आस्वाद

मी, आम्ही आणि आपण : जीवनमूल्यांचे समर्थ वाहक

– अनिल उदावंंत
समाजातल्या भल्या-बुर्‍या गोष्टींचा अभ्यास करणं, त्यांचा समाजमनावर होणारा परिणाम तपासणं आणि प्रसंगी त्याबाबत भाष्य करून समाजाला जागृत करणं ही समाजकार्यात कार्यरत असणार्‍या प्रत्येक व्यक्ती व संस्थेची जबाबदारी असते. समाजात अस्तित्वात असलेल्या डाव्या-उजव्या विचारसरणीमुळे उद्भवणारे विविध प्रश्न समजून घेत समाजाला नव्या विचारांचा समर्थ पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. त्यासाठी समाजातल्या प्रचलित संज्ञा, संकल्पना, संकेत, प्रतीके, मानके इ.च्या संदर्भात कल्पना व विचारांच्या पातळीवर पुरेसं चिंतन व मंथन करणं गरजेचं असतं. या पार्श्वभूमीवर मी, आम्ही आणि आपण या संज्ञांचा अर्थ नव्याने समजून घेणं हा आजच्या लेखाचा हेतू आहे. मी, आम्ही आणि आपण ही आपल्या सर्वांच्या वापरातली तीन सर्वपरिचित अशी सर्वनामे आहेत. प्रथमदर्शनी हे अत्यंत साधे शब्द वाटत असले तरी त्या शब्दांच्या गर्भात मानवी जीवनाचा संपूर्ण प्रवास दडलेला आहे. व्यक्ती, समूह आणि समाज या तिन्ही स्तरांवरचा संपूर्ण मानवी जीवनानुभव या तीन साध्या शब्दांतच सामावलेला आहे असं म्हणायला पुष्कळसा वाव आहे. मी, आम्ही आणि आपण या तीन शब्दांच्या आधारे एखाद्याला संपूर्ण मानवी जीवन सहजपणे समजून घेता येईल व त्यायोगे त्याच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनप्रवासाचा मार्ग अधिक समृद्ध होऊ शकेल. कोणतीही भाषा ही केवळ वेगवेगळ्या ध्वनींची तालबद्ध रचना असत नाही. ती निरनिराळ्या व्यक्तींचे अस्तित्व, त्यांचे सामाजिक संबंध आणि त्यांच्यातील संवेदनांची जीवंत अभिव्यक्ती असते. तिला अनेक सांस्कृतिक पदर असू शकतात. मराठी भाषेतील मी, आम्ही आणि आपण ही तीन सर्वनामे अतिशय साधी दिसत असली तरी त्यांच्यात व्यक्ती, समूह आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांचे विलक्षण तत्त्वज्ञान दडलेले आहे. या तीन शब्दांचे महत्त्व केवळ मराठी भाषेच्या व्याकरणापुरते मर्यादित रहात नाही, कारण हे तिन्ही शब्द समाजशास्त्र व मानसशास्त्राच्या पातळीवर सांस्कृतिक अर्थाने समग्र मानवी जीवनाचा सूक्ष्म पट उलगडून दाखवतात. ‘मी’ ही आत्मजाणीव आहे, ‘आम्ही’ ही सामूहिक चेतना आहे, आणि ‘आपण’ ही सहअस्तित्वाची सुसंस्कृत अभिव्यक्ती आहे. ‘मी’ हा शब्द व्यक्तीचे अंतरंग, आत्मशोध आणि तिच्या व्यक्तिगत स्वायत्ततेचा सूचक आहे. त्यामुळे ‘मी’ हे केवळ एखाद्या भाषेतील सर्वनाम उरत नाही; तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा ते पहिला उच्चार ठरते. या ‘मी’मधूनच प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान अभिव्यक्त होत असतो.
ज्यावेळी अशा अभिव्यक्तीचा अतिरेक होऊ लागतो तेव्हा हाच ‘मी’ स्वाभिमान, अभिमान, गर्व आणि आत्मप्रौढी अशा अहंकाराच्या पायर्‍या क्रमाक्रमाने चढत असतो. अहंकाराचे प्रतिक ठरणारा हा ’मी’ मानवी नात्यांच्या उत्थानासाठी सदैव मारक ठरत असल्याने तो सर्वत्र वर्ज्य मानला जातो. जगातला कोणताच माणूस केवळ ‘मी’ मध्ये पूर्णतः मावत नाही. त्याच्या अस्तित्वाची खरी पूर्णता होण्यासाठी त्याच्यातल्या ‘मी’ला ‘आम्ही’ मध्ये सामावून घ्यावे लागते. ‘आम्ही’ हे भाषेच्या सोईसाठी वापरले जाणारे अनेकवचनी सर्वनाम असले तरी त्याचे मूल्य केवळ तितकेच मर्यादित नसते हे मात्र आपण विसरता कामा नये.
‘आम्ही’ ही एकत्रितपणे जगण्याची, इतरांत सहभागी झाल्याची आणि परस्परांशी जोडले गेल्याची सुखद जाणीव आहे. कुटुंब, समाज, संस्था, देश-प्रदेश, चळवळ, संघटना अशा विविध पातळ्यांवर हा ‘आम्ही’ घडत असतो. ‘आम्ही’मुळे व्यक्तीच्या सीमा विस्तारत असतात. आनंद, सुख, दुःख, कष्ट, यश, अपयश यापैकी काहीच त्या एकट्या व्यक्तीचे म्हणजे ‘मी’ चे राहत नाही.
‘आम्ही’मुळे व्यक्तीच्या आनंदात इतर अनेकजण सहभागी होतात. सुखाचा एकत्रित उपभोग घेतात. दुःखात सहभागी होऊन त्याचा भार हलका करतात. व्यक्तीच्या कष्टांना इतरांची साथ मिळते आणि यश-अपयशाचे श्रेय सामूहिकरीत्या दिले व घेतले जाते. समाजशास्त्रीय दृष्टीने विचार करता ‘आम्ही’ हा शब्द सामाजिक ऐक्याचा श्वास ठरतो. एकट्याने चालणे ही माणसाची सोय असली, तरी एकत्र चालणे ही माणसाची प्रेम, सुरक्षितता, आधार, आदर, प्रतिष्ठा आणि सन्मान या पातळ्यांवरची नितांत गरज असते. या अर्थाने असं म्हणता येईल की, ‘आम्ही’ मुळे आत्मकेंद्री माणसाला सहजीवनाच्या विस्तीर्ण अवकाशात विहरता येते. सहजीवनाच्या याच विलक्षण सकारात्मक अनुभवातून ‘आपण’ जन्माला येतो. आपण हा केवळ संबोधनपर शब्द रहात नाही. तो एका सुसंस्कृत वृत्तीचे प्रतिनिधित्व करतो. ‘आपण’ या एकाच शब्दात प्रेम, नम्रता, सन्मान, आदर, आधार, साहचर्य, सहकार्य आणि सर्वसमावेशक एकात्मता दडलेली असते. आवश्यक ते सामाजिक अंतर राखूनही परस्परांविषयीची जवळीक जपण्याचं कसब ‘आपण’ मध्ये असतं. ‘आपण’ ही माणसातील आपलेपणा जपत माणुसकी जीवंत ठेवणारी जादू आहे. ‘आम्ही’ने शिकवलेल्या सहजीवनाला अधिक फुलवण्यासाठी लागणारे सहअस्तित्वाचे शिष्टाचार या ‘आपण’कडून शिकायला मिळतात. त्या अर्थाने ‘आपण’ ही सामाजिक संस्काराची एक परिपक्व अवस्था आहे.
मी, आम्ही आणि आपण या तिन्ही संकल्पनांचे परस्परांशी फार सूक्ष्म आणि सुंदर असे नाते आहे. या तिन्हीमध्ये एक अद्भुत समतोल आहे. ‘मी’ हे बीज असेल तर ‘आम्ही’ हा त्याचा शाखीय विस्तार आहे आणि ‘आपण’ हे त्या वृक्षाला लाभलेले मधुर आणि सुगंधी फळ आहे. ‘मी’ माणसाला स्वतःच्या अंतर्मनाची ओळख करून देते. ‘आम्ही’ त्याला इतरांच्या अस्तित्वाशी जोडते. ‘आपण’ त्याला सन्मान, शिष्टाचार आणि सहअस्तित्वाचा सूर शिकवते. अशा प्रकारे ही तीन रूपे एकमेकांना कुठेही छेद देत न देता मानवी जीवनाच्या तीन पायर्‍यांसारखी एकसंध उभी राहतात. व्यक्तीपासून समूहाकडे आणि समूहापासून सभ्य सामाजिक व्यवहाराकडे जाणारा मानवी जीवनाचा हा प्रवास या तीन शब्दांच्या माध्यमातून अधोरेखित होतो. त्यामुळे हे शब्द फक्त बोलण्यापुरते मर्यादित रहात नसून ते माणसाला अधिक व्यापक, अधिक संवेदनशील आणि अधिक सुसंस्कृत बनवणार्‍या जीवनमूल्यांचे समर्थ वाहक आहेत ही बाब आपल्याला गांभीर्याने समजून घ्यावी लागेल.

Me, Us, and You: Stalwart Bearers of Life Values

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago