सिंहस्थात होणार 27 हजार कोटींची उलाढाल

कुंभमेळा प्राधिकरण आणि देआसरा फाउंडेशनचा संयुक्त आराखडा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळा-2027 मुळे सुमारे 27 हजार कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देआसरा फाउंडेशनने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबतच्या ज्ञान भागीदारीअंतर्गत हा अंदाज विकसित केला आहे. ही आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष व प्रेरित खर्चाच्या माध्यमातून घडणार असल्याचे नमूद केले आहे.
अंदाजानुसार, कुंभमेळ्यादरम्यान भाविकांकडून अन्न, निवास, स्थानिक वाहतूक, धार्मिक वस्तू खरेदी आदींवर होणारा प्रत्यक्ष खर्च सुमारे 8,500 कोटी ते 11 हजार कोटींच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या प्रत्यक्ष खर्चातून पुरवठा साखळी, वाहतूक, सेवा आदी क्षेत्रांत सुमारे 7,830 कोटींची अप्रत्यक्ष आर्थिक हालचाल निर्माण होईल. या प्रक्रियेत उत्पन्न वाढलेल्या कामगार आणि व्यावसायिकांकडून होणार्‍या खर्चामुळे सुमारे 10,530 कोटींचा प्रेरित आर्थिक परिणाम अपेक्षित आहे. या सर्व घटकांमुळे एकूण आर्थिक उलाढाल 27 हजार कोटींपर्यंत पोहोचणार आहे. या अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की, भाविकांकडून होणार्‍या प्रत्येक एक रुपयाच्या प्रत्यक्ष खर्चातून अर्थव्यवस्थेत दोन रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त आर्थिक हालचाल निर्माण होते. त्यामुळे सिंहस्थ कुंभ हा केवळ धार्मिक सोहळा नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
ही आर्थिक संधी स्थानिक व्यवसायांपर्यंत पोहोचावी यासाठी देआसरा फाउंडेशनकडून कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने सूक्ष्म व लघुउद्योजकांसाठी सर्वसमावेशक धोरणात्मक आराखडा विकसित केला जात आहे. या आराखड्यात धार्मिक वस्तू विक्री, अन्नसेवा, निवास व्यवस्था, मनोरंजन आणि स्थानिक वाहतूक या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रस्तावित उपक्रमांतर्गत 30 हजारांहून अधिक व्यक्तींना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. मेळा क्षेत्रात सुमारे पाच हजार विक्री जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. देआसरा फाउंडेशनने केलेले हे अंदाज नाशिक कुंभ-2015 आणि प्रयागराज महाकुंभ-2025 याआधीच्या अनुभवांच्या तुलनेत तयार करण्यात आले आहेत.

एकूण आर्थिक उलाढाल : 27 हजार कोटी (प्रत्यक्ष+अप्रत्यक्ष+प्रेरित)
प्रत्यक्ष खर्च : सुमारे 8,500 ते 11,000 कोटी
अप्रत्यक्ष परिणाम : सुमारे 7,830 कोटी रुपये
प्रेरित परिणाम : सुमारे 10,530 कोटी
आर्थिक गुणक परिणाम : एक रुपयाच्या खर्चातून दोन रुपयांहून अधिक अतिरिक्त हालचाल
प्रमुख क्षेत्रे : धार्मिक विक्री, अन्नसेवा, निवास, मनोरंजन, स्थानिक
वाहतूक
ज्ञान भागीदार : देआसरा फाउंडेशन
मोफत प्रशिक्षण : 30 हजारांहून अधिक लाभार्थी
तुलनात्मक आधार : नाशिक कुंभ 2015- तीन कोटी भाविक
प्रयागराज महाकुंभ 2025- 66 कोटी भाविक

Simhastha will have a turnover of Rs 27,000 crores

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *