नाशिक: प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासुन पाहणे ही प्रशासकीय जबाबदारी असतांना जाणीवपुर्वक टाळुन ठेकेदाराला २० लाख ६८ हजार ६०७ रुपये अदा करुन आर्थिक नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेच्या १५ अधिकारी व कर्मचा-यांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की, संशयित आरोपींची पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग करून त्यांना नेमुण दिलेले काम न करता बी. वाय. शाह फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शाह यांना त्यांनी केलेल्या कामाचे मुल्यमापन न करता शासन निधीचा योग्य प्रकारे सुविनीयोग होण्यासाठी प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासुन पाहणे ही आरोपीतांची प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपुर्वक टाळली.
देयकांची रक्कम बी. वाय. शहा फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शहा यांना अदा करून गुन्हेगारी वर्तन करून स्वतःचा आर्थिक फायदा करून शासनाचे तसेच मालेगांव महानगर पालिकेच्या निधीतील रक्कम रू. 20,68,607/- रुपयाचे आर्थिक नुकसान (अपहार) केल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न होत आहे. तरी प्रस्तुत प्रकरणात
शहर अभियंता कैलास बच्छाव,सेवानिवृत्त तत्कालीन कनिष्ठ अभियंता मुरलीधर देवरे,संजय जाधव, सेवानिवृत्त उपअभियंता राजेंद्र बाविस्कर, खाजगी व्यक्ती सोहेल रहेमान, दिनेश जगताप,नीलेश जाधव, तत्कालीन सेवानिवृत्त लेखा परीक्षक अशोक म्हसदे, सुहास कुलकर्णी,कमरुदिन शेख, सुनील खडके, मधुकर चौधरी, उत्तम कावडे, केदा भामरे, कृष्णा वळवी,राजाराम बच्छाव यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नितीन पाटील यांनी फिर्याद दिली. अधिक तपास अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप करीत आहेत