खरीप पेरणी 95.78 टक्क्यांवर

चारा पिकांच्या लागवडीवर भर

कमी पावसामुळे भात लागवड रखडली; दुग्ध व्यवसायाच्या वाढत्या गरजेमुळे मक्याची पेरणी 160 टक्क्यांवर

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, 19 जुलैअखेर एकूण 58 हजार 887 हेक्टर क्षेत्रापैकी 56 हजार 399 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणीचे प्रमाण 95.78 टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र, कमी पावसाचा सर्वाधिक फटका भात पिकाला बसला असून, भात लागवड अद्याप अपेक्षित गतीने झालेली नाही. दुसरीकडे तालुक्यातील वाढत्या दुग्धव्यवसायामुळे मक्यासारख्या चारा पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, त्याची पेरणी तब्बल 160.33 टक्क्यांवर पोहोचली आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार मका पिकासाठी 14 हजार 442 हेक्टर क्षेत्राचे नियोजन असताना प्रत्यक्षात 23 हजार 156 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात दूध उत्पादन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून, पशुधनासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध राहावा यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर मका पिकाला पसंती दिली आहे. त्यामुळे नियोजित क्षेत्रापेक्षा सुमारे नऊ हजार हेक्टर अधिक क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे.
सोयाबीन हे तालुक्यातील प्रमुख पीक राहिले असून, 31 हजार 121 हेक्टर क्षेत्रापैकी 28 हजार 579 हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमुगाची पेरणीही अपेक्षेपेक्षा जास्त झाली असून, 2 हजार 478 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 2 हजार 931 हेक्टरवर लागवड झाली आहे.
कडधान्यांमध्ये तूर, मूग आणि उडीद मिळून 191 हेक्टरवर पेरणी झाली असून, हे प्रमाण 19.95 टक्के आहे. बाजरीची पेरणी 1 हजार 127 हेक्टरवर झाली असून, ती केवळ 14.87 टक्के आहे. नवीन ऊस लागवडीचे क्षेत्रही अपेक्षेपेक्षा कमी राहिले असून, 1 हजार 148 हेक्टर लक्ष्यापैकी फक्त 28.8 हेक्टरवर लागवड झाली आहे. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांच्या मते, पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास भातासह उर्वरित पिकांच्या लागवडीला वेग मिळू शकतो. मात्र, पावसातील अनिश्चितता कायम राहिल्यास विशेषतः भात उत्पादक शेतकर्‍यांसमोरील आव्हाने वाढण्याची
शक्यता आहे.

भात लागवडीला अल्प पावसाचा फटका
भात पिकालाही अपुर्‍या पावसाचा फटका बसला आहे. 1 हजार 490 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ 293 हेक्टरवर लागवड झाली असून, भात लागवडीचे प्रमाण 19.66 टक्के इतकेच आहे. पश्चिम पट्टा आणि डोंगराळ भागात भात लागवड प्रामुख्याने केली जाते. मात्र, जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये आवश्यक पाणीसाठा निर्माण झाला नसल्याने रोपलागवडीची कामे रखडली आहेत.

पीकनिहाय खरीप पेरणीची आकडेवारी
एकूण खरीप पेरणी 56,399 हेक्टर (95.78%)
मका : 23,156 हेक्टर (160.33%)
सोयाबीन : 28,579 हेक्टर (91.83%)
भुईमूग : 2,931 हेक्टर (118.26%)
भात : 293 हेक्टर (19.66%)
कापूस : 110 हेक्टर (14.07%)
बाजरी : 1,127 हेक्टर (14.87%)

कापसाचे क्षेत्र घटले
लांबलेल्या पावसामुळे कापूस पिकाच्या क्षेत्रात यंदा मोठी घट झाल्याचे चित्र आहे. 781 हेक्टर क्षेत्राचे नियोजन असताना केवळ 110 हेक्टरवरच कापसाची लागवड झाली असून, पेरणीचे प्रमाण अवघे 14.07 टक्के राहिले आहे. मजुरीचा वाढलेला खर्च, उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी कापसाऐवजी इतर पर्यायी पिकांकडे वळल्याचे बोलले जात आहे.

Kharif sowing at 95.78 percent.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *