मर्‍हळमध्ये दहशत माजवणारा बिबट्या जेरबंद

तेरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बिबट्या जाळ्यात

सिन्नर : प्रतिनिधी
मर्‍हळ बुद्रुक परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बुधवारी (दि. 19) पहाटे बिबट्या अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी मोहदरी वनोद्यानात हलवण्यात आले.
मर्‍हळ बुद्रुक येथील ग्रामस्थांनी बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला. कैलास कुर्‍हे यांच्या गट क्रमांक 139 मधील उसाच्या शेतात 6 ऑगस्ट रोजी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. अखेर 19 ऑगस्टच्या पहाटे बिबट्या पिंजर्‍यात अडकला. बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर प्रादेशिक हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी नांदूरशिंगोटे मधुकर चव्हाण, वनरक्षक सय्यद, निखिल वैद्य, रोहित लोणारे, जगन जाधव व संतोष मेंगाळ यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी मोहदरी वनोद्यान येथे ठेवण्यात आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने मर्‍हळ बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांमधील भीतीचे वातावरण कमी झाले असून, वनविभागाच्या तत्पर कारवाईबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leopard terrorizing Marhal captured.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *