पंधरा दिवसात दीड कोटीची करवसुली
करन्सी नोट प्रेसने पाणीपट्टीचे भरले 46 लाख रुपयेनाशिक : प्रतिनिधी
महापालिकेची कोट्यावधीची घरपट्टी व पाणीपट्टीची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार करवसुलीसाठी आक्रमक पवीत्रा घेतल्यानंतर नाशिकरोद विभागातून मागील पंधरा दिवसात तब्बल 1 कॉटी 66 लाख 71 हजार 68 रुपयांची करवसुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे इंडिया सिक्युरीटी प्रेस (आयएसपी) व करन्सी नोट प्रेस (सीएनपी) यांनी देखील पाणीपट्टीचे तब्बल 46 लाख रुपये भरले आहेत. पुढच्या काही दिवसात कर वसुलीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या निर्देशानुसार आणि कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या सहाही विभागात कर वसुली मोहीम राबवली जात आहे. नाशिकरोड विभागीय कार्यालयाने मागील पंधरा दिवसात एकूण 1 कोटी 66 लाख 71 हजार 68 रुपयांची कर वसुली केली आहे. त्यामध्ये घरपट्टीचे 89 लाख 1 हजार 634 रुपये आणि पाणीपट्टीचे 77 लाख 69 हजार 434 रुपये वसूल करण्यात आले आहेत. पाणीपट्टीमध्ये नाशिकरोड मधील नोट प्रेस व भारतीय प्रतीभुती प्रेस कार्यालयाकडील 46 लाख 43 हजार 138 रुपयांचा समावेश आहे. नाशिकरोड विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या थकबाकीदारांकडे धडक मोहिम राबविण्यात येत आहे. नाशिकरोड विभागीय कार्यालयाने विभागात एकूण 7 हजार 468 थकबाकीदारांना अंतिम सूचना पत्र बजावले आहे. तसेच 49 जणांना जप्ती नोटीसा बजावल्या आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असलेल्या नागरिकांनी आणि आस्थापनांनी चालू वर्षाचा आणि थकीत कर त्वरीत भरावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या कर विभागाने दिला आहे. नाशिकरोड विभागातील वसुली मोहिमेत घरपट्टी, पाणीपट्टी विभागाचे सहाय्यक अधिक्षक शरदकुमार जाधव, हेमंत रौंदाळे, राकेश पवार, महेंद्र कुम्हे, वसुली कर्मचारी
कैलास आहिरे, संजय बेंद्र, कैलास वाघ, रमेश मुल्हेरकर आणि इतर कर्मचा-यांनी सहभाग घेतला आहे.