प्रेमविवाह करणाऱ्यांना आता खाकीचे सुरक्षा कवच
शहर पोलीस आयुक्तालयात स्थापन केला विशेष कक्ष
नाशिक : प्रतिनिधी
प्रेमविवाहातून अनेकदा जोडप्याला मारहाण करण्याबरोबरच सैराट सारख्या घटनाही घडतात. त्यामुळे आता आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच लाभणार आहे. प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्याच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्यावर या विशेष कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांना या विशेष कक्षाच्या माध्यमातून संरक्षणाचे कवच लाभणार आहे.
समाजामध्ये प्रेम विवाह करणाऱ्याचे प्रमाण कमी नाही. आंतरजातीय विवाहातून अनेकदा अप्रिय घटना घडतात. अनेकदा जात पंचायतीच्या निवाड्यातून प्रेम विवाह अथवा आंतरजातीय, आंतर धर्मीय विवाह केलेल्या दाम्पत्याना समाजात जगणे कठीण होऊन जाते. यातून सैराट सारख्या घटनांची देखील पुनरावृत्ती होते . या घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि प्रेम विवाह केलेल्या जोडप्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी गृह विभाग आणि पोलीस खात्याची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात रिट याचिकाही दाखल झाली असता या याचिकेत असलेल्या दिशादर्शक निर्देशांचे तातडीने पालन करण्यात यावे, अशा सूचना केंद्र शासित प्रदेश, राज्य व पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या. त्यानुसार प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याना गरजेनुसार पोलीस संरक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच अशा जोडप्यांना त्रास देणाऱ्या घटकांवर तसेच व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त हे या कक्षाचे अध्यक्ष असतील, तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी सदस्य, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्यावर या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पोलीस विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.