सीबीआयची कारवाई; पेपर विकत घेणारे पालक रडारवर
लातूर/पुणे : प्रतिनिधी
वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागा(सीबीआय)ने अत्यंत धडक कारवाई केली आहे. लातूरमधील नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे याला सीबीआयने अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्याने मुख्य संशयित आरोपी आणि ‘आरसीसी’ कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याकडून नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या रॅकेटमधील दलाल, शिक्षक आणि कोचिंगचालकांना बेड्या ठोकल्या गेल्या होत्या, मात्र फुटलेला पेपर विकत घेणार्या एखाद्या पालकाला अटक करण्याची संपूर्ण देशातील ही पहिलीच वेळ असल्याने शैक्षणिक आणि वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
डॉ. शिरुरे हा लातूरच्या जुना औसा रोड परिसरातील ‘सिद्धिविनायक बाल रुग्णालया’चा संचालक आहे. सीबीआयचे पथक गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून तपासाची चक्रे फिरवत होते. तपासादरम्यान संशयाची सुई फिरल्यानंतर सीबीआयच्या अधिकार्यांनी डॉ. शिरुरे याच्या रुग्णालयावर छापा टाकला आणि सुमारे साडेचार तास त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला लातूरहून पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. डॉ. शिरुरेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी दिल्ली न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रश्नपत्रिका खरेदी करणारे अनेक पालक सीबीआयच्या रडारवर आहेत.
Latur doctor arrested for buying NEET papers for his own son