सिडको : प्रतिनिधी
माचिस मागितल्यावर ती न दिल्याच्या रागातून टोळक्याने काका-पुतण्यावर धारदार शस्त्रांंनी हल्ला केल्याची घटना उपनगर परिसरातील अप्पू चौक येथे घडली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सहा जणांसह अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आदर्श रामभाऊ ठोके (वय 32, रा. आम्रपाली झोपडपट्टी, कॅनॉल रोड, जेलरोड, नाशिकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 4 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास ते पुतण्या युवराज याच्यासोबत अप्पू चौक परिसरात सिगारेट ओढत उभे होते. त्यावेळी बंटी ऊर्फ हेमंत काळे तेथे आला आणि त्याने फिर्यादीकडे माचिस मागितली. मात्र, माचिस नसल्याचे सांगितल्याने हेमंत काळे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने शिवीगाळ करण्याचे कारण विचारल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दर्शन जुन्नरे, अक्षय चावरिया, सूरज सुनसुना, भूषण वाबळे, सोहम आणि अन्य संशयितांनी फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, हेमंत काळे याच्याकडे धारदार शस्त्र, अक्षय चावरिया याच्याकडे चॉपर, सोहम याच्याकडे धारदार हत्यार आणि सूरज सुनसुना याच्याकडे लोखंडी कोयता असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या शस्त्रांंनी फिर्यादीच्या पाठीवर, खांद्यावर आणि छातीवर वार करण्यात आले. त्यांचा पुतण्या युवराज याच्यावरही खांदे, पाठ आणि हातावर वार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हल्लेखोरांनी दोघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांच्या पूर्वेतिहासाचीही नोंद केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Uncle and nephew attacked with sharp weapons after refusing to provide a matchbox.