मंडळींची राजकारणातील एन्ट्री दिमाखात झाली. दुसरीकडे, आमदार हिरामण खोसकर यांची कन्या इंदुमती खोसकर-भोये आणि भाजप नेते सुनील बागूल यांचा मुलगा मनीष बागूल, भाजपाचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांची कन्या नूपुर, सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक, डी. जी. सूर्यवंशी यांची पत्नी यांना मात्र पराभव पत्करावा लागला. कायद्याच्या बालेकिल्ल्यामुळे प्रतिमा डागाळलेल्या प्रकाश लोंढे, त्यांची सून दीक्षा यांनाही जनतेने नाकारले. ऐनवेळी पक्ष बदलूनही जनतेला गृहीत धरणार्‍या मंडळींना मतदारांनीच आराम करण्याचा सल्ला दिला. त्यात प्रकर्षाने अशोक मुर्तडक, यतीन वाघ, नितीन भोसले यांचा प्रामुख्याने उल्लेेख करावा लागेल.
संध्या कुलकर्णी या केवळ माजी महापौरांची मुलगी म्हणून निवडून आल्या नाहीत. पंधरा वर्षांपासून भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून त्यांनी शहरात आपली ओळख निर्माण केली. आदिशक्तीच्या माध्यमातून केलेला सामाजिक जनसंपर्क, महिला बचतगट, आरोग्य शिबिरे, नागरिकांच्या प्रश्नांसाठी उभी राहिलेली भूमिका- यामुळे त्या मतदारांच्या मनात ठामपणे रुजल्या. वारसा त्यांना मिळाला, पण विजय त्यांनी
स्वतःच्या कामातून मिळवला. अजिंक्य साने यांच्या विजयामागे वडील विजय साने यांचे राजकीय वजन होते, पण त्याहून अधिक महत्त्वाचे ठरले ते म्हणजे या भागातील संघटन, तिहेरी लढतीत झालेली मतविभागणी आणि अजिंक्यने तरुणाईशी साधलेला संवाद. एका प्रभागातील दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली आणि त्याचा लाभ भाजपला झाला. आदिती पांडे यांच्या विजयात माजी महापौर विनायक पांडे यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा ठसा दिसतो. रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधा या सगळ्यांची आठवण मतदारांनी ठेवली. इंदुमती खोसकर-भोये आणि मनीष बागूल यांचा पराभव भाजपसाठी धक्कादायक ठरला. संघटनात काम असूनही जनसंपर्क कमी पडणे, पारंपरिक मतदारांचा विश्वास ढळणे आणि स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष- या सगळ्याचा फटका त्यांना बसला.
नूपुर सावजी यांचा पराभव झाला त्यासाठी लक्ष्मण सावजी यांचा जनसंपर्क कमी पडला. गिरीश महाजन यांचा नाशिकच्या राजकारणातील वाढता हस्तक्षेप हा काही मंडळींसाठी टीकाटिपण्णीचा विषय झाला होता. मात्र, त्यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाशिक महापालिकेवर सलग दुसर्‍यांदा मिळवून दिलेली सत्ता पाहता ते केवळ संकटमोचकच नाहीस तर विजयाचे खरे सिंकदर आहेत, हे स्पष्ट होते. नाशिककर जनतेने आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्ता दिली आहे. आता विकासाचे अमृतसिंचन नाशिकमध्ये व्हावे, ही अपेक्षा आहेच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सत्ता मिळाली म्हणून उन्माद न करता आपल्या नगरसेवकपदाचा वापर जनतेच्या सेवेसाठी करावा. यानिमित्ताने एवढेच…

Jo Jita Wahi Sikander…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago