– प्रा. प्रीती गायकवाड पाटील
दररोज सकाळी मी माझ्या मुलांना शाळा सोडवण्यासाठी घराबाहेर पडते. त्यांच्या अंगावरील कोरा करकरीत, नीटनेटका गणवेश, पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, भाजी पोळी व स्नॅक्सने भरलेला डबा आणि डोळ्यात नव्या दिवसाची उत्सुकता असते. पण त्याच रस्त्यावर मला काही वेगळेच वास्तव बघायला मिळते. फुटपाथ वरून झोपेतून नुकतेच उठलेली काही मुले ट्राफिक सिग्नलवर खेळणी, फुगे, फुलं विकणारे चिमुकले हात तर काही मुलं वाहनांच्या काचा ठोटावत भीक मागताना दिसतात. काही मुले कचर्याच्या ढिगारात कागदं, प्लास्टिक आणि बाटल्या गोळा करताना दिसतात. माझी मुलं सर्व सुख सुविधांचा लाभ घेत शाळेच्या दिशेने जात असताना ही मुलं दोन वेळच्या अन्नासाठी आयुष्याशी झुंज देत असतात. दुसरा एक प्रसंग आणखी, रोज कॉलेजला जाताना ट्राफिक सिग्नलवर लाल दिवा लागला की माझी गाडी थांबते दहा-बारा वर्षाचा मोठा मुलगा हातात सनरुफ कव्हर किंवा विविध वस्तू विकायला येतो आणि त्याच्यासोबत त्याची बहीणही फाटके कपडे, पायात चप्पल नाही, चेहर्यावर धूळ असलेली, हातात गजरांचा गुच्छ घेऊन विकत असते. सहा-सात वर्षांची मुले कडक ऊन असो वा मुसळधार पाऊस रस्त्यावर भीक मागतात. सिग्नल पडायच्या आत रस्ता ओलांडतात. अन्नपाण्यासाठी दिवस-रात्र भूक तहान विसरून उघड्या छता खाली जगत असतात.त्यांच्या भविष्याचा आणि त्यांच्या हरवलेल्या बालपणाचा विचार माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करतो.
कधी कधी या विचाराने मन अस्वस्थ होते. असं वाटते की, प्रत्येक मुलाच्या हातात पुस्तक, वही आणि पेन असायला हवे. पण अनेक मुलांच्या हातात कचरा गोळा करण्याची पोती, वस्तू विकण्याची टोपली किंवा भीक मागण्यासाठी पसरलेला हात दिसतो. हे केवळ त्या मुलांची शोकांतिका नाही तर आपल्या समाजाच्या सामूहिक संवेदनशीलतेची परीक्षा आहे. एकीकडे सर्वसामान्य व उच्चभ्रू वर्गातील मुले उच्च शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत, तर दुसर्याकडे कचर्याच्या ढिगार्यातून कागद, प्लास्टिक, लोखंड विकून दोन वेळच्या पोटाची भूक भागवण्यासाठी काही मुलं दिवस रात्र लढत आहेत. एकीकडे खासगी शाळांची संख्या.. वाढलेली फी, कोचिंग क्लासेसचे धडे, विशिष्ट अभ्यासक्रमाची पुस्तके, शिक्षणाची व्यावसायिकरण आणि दुसरीकडे शाळेत विद्यार्थी न आल्याने बंध पडलेल्या हजारो शासकीय शाळा…. हे वास्तव समाजाच्या विकासासाठी भयंकर परिस्थिती व प्रश्न निर्माण करत आहेत.
कारण, भारतात शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. शासनाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. ‘सर्व शिक्षा अभियान’, ‘बेटी बचाव बेटी पढावो’, ‘मिडडे मिल’ व शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, विशेष, एकात्मिक व सर्वसमावेशक शिक्षण, डिजिटल ऑनलाइन व डिस्टन्स एज्युकेशन अशा एक ना अनेक योजना असताना हजारो मुलं शिक्षणापासून आजही वंचित आहे.
आजही हजारो शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी नसल्याने शाळा बंद पडत आहेत. कारण, देशातील कलंकित गरिबी, बेरोजगारी, स्थलांतर, पालकांचे अशिक्षित असणे, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यामुळे अनेक कुटुंबांना मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी कामाला लावणे गरजेचे वाटते. त्यामुळे बालपणाच्या कोवळ्या वयात ही मुले जबाबदार्यांचे ओझे वाहत आहेत. ‘कागद वेचणार्या मुलांचे जीवन अत्यंत कठीण असते. शिक्षण, खेळ, संस्कार आणि स्वंप्न यापासून ते दिवसेंदिवस दूर जातात. खरंतर या मुलांमध्ये बुद्धिमत्तेची किंवा क्षमतेची कमतरता नसते, तर फक्त संधीची योग्य शिक्षणाची, योग्य मार्गदर्शनाची कमतरता असते. पैशासाठी भुकेसाठी पुढे सरसावलेले त्यांचे हात अनेक वेळा दुर्लक्षित केलेले जातात. झटकून लावले जातात. परंतु कोणी त्यांना आधार देत नाही.
शासनाने केवळ योजना जाहीर करून थांबता कामा नयेत. तर स्थलांतरित आणि कचरा वेचणार्या कुटुंबांसाठी विशेष शैक्षणिक केंद्र, निवासी शाळा, कौशल्य विकास कार्यक्रम, पूर्णवेळ शिक्षक, रोजगाराभिमुख शिक्षण, स्थानिक व स्वराज्य संस्था, स्वयंसेवी शिक्षण संस्था आणि नागरिक यांच्या समन्वयातून या मुलांपर्यंत शिक्षणाचा लाभ पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहेत. तसेच सरकारच्या योजनांची खरच अंमलबजावणी होतेय का? यांचे परीक्षण, मूल्यमापन आणि पडताळणी होणे तितकीच गरजेची आहे. कारण शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे. स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करून त्यांना शालेय साहित्य साधने, पोटभर अन्न, सुरक्षितता, उत्तम आरोग्य, शासनाच्या योजनांची माहिती मिळवून देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
शेवटी काय सांगता येईल की, आज कागद कचरा म्हणून वेचणारा मुलगा हातात पुस्तक आल्यावर देशाचं भविष्य बदलू शकतो. सुगंधित गजरा विकणारी ती चिमुकली उद्या डॉक्टर, अभियंता किंवा मोठी अधिकारी होऊन मोठ्या पदावर जाऊन देश सांभाळेल….भीक मागणारा एखादा मुलगा उद्याचा शास्त्रज्ञ किंवा संशोधकही होईल. पण याकरिता त्यांच्या हातातून कचर्याची पोती काढून त्यांना ज्ञानाची शिदोरी देणे आवश्यक आहेत. कदाचित त्यांच्या स्वप्नांना उभारी देणे,त्यांचे हरवलेले बालपण पुन्हा फुलवणे हा संकल्प जर प्रत्येकाने केला तर हीच खरी सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची
ओळख असेल.
प्रत्येक मुलाच्या हातात ‘कचर्याची पिशवी नव्हे, तर पुस्तके देणे’ ही काळाची गरज आहे. ज्या दिवशी कचरा वेचणारी मुलं कागद वाचतील अर्थात पुस्तक वाचतील आणि विचारवंत शिक्षित होतील, ज्या दिवशी पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणार्या चिमुकल्याच्या चेहर्यावर जगण्याचा आनंद असेल, ज्या दिवशी या निरागस बेसहारा बालकांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल, ज्या दिवशी त्यांनाही आपल्या मुलांप्रमाणेही जगता येईल, त्या दिवशीच खर्या अर्थाने आपण सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विकसित भारत घडविण्याचा अभिमान नक्की बाळगू!
Lost childhood and unfulfilled dreams…
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…