महाराष्ट्र-62

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला ‘च’ पाहिजे, या आचार्य अत्रेंनी दिलेल्या घोषणेनुसार मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि याचे श्रेय केवळ अत्रेंनाच दिले पाहिजे. आपल्या घोषणेतील ‘च’ या शब्दाचं महात्म्य सांगताना अत्रेंनी चव्हाण मधला ‘च’ काढल्यास काय उरेल, अशी शब्दकोटी केल्याचं सांगितलं जातं. अखेर द्विभाषिक राज्यातून 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यावेळीही मराठी राज्य हे मराठा बनणार तर नाही, अशी शंका अत्रेंनी अग्रलेखात व्यक्त केली होती. त्यावेळी असं घडणार नाही, अशी ग्वाही स्वत: चव्हाणांनी दिली होती. आणि ती त्यांनी पाळली.
चीन युद्धानंतर केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेले आणि राज्यात प्रथम मारोतराव कन्नमवार आणि नंतर वसंतराव नाईकांची वर्णी मुख्यमंत्रिपदी लागली. चव्हाणांचे राजकीय विरोधक असलेल्या अत्रेंनी लिहिलेला ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ हा अग्रलेख आजही उल्लेखिला जातो. विरोधकांना येनकेन प्रकारेन संपविण्याची भाषा त्या काळात नव्हती.
अकरा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नाईकांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचं श्रेय दिलं पाहिजे. राजकारण्यांवर आपल्या मुलाकरिता राजकीय पार्श्वभूमी तयार करण्याचा आरोप केला जातो. पण याबाबतीत वसंतराव वेगळे ठरले. त्यांनी मुलाऐवजी पुतण्याकडे आपला वारसा दिला. सध्या मुंडे आणि ठाकरे परिवारात पुतणे काकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. नाईकांच्या नंतर प्रथम शंकरराव चव्हाण आणि नंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. मात्र, 1978 साली पहिल्यांदा राज्यात गैर कॉंग्रेसी सरकार अस्तित्वात आलं; पण कॉंग्रेसच्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. आणि 1978 पासून 44 वर्षे राज्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भलेही ते स्वत: साडेसहा वर्षेच मुख्यमंत्री राहिले. इतर कोणताही नेता आपला प्रभाव इतका मोठा काळ टिकवू शकला नाही. वसंतदादांचं सरकार पवारांनी यशवंतरावांच्या सांगण्यावरून पाडलं. पण हेच यशवंतराव 1982 साली जेव्हा स्वगृही परतले तेव्हा त्यांचे मानसपुत्र गणले जाणारे पवार त्यांच्याबरोबर स्वगृही परतले नाहीत. आणि त्यामुळे यशवंतरावांचं केंद्रीय मंत्रिपद हुकलं असं म्हटलं जातं. भलेही हेच पवार पुन्हा चार वर्षांनी स्वगृही परतले. पवारांच्या राजकीय जीवनात असे अनेक विरोधाभासाचे प्रसंग पाहायला मिळतात.
लालकृष्ण अडवाणींच्या रामरथ यात्रेचा प्रभाव 1989 पासून पुरोगामी महाराष्ट्रातही जाणवू लागला. कारण या रथयात्रेचे कर्ता करविता प्रमोद महाजन महाराष्ट्राचेच. त्यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरे! बाबरी मस्जिद पतन, दंगली आणि बॉम्बस्फोट याच्या पार्श्वभूमीवर पाहिले खरेखुरे गैर कॉंग्रेसी सरकार राज्यात सत्तेवर आले 1995 साली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली. किमान 50 वर्षे तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मण होऊ शकत नाही, असे एसेम जोशी यांनी म्हटल्यानंतर अवघ्या दीड दशकाच्या आत जोशी मुख्यमंत्री बनले होते. कारण तो ठाकरे, महाजन यांच्या युतीचा चढता काळ होता. याच काळात पवारांनी आपल्या राजकीय जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. तो म्हणजे परकीय असल्याच्या मुद्यावरून सोनिया गांधींच्या पंतप्रधानपदाच्या दाव्याला विरोध करून. भलेही त्याच कॉंग्रेसबरोबर त्यांनी महाराष्ट्रात पंधरा वर्षे सरकार चालवलं आणि केंद्रात सोनिया गांधींच्या बाजूला चौथ्या क्रमांकावर बसून दहा वर्षे कृषी खातं सांभाळलं.
1995 पासून राज्यात एकाच पक्षाचं सरकार कधीही अस्तित्वात आलं नाही. सध्या तर चक्क तीन पक्षांचं सरकार राज्यात सुरू आहे.
वसंतराव नाईकांनी ज्याप्रकारे आपला वारसा पुतण्या सुधाकरराव नाईक यांना दिला त्याच प्रकारे शरद पवारांनी आपले पुतणे अजित पवार यांना पुढे केलं. भलेही त्यांना संधी असूनही 2004 साली मुख्यमंत्रिपद नाकारलं आणि 2006 पासून आपली कन्या सुप्रिया हिला केंद्रीय राजकारणात आणलं. मात्र, राज ठाकरे आणि धनंजय मुंडे हे आपल्या काकांवर नाराज झाले आणि त्यांनी एकतर वेगळा पक्ष काढला किंवा दुसर्‍या पक्षात सामील झाले. काकांनी पुतण्या सोडून मुलगा किंवा मुलीला आपला वारसदार केल्याने ही नाराजी. पवारांनी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात राज्यात आपला वरचष्मा कायम ठेवला. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात पवारांना फार त्रास झाला. त्याचाच परिपाक म्हणून की काय पवारांनी चिडून सही करण्यासाठी हाताला लकवा होतो का, अशा प्रकारचं वाक्य वापरलं. अजित पवारांवर पाटबंधारे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक याबाबतीत आरोप केले गेले. पवारांनी 72 दिवस मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. आणि शेवटी 2014 साली चारही पक्ष वेगळे लढले आणि त्यात भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला तर राष्ट्रवादी चौथ्या. यावर्षी घडलेल्या दोन घटनांच उत्तर मात्र आजही दिलं जात नाही. राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा का घोषित केला? आणि 2019 साली अस्तित्वात आलेले तीन पक्षांचं सरकार 2014 साली संधी असूनही का अस्तित्वात आलं नाही. तीन पक्षांच्या सरकारचा प्रयत्न तत्कालीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला होता. सभापतिपदाच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध वर्षा गायकवाड यांना निवडून आणताच फडणवीस सरकार कोसळत आणि त्यानंतर तिनही पक्ष बसून चर्चा करू हा प्लॅन माणिकरावानी उद्धव ठाकरेंच्या गळी उतरवला. पण नंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची ‘फोन पे चर्चा’ झाली आणि ठाकरेंनी काढता पाय घेतला. तसं पाहता अगदी 2019ला सुद्धा उद्धव ठाकरे भाजपला सोडण्यास तयार नव्हते. पण जेव्हा भाजप अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न देण्याच्या मुद्यावर अडून बसला तेव्हा कुठे ठाकरेंनी चालून आलेल्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा स्वीकार केला. 2014 साली कॉंग्रेस शिवसेनेबरोबर जाण्यास नाखूश होता. 2019 ला सत्तेत सहभागी न झाल्यास कॉंग्रेसमधला एक गट फुटून भाजपबरोबर जाईल अशी गर्भित धमकी कॉंग्रेसच्या एका गटाने दिली. त्याचबरोबर त्यावेळी जर तीन पक्ष एकत्र आले असते तर 63आमदार असलेल्या सेनेला मुख्यमंत्रिपद, 42 आमदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपुख्यमंत्रिपद आणि 41 सदस्य असलेल्या कॉंग्रेलला केवळ सभापतिपद मिळालं असतं. आणि हे शरद पवारांना
परवडण्यासारखे नव्हते. म्हणून त्यांनी तेव्हा तेव्हा तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यास फारसा प्रतिसाद दिला नसावा. या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे
1995 पासून 2019 पर्यंत दोन पक्षांचं सरकार जाऊन त्या जागी तीन पक्षांचं सरकार आल. केंद्र सरकारचं संपूर्ण असहकराचे धोरण असतानाही पवारांच्या साह्याने राज्य सरकार सुरू आहे. एकप्रकारे सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपला कसं दूर ठेवायचं याचा आदर्शच महाराष्ट्राने देशाला घालून दिला आहे. 1990 पर्यंत असणार्‍या विरोधी पक्षाची वैचारिक जवळीक कॉंग्रेसशीच असायची.पण 1990 पासून त्यात एक आमूलाग्र बदल घडला. डाव्या, समाजवादी मंडळींची संख्या कमी होऊन त्या जागी उजव्या कट्टर धार्मिक विचारांच्या लोक्रतिनिधींची संख्या वाढली. सुडाचं राजकारण सुरू झालं. याच सुडाच्या राजकारणात छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा संघर्ष शिगेला पोचला आहे. राज्यपालांच्या आडून केंद्र सरकार अडवणुकीचे धोरण स्वीकारत आहे. हनुमान चालिसा, हिजाब क्या नावाखाली दुहीची बीजे पेरली जात आहेत. आणि अशा परिस्थितीत राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनी सगळीकडे आवाज घुमतोय, जय जय महाराष्ट्र माझा….
जयंत माईणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *