केवळ लोकलचा दरवाजा लावण्याच्या वादातून एकावर चाकूहल्ला होतो काय आणि त्यात एका युवकाचा बळी जातो काय, मुंबई शहरात हे खूपच चिंताजनक आहे. यापूर्वीदेखील अशीच घटना मुंबई लोकलमध्ये घडली होती, त्यावेळी एका तरुण प्राध्यापकाची हत्या करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात आपले लग्न दुसर्याशी ठरले म्हणून एका तरुणीने चक्क आपल्या होणार्या पतीचा लोहगडावरून कडेलोट केला आणि जीव घेतला. प्रेमासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही. मात्र, दुर्दैवाने आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रेमासारख्या सुंदर भावनेला बीभत्सतेचे स्वरूप येऊ लागले आहे. यापूर्वीदेखील अतिशय क्षुल्लक कारणावरून अनेक घटना घडल्या आणि त्यात नाहक जीव गेले आहेत.
मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली आणि त्याचे फोटो जेव्हा समाजासमोर आले तेव्हा कुठल्याही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाणारी ती दृश्ये आहेत. केवळ क्रूरतेचा कळस गाठणारे आरोपी हे सगळे तरुणवयातीलच आहेत.
पुण्यात किंवा इतर ठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हच्या अनेक घटना घडल्या, घडत आहेत. बापजाद्यांनी कमावलेल्या पैशांची परिणती कशात होते ती अशाच दुर्घटनांमध्ये. यात तरुणाईच मोठ्याप्रमाणावर बळी ठरत आहे. हल्लीच्या काळात व्यसनाधीनता वाढत चालली आहे. विशेषतः तरुणाईला व्यसनाधीनतेचे आकर्षण वाटते. तरुणाई यामध्ये गुंतली जात आहे आणि कालांतराने आयुष्य उद्ध्वस्त होण्यापलीकडे काही हाती लागत नाही. दारू, गांजा, ऑनलाइन गेमिंग, जुगार, चरस याकडे कुतूहल म्हणून तरुण मोठ्याप्रमाणावर ओढला जात आहे आणि कालांतराने त्यात गुरफटून जातो. सहजासहजी पैसा हाती पडला की त्याचा असा दुरुपयोग केला जातो. कधीकाळी पुण्याची ओळख सांस्कृतिक राजधानी, सुसंस्कृत शहर, विद्येचे माहेरघर अशी होती, मात्र आज त्याच पुण्यात पब संस्कृती मोठ्याप्रमाणावर रुजली आहे. अनधिकृत पब, बिअर बार, रेव्ह पार्टी यांचा शहरभर सुळसुळाट झाला आहे. आजकाल सर्वच जण पैसा कमावण्याच्या मागे लागले. परिणामी मुलांकडे, कुटुंबाकडे लक्ष देण्यास, मुलांशी संवाद साधण्यास कोणाकडेच वेळ नाही. त्याची परिणती अशा व्यसनाधीतेत होते आणि दुर्घटना घडतात. कोयते, तलवारी, गुप्तीसारखे हत्यारे हातात घेऊन तरुण मुले दहशत माजवत आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत आहेत. अर्थात, व्यसनाधीतेचा प्रश्न हा केवळ पुण्यातच नाही, तर राज्यात आणि देशात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. व्यसनाधीनता ही एक सामाजिक समस्या बनली आहे आणि त्याचा विपरीत परिणाम समाजजीवनावर होत आहे. कै. आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना डान्सबारवर बंदी आणली होती, मात्र ती न्यायालयात टिकली नाही. दारूबंदीबाबतदेखील अनेकदा दारूबंदी, गुटखाबंदी केली जाते, मात्र त्याचे गांभीर्याने पालन कुठेच होत नाही. दारू, गुटखा सहजपणे कुठेही तरुणांना सहजपणे उपलब्ध होतो. रेल्वेमध्ये तर सर्रास मिळतो. भ्रष्ट व्यवस्थेने सगळ्याच यंत्रणा पूर्णपणे पोखरल्या गेल्या आहेत. पैसा ही भगवान आहे, त्यामुळे पैसा फेकला की सगळे काही मॅनेज होते, ना कायद्याचा धाक ना शिक्षेची भीती वाटते. म्हणूनच ऐन तरुणपणात अचानक पैसा हाती आला तर चंगळवादाकडे तरुण ओढले जातात आणि पैसा उडविला जातो. खाओ पिओ ऐश करो, ही प्रवृत्ती वाढतच चालली आहे. भविष्याची चिंता कोणालाच नाही. मात्र, हे सगळे नुकसानकारकच आहे. मोबाइलचा सदुपयोगापेक्षा दुरुपयोगच अधिक होत आहे आणि तरुणाईवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. बालगुन्हेगारीला आळा बसावा यासाठी निर्भया कांडानंतर कायद्यात बदल करण्यात आला. बलात्कार, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यात 16 वर्षांवरील आरोपीला सज्ञान समजण्यात यावे, अशी कायद्यात सुधारणा करण्यात आली, मात्र तरीही बालगुन्हेगारीत वाढ होत आहे, ही चिंताजनक बाब आहे. आरोपी कोण आहे, त्याच्या बापाचा रसुख काय, त्याची आर्थिक स्थिती काय, त्याचे लागेबांधे, त्याचे संबंध कोणाशी यावर कारवाया ठरतात, गुन्हे दाखल होतात.
कोर्टात केस दाखल होते आणि एकदाचा काय तो ‘निकाल’ लागतो. तरुण, तरुणींमध्ये ईझी मनीमुळे वाढणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे घडणार्या दुर्दैवी घटना अतिशय दुर्दैवी आहेत. अनेक सामाजिक संस्था कार्यकर्ते व्यसनमुक्ती केंद्र चालवतात, समुपदेशन करतात पण तरीही घटना सातत्याने घडत आहेत. याला कुठेतरी आळा बसायला हवा आणि तोंडदेखलंपणा न करता शासन-प्रशासन, इतर यंत्रणा त्याचबरोबर पालक यांनी चंगळवादाचे गांभीर्य ओळखून असे प्रकार घडू नये यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत. उद्याची पिढी अशी चंगळवादात गुरफटणे देशाला, समाजाला परवडणारे नाही. तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आयुष्य कसे घडवायचे – बिघडवायचे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे, याची जाणीव प्रत्येक बालक-पालक सगळ्यांना असायला हवी. पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारताना आपण आपलेच चांगले संस्कार विसरून चाललो आहोत आणि त्याचा प्रभाव आजच्या तरुणाईवर जास्त दिसतो आहे. एकीकडे तरुणाई मोठ्याप्रमाणावर व्यसनाधीन होत आहे, तर दुसरीकडे हिंसकता आणि क्रूरता वाढत चालली आहे. अशा घटना घडताना आजूबाजूला असलेली बघ्यांची गर्दी काहीही करत नाही हे अनाकलनीय आहे. पुढारलेल्या सामाजाचे दावे-प्रतिदावे होत असताना अगदी सहजपणे एखाद्याचा जीव घेतला जातो इतकी जीवघेणी हिंसकता आणि क्रूरता येते तरी कुठून? या घटना समाजजीवनावर विपरीत परिणाम करतात. कोणालाही ना कायद्याचा धाक राहिला, ना शिक्षेची भीती राहिली आहे. त्यामुळे असे प्रकार सातत्याने घडत आहेत.तरुणांमधील हिंसकता, क्रूरता, व्यसनाधीनता हे सगळे समाजाची चिंता वाढवत आहेत आणि एकूणच समाजजीवनावर विपरीत परिणाम होत आहे, ही चिंतेची बाब आहे.
Rising violence and cruelty among the youth.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…