वासनांध स्कूल बसचालकाचे 13 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

निर्जनस्थळी नेऊन विनयभंग, नराधम गजाआड

सिन्नर : प्रतिनिधी
पालकांनी ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला, त्याच स्कूल बसचालकाने नात्याला आणि विश्वासाला काळिमा फासल्याची घृणास्पद घटना सिन्नरमध्ये समोर आली आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला दुसर्‍या शाळेतील मुलांना घेऊन घरी सोडतो, असा बहाणा करत या नराधम चालकाने निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत बसमध्येच अश्लील कृत्य करून विनयभंग केला. या संतापजनक प्रकारानंतर सिन्नर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी चालक सुनील शांताराम सपकाळ (35, रा. लोणारवाडी, सिन्नर) यास बेड्या ठोकल्या आहेत.

सिन्नर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या 36 वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 13 वर्षे 7 महिने वयाची मुलगी 24 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. नेहमीचा चालक सुनील शांताराम सपकाळ याने तिला विश्वासात घेतले. “पास्ते गावात किड्स अकॅडमी आहे, तिथून इतर मुलांना घेऊन तुला घरी सोडतो,” असे सांगून तो तिला बसमधून घेऊन गेला.
चालक सुनीलने इतर मुलांना घेण्याऐवजी आपली बस पास्ते गावाच्या शिवारातील एका बंद पडलेल्या कंपनीजवळ, निर्जन रस्त्यावर नेऊन उभी केली. तिथे सामसूम असल्याचा फायदा घेत नराधम चालकाने बसमध्येच मुलीच्या शेजारच्या सीटवर बसून तिच्याशी अश्लील चाळे केले, तसेच बळजबरीने मिठी मारून विनयभंग केला.
या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी प्रचंड हादरली. तिने घरी आल्यावर रडत रडत पालकांना आपबिती सांगितली.
मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने पालकांनी त्वरित सिन्नर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 25 जून रोजी मध्यरात्री तातडीने भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 75 आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच सिन्नर पोलिसांनी आरोपी चालक सुनील सपकाळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा राऊत करत आहेत. स्कूल बसमधील हा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Lust-crazed school bus driver engages in obscene acts with a 13-year-old girl.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *