चाडेगाव शिवारात वन विभागाने लावला पिंजरा
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोडजवळील चाडेगाव शिवारात पाळीव कुत्र्याची शिकार केल्यानंतरही बिबट्याचा वावर कायम आहे. रविवारी सकाळी पुन्हा बिबट्याने शेतकरी शिवाजी देवराम वाघ यांच्या घराच्या अंगणात
फेरफटका मारल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दुसर्या दिवशी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
शुक्रवारी पहाटे बिबट्याने वाघ यांच्या पाळीव कुत्र्याचा पाठलाग करीत अर्धवट बांधकाम असलेल्या बंगल्याच्या तिसर्या मजल्यापर्यंत धाव घेतली होती. जीव वाचविण्यासाठी कुत्र्याने तिसर्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, पायाला दुखापत झाल्याने अखेर बिबट्याने त्याची शिकार केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता.
या घटनेनंतर रविवारी पहाटे पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नगरसेवक योगेश भोर व नगरसेविका रुचिरा साळवे यांनी वन विभागाचे अधिकारी सुमित निर्मळ यांच्याशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यानंतर वन विभागाने शिवाजी वाघ यांच्या घरामागील उसाच्या मळ्यात रविवारी दुपारी पिंजरा लावला. यावेळी विजय जाधव, निशांत वाघ, महेश नागरे, शाम म्हस्के, पप्पू जाधव, भिवाजी वाघ यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
बिबट्याचा मानवी वस्तीजवळील वावर लक्षात घेता पिंजरा लावण्यात आल्याने नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला. बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Leopard prowls the courtyard again on the second day.