मनपाच्या वतीने सुरू होते लसीकरण; सिडको परिसरात हळहळ
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक मनपाच्या वतीने खुटवडनगर येथील संकटमोचन हनुमान मंदिरात सर्पदंश आणि श्वानदंश लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर काही अंतरावरच 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अचानक कोसळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. श्रावणी अनिल पाटील असे मृत मुलीचे नाव आहे.
मनपाच्या या लसीकरण शिबिरात सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस घेतल्यानंतर श्रावणी पाटील ही वडिलांसोबत जवळील मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती रस्त्यावर कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेबाबत नागरिकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
श्रावणीच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. तिचे वडील अनिल पाटील हे खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई घरकाम तसेच धुणीभांडी आणि पोळ्या लाटण्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असते. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी ही भोसला मिलिटरी स्कूल येथे शिक्षण घेत होती.
तिने दहावीपासूनच याच शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला होता. सध्या ती कला शाखेत (आर्ट्स) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. वय 17 वर्षे पूर्ण असून, 18 वे वर्ष सुरू होते.
महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या शिबिरात देण्यात आलेल्या लसीबाबतही काही नागरिकांनी शंका उपस्थित केल्या असून, संबंधित लस मुदतबाह्य होती का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
17-year-old girl dies after taking vaccine