शिवरायांचे आठवावे रुप ! शिवरायांचा आठवावा प्रताप
नाशिकरोडला रायगड किल्याच्या देखाव्याची शिवप्रेमींना भूरळ
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव सोहळा जिल्हयातच नव्हे राज्यात आदर्शवत ठरत आहे. राज्यातील तमाम शिवप्रेमींचे लक्ष नाशिकरोड शिव जन्मोत्सव सोहळ्याकडे असते. देखाव्यांची भव्यता व दिव्यता सोबतच भरगच्च सामाजिक कार्यक्रम अशा विविध पैलूंमुळेे नाशिकरोड शिवजन्मोत्सव आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय. यंदा सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीकडून रायगड किल्याचा देखावा उभारला जात असून अंतिम टप्यात हे काम आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले काम पूर्ण होत असल्याने सर्वाच्या नजरा रायगड किल्याची प्रतिकृती खेचून घेत आहे.
नाशिक शहरात काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध भागात जय्यत तयारी सुरु आहे. शिवप्रेमींमध्ये चैतन्याचे वातावरण पहावयास मिळ्त आहे. नाशिकरोडला रायगड किल्ला तर जेलरोड येथे शिवनेरीचा देखावा उभारला जातो आहे. तेथीलही काम पूर्णत्वाकडे आले आहे. शनिवार (दि.18) पासून विविध कार्यक्रमांना सुरवात होत असून गुरुवार (दि.23) पर्यत विविध कार्यक्रमांची मेजवानी शिवप्रेमींना मिळ्णार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके होणार आहे. तदनंतर रविवारी (दि.19) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे. रविवारी शिवपूजन व अभिषेक, सायंकाळी चार वाजता शिवज्योत सोहळा होणार आहे. यामध्ये 151 महिला व पुरुषांचे शंभुनाद केले जाणार आहे. सोमवारी (दि.20) सायंकाळी सहा वाजता जेलरोड येथे गौरव महाराष्ट्राचा शाहिररत्न शाहीर निशांत शेख यांचा महाराष्ट्राचा धुंद धगधगता इतिहास सांगणारा सुप्रसिद्ध गायकांसह पन्नास कलावंतांसमवेत भव्य दिव्य कार्यक्रम होइल. मंगळ्वारी (दि.21) शाहीर पृथ्वीराज माळी, शाहीरा माधवी माळी यांचा महाराष्ट्राचा मराठी बाणा जेलरोड येथेच सायंकाळी कार्यक्रम होणार आहे. यासह नाशिकरोडला बुधवारी (दि.22) सायंकाळी साडे सात वाजता समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन तर गुरुवारी (दि.23) जागर मराठी मनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान दि.18 ते 23 फेब्रुवारी पर्यत शिवप्रेमींसाठी नाशिकरोड आणि जेलरोड येथेकार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शिवजन्मोत्सव भव्य स्वरुपात साजरी करण्यासाठी नाशिकरोड सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्णा लवटे, कार्याध्यक्ष शांताराम घंटे, उपाध्यक्ष राहुल वाजे, लकी ढोकणे, स्रचिटणीस प्रशांत आवारे, चिटणीस सागर भोर, खजिनदार रविद्र कडजेकर आदीसह जन्मोत्सव समितीचे सदस्य, पदाधिकारी, शिवप्रेमी प्रयत्नशील आहेत.
फोटो अन सेल्फीचा मोह आवरेना
नाशिकरोड व जेलरोड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पुतळा आहे. काही दिवसांपासून येथे रायगड व शिवनेरी किल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरु आहे. आता हे काम जवळ्पास पूर्ण होत आहे. मात्र या देखाव्याचे आर्कर्षण एवढे जबरदस्त आहे, की, कोणालाही हे क्षण व देखाव्याची प्रतिमा मोबाइलमध्ये घेण्याचा मोह होत आहे.
…….
तुळजा भवानी मातेची प्रतिमा लक्षवेधक
दरम्यान नाशिकरोडला असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वरुढ पुतळा आणि त्यामागे सुंदर अशी तुळ्जा भवानी मातेची प्रतिमा साकारण्यात आल्याने या दिखाव्याची सुंदरता अधिक खूलून दिसत आहे.