कृषी विभागाचे नियोजन : भाजीपाला लागवडीची जोरदार तयारी
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यात सध्या खरीपपूर्व हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामातील अनुभवातून शिकत बळीराजाने खरिपासाठी कंबर कसली आहे. वाढत्या महागाईमुळे आणि इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक शेतकरी ट्रॅक्टरऐवजी पारंपरिक बैलजोडीने शेतीची मशागत करत आहेत.
अशा आर्थिक आव्हानांच्या परिस्थितीत तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी शेतकर्यांसाठी खरिपाचे योग्य नियोजन करून मोठा दिलासा दिला आहे.
तालुक्यात खरीप हंगाम 2026-27 साठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले असून, यंदा एकूण 17 हजार 12 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी 16 हजार 758 हेक्टरवर पेरणी झाली होती. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी मशागतीसह भाजीपाला लागवडीला वेग दिला आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात टोमॅटो लागवडीसाठी प्लास्टिक मल्चिंग पेपर टाकून बेड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ठिबक सिंचन, मल्चिंग तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतीचा वापर करून टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी व फ्लॉवरच्या रोपांची आगाऊ नोंदणी नर्सरींमध्ये करण्यात आली आहे.
कृषी विभागाने या हंगामात मृद आरोग्य पत्रिका, महाविस्तार व महाकृषी अॅपद्वारे नोंदणी आणि बियाणे उगवण क्षमता चाचणीवर भर दिला आहे. तसेच 30 टक्के शेतकर्यांच्या शेतावर रुंद वरंबा (बेड) पद्धत, आंतरपीक आणि भातासाठी डी.एस.आर. पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
Kharif sowing will be done on 17 thousand hectares in Dindori