नाशिक :प्रतिनिधी
कुठल्यातरी संकुचित अस्मितेच्या वेडामुळे सभोवती द्वेषाची विषवल्ली फोफावत असताना निखळ जगणं आणि निर्मळ हसणं आपण विसरत चाललो आहोत, माणुसकीची उणीव भरून काढण्यासाठी ‘भारतीय’ असल्याची जाणीव प्रगल्भ होत जावी, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा ‘चला हवा येऊ द्या’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांतून परिचित झालेले अभिनेते किशोर बळी यांनी केले.
नवीन सिडको नाशिक वसंत व्याख्यानमालेत कै हिरामण चुंबळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ चोथे पुष्प ‘हास्यबळी डॉट कॉम’ हा कार्यक्रमातून विविध रंजक किस्से आणि कविता सादर करीत गुंफले. यावेळी व्यासपीठावर शिवाजी चुंबळे, कैलास चुंबळे, श्रीकांत बेनी, विलास चुंबळे, विजय चुंबळे होते. किशोर बळी यांनी नाशिककरांना खळाळून हसवतानाच अंतर्मुख करणारे विचार मांडले.
‘रमश्या’ ह्या इरसाल पात्राच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जनजीवनाचे चित्रण करीत विनोदाची पेरणी केली. रमश्याचा प्रवास हा हरवलेले गावपण अधोरेखित करणारा होता. ग्रामीण भागातील शिक्षण, तरुणाईचे भरकटलेपण, दिशाहीन राजकारण अशा विविध विषयांवरील विनोदांनी रसिकांना दोन तास खिळवून ठेवले. अवतीभवती सहजपणे घडणाऱ्या विनोदांची अनेक उदाहरणे मांडत त्यांनी या व्याख्यानमालेत हास्य आणि काव्यरंगांची उधळण केली.
ही तुझ्या घराची होळी ; थोडा विचार कर
अन् कोण शेकतो पोळी ; थोडा विचार कर
होते दिवस निरागस ते लेकराप्रमाणे
नकळत उडून गेले फुलपाखराप्रमाणे
तसेच
सानकोवळ्या हातांवरती नकोस पाडू ओरखडे
कचरा वेचत फिरणाऱ्यांच्या पाठीवरती दप्तर दे’ अशा अनेक कविता सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली. सुत्रसंचलन किरण सोनार यांनी केले तर आकाश तोटे यांनी प्रास्ताविक केले, स्वागत देवराम सैंदाणे यांनी केले तर परिचय सावळीराम तिदमे यांनी केले. आभार प्रदर्शन नंदकुमार दुसानिस यांनी मानले.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…