सिन्नर तहसीलसमोर ‘जोडे मारा’ आंदोलन

अशोक खरात विरोधात संताप; फाशीची मागणी, दारणा-गोदावरी पाणीप्रश्नी निवेदन

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सिन्नर तहसील कार्यालयासमोर गुरुवारी (दु. 2) सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने ‘जोडेमारा’ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खरातच्या प्रतिमेला चप्पल मारून संताप व्यक्त केला.त्याच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, तरुण व महिलांनी सकाळी सुमारे 11.30 ते 12.30 या वेळेत आंदोलन केले. अवकाळी पावसामुळे नियोजित धरणे आंदोलनाऐवजी प्रतीकात्मक जोडेमारा आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘बलात्कार्‍याला फाशी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून
गेला.
आंदोलकांनी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्यासह या प्रकरणामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. तसेच 2020 मध्ये खरातच्या फार्महाउसला दारणा धरणाचे पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर दारणा, गोदावरी नदीचे पाणी सिन्नर तालुक्यातील शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही आंदोलकांनी केली. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शरद शिंदे पाटील, शिवाजी गुंजाळ, चिंध्या गुंजाळ, बाबासाहेब शेळके, अरुण पाचोरे, भागवत शेळके, गणपत नाठे, दामोदर आडके, बाळासाहेब आव्हाड यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

‘Jode Mara’ protest in front of Sinnar Tehsil

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *