दाभाडी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; तीन वासरांचा पाडला फडशा

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील दाभाडी शिवारातील वडगाव रोड व लोंढानाला परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. अवघ्या चार दिवसांत तीन वासरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे.
बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 सप्टेंबर रोजी नितीन निकम यांच्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही वासरे ठार झाली. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी रेखाबाई दादाजी निकम यांच्या एका वासरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला. सलग हल्ल्यांमुळे परिसरातील पशुपालक धास्तावले असून, रात्रीच्या वेळी शेतात जाणेही शेतकर्‍यांना धोकादायक वाटू लागले आहे. यंदा खरीप पिकांची वाढ चांगली झाल्याने शिवारातील पिके मोठी झाली आहेत. दाट पिकांमुळे बिबट्याला लपण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होत असल्याने त्याचा वावर वाढल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पाळीव जनावरांवर सातत्याने हल्ले होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, वन विभागाने परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व पशुपालकांकडून करण्यात येत आहे.

Leopard on the rampage in Dabhadi area; kills three calves.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *