तरुण

कम्बख्त इश्क

‘प्रेम’ हा शब्द उच्चारला की मनात कोमल भावना, त्याग, समर्पण आणि विश्वास यांचे चित्र उभे राहते. साहित्य, चित्रपट, कविता आणि गाण्यांमधून प्रेमाला नेहमीच जीवनातील सर्वांत सुंदर भावना म्हणून मांडले गेले आहे. पण जेव्हा हेच प्रेम स्वार्थ, मालकी हक्काची भावना, फसवणूक आणि हिंसेच्या मार्गावर जाते, तेव्हा ते प्रेम राहत नाही; ते एक विनाशकारी वेड बनते.
पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने आज संपूर्ण समाज हादरला आहे. सुरुवातीला अपघात वाटणार्‍या या घटनेमागे प्रेमसंबंध, फसवणूक आणि कटकारस्थानाचा संशय व्यक्त होत होता आणि पोलिस तपासानुसार, मृत्यू हा अपघात नसून, पूर्वनियोजित हत्येचा भाग आहे, असे समोरही आले आहे.
एकूणच प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे सर्वांना या घटनेची इत्यंभूत माहिती मिळाली असेलच. मात्र, या घटनेकडे केवळ एक गुन्हा म्हणून पाहणे पुरेसे नाही. हा प्रसंग आपल्या समाजातील बदलत्या नातेसंबंधांचा आरसा आहे. प्रश्न असा आहे की, प्रेमाच्या नावाखाली माणूस इतका क्रूर कसा होतो?
प्रेमात नकार देता येऊ शकतो, मतभेद मांडता येऊ शकतात, अगदी नाहीच काही झाले तर नाते संपुष्टात आणता येऊ शकते. पण त्यासाठी अशी हत्या?
खरंतर एखाद्या व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाकारण्याचा अधिकार कोणालाही नसतो. दुर्दैवाने आज अनेकांना नाते टिकविण्यापेक्षा ते संपविण्याचा हिंसक मार्ग सोपा वाटू लागला आहे. यामागे एक मोठे कारण म्हणजे भावनिक अपरिपक्वता. आजच्या डिजिटल युगात प्रेम पटकन जुळते, पण नाती सांभाळण्याची मानसिक तयारी अनेकदा नसते. सोशल मीडियावरील आकर्षण, तात्पुरत्या भावना आणि सतत नवीन पर्याय उपलब्ध असल्याची भावना यामुळे नात्यांची खोली कमी होत चालली आहे. नाते म्हणजे जबाबदारी, संयम आणि प्रामाणिकपणा हे मूल्य मागे पडत आहेत.
खरंतर दोष प्रेमाचा नसतो. दोष असतो तो प्रेमाच्या नावाखाली वाढणार्‍या स्वार्थाचा..! प्रेम माणसाला मोठं बनवतं, तर स्वार्थ माणसाला हिंसक बनवतो. प्रेम दुसर्‍याच्या आनंदाचा विचार करायला शिकवतं, तर मालकी हक्काची भावना दुसर्‍याला वस्तू समजायला भाग पाडते.
या प्रकरणातून आणखी एक असा प्रश्न उभा राहतो की, आपण आपल्या मुलांना आणि तरुणांना नातेसंबंधांबद्दल नेमकं काय शिकवत आहोत? करिअर, पैसा, यश यासाठी मार्गदर्शन केलं जातं; पण नकार स्वीकारणं, मतभेद हाताळणं, संवाद साधणं आणि नाती सन्मानाने संपवणं याबद्दल त्यांना किती शिकवलं जातं?
आज समाजात अशीही अनेक मंडळी आहेत जी नाती जोडण्याऐवजी तोडण्याचं काम करतात. छोट्याशा वादावर मुलीला वेगळं राहण्याचा सल्ला देणारे, दुसर्‍याचं कुटुंब तुटताना त्यात असुरी आनंद मानणारे किंवा मतभेदांना अधिक चिथावणी देणारे लोक नात्यांमधील दरी वाढवत असतात. अन् सभोवताली हे सर्व बघून लहान मुलांवर याचा आपोआपच संस्कार घडत असतो. मग ते मोठे झाल्यावर त्यांच्याकडून योग्य वागणुकीची अपेक्षा करणारे आपण कोण?
पुण्यातील या संपूर्ण प्रकरणात सर्वांत अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, जर दुसर्‍या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याची इच्छा होती, तर त्यासाठी अनेक कायदेशीर, सामाजिक आणि नैतिक पर्याय उपलब्ध होते. स्पष्ट संवाद साधता आला असता. नातं सन्मानपूर्वक संपवता आलं असतं. लग्नाची बोलणी झाली होती तर ती मोडण्याचा निर्णय घेता आला असता. कुटुंबीय, मित्र, समुपदेशक किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेता आली असती.
कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार असतो. पण तो अधिकार दुसर्‍याचं आयुष्य हिरावून घेण्याचा परवाना ठरत नाही. जर एखादं नातं मनाविरुद्ध वाटत असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे सभ्य आणि सन्मानजनक मार्ग समाजाने आणि कायद्याने उपलब्ध करून दिले आहेत. मग प्रश्न उरतो तो एवढाच – जेव्हा इतके पर्याय खुले होते तेव्हा हिंसेचाच मार्ग का निवडला गेला?
कदाचित याच प्रश्नाचं उत्तर ‘कम्बख्त इश्क’ या शब्दात दडलेलं आहे. कारण इथे निःस्वार्थ प्रेम हरतं आणि त्याची जागा स्वार्थ, भीती, असुरक्षितता आणि मालकी हक्काची भावना घेते. त्यानंतर निर्णय भावना घेत नाहीत, विकृत मानसिकता घेते.
प्रेमाचा शेवट विवाहात व्हायलाच हवा असं नाही. पण प्रेमाचा शेवट द्वेष, सूड किंवा हिंसेत होऊ नये.
केतन अग्रवाल प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालय ठरवेल. पण या घटनेने समाजासमोर एक मोठा प्रश्न उभा केला आहे. आपण प्रेम शिकतोय की मालकी हक्क? आपण नातं जगतोय की नात्याचा वापर करतोय?
कारण शेवटी प्रेम कधीच कोणाचा जीव घेत नाही. जीव घेतो तो स्वार्थ, फसवणूक, मालकी हक्काची भावना आणि विकृत मानसिकता. तूर्तास एवढे समजले तरी पुष्कळ…

Kambakht Ishq

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago