घोटी पोलिसांची कारवाई; राजस्थान-गुजरातच्या तिघांना अटक
घोटी : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोलनाक्याजवळ घोटी पोलिसांनी दोन चारचाकी वाहनांमधून चाललेली विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक पकडली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 24 लाख 47 हजार 920 रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. राजस्थान व गुजरात राज्यातील तीन आरोपींना अटक केली आहे.
सिल्व्हासा येथून विदेशी मद्याची वाहतूक गुजरातच्या दिशेने केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (दि. 13 जुलै) रात्री 11.10 वाजता नाशिककडे जाणार्या मार्गावर ही कारवाई केली. जप्त केलेल्या मद्याच्या बाटल्यांवर “केवळ दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव येथे विक्रीसाठी” असा उल्लेख आहे. पोलिसांनी या कारवाईत अँटिक्विटी ब्ल्यू, ब्लेंडर्स प्राइड, रॉयल चॅलेंज, बडवायझर बिअर या मद्यासह वाहतुकीसाठी वापरलेली हुंदाई क्रेटा व मारुती सुझुकी ब्रेझा ही दोन वाहने आणि तीन मोबाइल जप्त केले आहेत. याप्रकरणी चेतन धनराज पुरोहित, परवीन गणेशराम बिश्नोई (दोघे रा. राजस्थान) आणि अंकुलकुमार गिरीशभाई गामीत (रा. गुजरात) यांच्याविरोधात घोटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Liquor stock worth ₹24.47 lakh seized at toll plaza