नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण,कांदा खरेदी बंद
लासलगाव समीर पठाण
बाजार स्थिरीकरण योजनेतून सुरू असलेली केंद्राची नाफेड मार्फत सुरू असलेली कांदा खरेदी २.५ लाख टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याचे सांगत सदर कांदा खरेदी शनिवार दिनांक १६ जुन पासुन थांबविण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती.नाफेड च्या कांदा खरेदीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता.मात्र,आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.त्यामुळे आज सोमवारपासून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाणार नाही त्यामुळे त्याचा परिणाम आता दरावर कसा होणार
या कडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
यातच पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा हा खराब झाला आहे.त्यामुळे कांदा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
नाफेडने या वर्षी तब्बल अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते परंतु प्रत्यक्षात नाफेडकडून रडतखडत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यात आला.त्यापासून शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झाला नाही.दर वर्षी नाफेडच्या कांदा खरेदीनंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात वाढ होते.परंतु या वर्षी नाफेडने इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करूनही कांदा उत्पादकांना अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.एकीकडे उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने केंद्राची भुमिका सरकार विरोधी असल्याच बोललं जात आहे.