पेट्रोल-डिझेलसह एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त

मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी
जुलै महिन्याचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदवार्ता घेऊन आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्याच्या आशेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या जागतिक घडामोडींचा थेट फायदा आता देशातील ग्राहकांना मिळाला असून, 1 जुलैपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये लक्षणीय कपात करण्यात आली आहे.
महागाईचा सामना करणार्‍या सर्वसामान्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी महिन्याच्या सुरुवातीलाच ही एक अत्यंत सकारात्मक बाब ठरली आहे.
खासगी क्षेत्रातील प्रमुख इंधन कंपनी असलेल्या ’नायरा एनर्जी’ने ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार, 1 जुलैपासून पेट्रोलच्या दरात पाच रुपये प्रति लिटरची कपात करण्यात आली आहे. यासोबतच डिझेलचे दरही तीन रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले आहेत. वाहनधारक आणि मालवाहतूकदारांसाठी ही एक मोठी बचत ठरणार आहे. नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपांवरून इंधन भरणारे ग्राहक या कपातीचा थेट लाभ घेऊ शकतील.

व्यावसायिक गॅस 183 रुपयांनी स्वस्त
एलपीजी गॅसच्या दरांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणार्‍या 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 183 रुपयांपर्यंत घसघशीत कपात करण्यात आली आहे. तसेच घरगुती आणि अल्प वापरासाठी लोकप्रिय असलेला एलपीजीचा ’छोटू’ सिलिंडरही आता स्वस्त झाला आहे. या दरकपातीसोबतच प्रशासकीय स्तरावर एक महत्त्वाचा निर्णय घेत, व्यावसायिक सिलिंडर खरेदीवर असणारी मर्यादा आता पूर्णपणे हटवण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिकांना त्यांच्या गरजेनुसार विनाअडथळा गॅस खरेदी करता येईल आणि वितरणाची ही सर्विस आता ग्राहकांसाठी अधिक सुलभ झाली आहे.

LPG gas cylinders, along with petrol and diesel, become cheaper.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *