पंचवटी : प्रतिनिधी
यंदाही वंशपरंपरेने चालत आलेल्या श्रावणी
सोमवारनिमित्ताने आयोजित करण्यात येणार्या कपालेश्वराच्या पालखी सोहळ्यात वैद्य कुटुंबीयांचा पंचमुखी मुखवट्याचा दर्शनाचा लाभ मिळणार आहे. प्रथेनुसार पंचमुखी मुखवटा कपालेश्वर मंदिरात नेण्यात येणार आहे. आज, सोमवारी (दि. 31) दुपारी चार वाजेच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी सात वाजता रामकुंडावर पूजा केली जाणार आहे. गेल्या 133 वर्षांची वैद्य कुटुंबीयांची अखंडपणे ही परंपरा आजतागायत चालत आली आहे.
या पालखी परंपरेत खंड पडू नये म्हणून कै. दादा उमाशंकर वैद्य यांनी 6 नोव्हेंबर 1893 रोजी धनत्रयोदशीला कपालेश्वर पालखी प्रेसिशन ट्रस्टची स्थापना केली, तेव्हापासून आजतागायत वैद्य कुटुंबीयांकडे पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे. सध्या सुहास वैद्य, हर्षा वैद्य, मनोज वैद्य व इतर सर्व कुटुंबीय जबाबदारी सांभाळत आहेत.
हा पंचमुखी मुखवटा वर्षभरातील सर्व श्रावणी सोमवार, महाशिवरात्र, व सोमवती अमावस्या या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. सुरुवातीला सुहास वैद्य व हर्षा वैद्य पंचमुखी महादेवाची विधिवत पूजा करतात. त्यानंतर दुपारी 2.30 च्या सुमारास पंचमुखी महादेव कपालेश्वर मंदिरात आणले जातात. त्यानंतर पालखी फुलांनी सजवून सवाद्य पालखी सोहळ्याला सुरुवात होते.
दुपारी चार वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात होते. या पालखी मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात येते. शेवटच्या टप्प्यात
फुलांची हांडी बांधण्यात येते. सदर पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक, शनी चौक, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे येते. त्यानंतर पालखी सरदार चौक, मुठे गल्ली व पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर सात वाजता आणली जाते.
रामकुंडावर उसाचा रस, दूध, दही, मध यांचा अभिषेक करण्यात येतो. सुमारे चार तासांची ही भव्य महापूजा असते. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर पंचमुखी मुखवटा पुन्हा मंदिरात आणला जातो. कपालेश्वर मंदिरात रात्री बारा वाजता पुन्हा एकदा महापूजा केली जाते. त्यानंतर सकाळी उत्तरपूजा केल्यानंतर हा पंचमुखी मुखवटा वैद्य कुटुंबाकडे घरी नेण्यात येतो. पुन्हा विधिवत पूजा करून देव्हार्यात पंचमुखी महादेवाची स्थापना केली जाते.
या पूजेसाठी पौरोहित्याचा मान शरद शंकर दीक्षित यांच्याकडे आहे. कपालेश्वर मंदिरातील गुरव गाडे कुटुंबीयांचे नेहमी सहकार्य लाभत आहे.
Opportunity to view the Panchamukhi mask during the month of Shravan.