अविनाश पाठक
मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख होती. भाजपने खूप आधीपासून सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांनी विविध संस्थांकडून प्रत्येक प्रभागात सर्वेक्षणदेखील करून घेतले होते. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी नावे जाहीर केली नव्हती. याला कारण असे दिले जात होते की, आधीच नावे जाहीर केली तर बंडखोरी होईल आणि ती सांभाळणे कठीण जाईल. त्यामुळे आदल्या रात्री आणि मंगळवारी सकाळी फक्त ज्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांना कार्यालयात किंवा नेत्याच्या घरी बोलावून एबी फॉर्म दिले जाऊ लागले. ही बातमी कळताच सर्वच इच्छुकांनी कार्यालयात किंवा जिथून एबी फॉर्म म्हटले जात आहेत त्या नेत्यांच्या घरी गर्दी केली आणि मग त्यातून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांना अक्षरशः मागच्या दाराने पळून जावे लागले. नाशिकमध्ये तर ज्या गाडीत एबी फॉर्म ठेवले होते, त्या गाडीचाच कार्यकर्त्यांनी पाठलाग करत ते एका फार्म हाउसपर्यंत पोहोचले. फार्म हाउसमध्ये फॉर्म घेऊन पदाधिकारी बसले आहेत कळल्यावर त्या फार्म हाउसच्या कंपाउंडवरून उड्या मारून कार्यकर्ते आत शिरले. संभाजीनगरमध्ये तिथे महिला कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ घातला. एकीने तर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार मुंबईतदेखील झाला. पुण्यातही नाराजी नाट्य सुरूच होते. नागपुरात असे तमाशे झाले नाहीत, तरी अनेकांनी भराभर राजीनामे द्यायला सुरुवात केली, तर अनेकांनी बंडखोरीदेखील केली. दुसर्या दिवशी म्हणजेच बुधवारीदेखील हे तमाशे सुरूच होते. तिथे काही कार्यकर्त्यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. एका महिला कार्यकर्तीने एका नेत्याच्या मुस्काटात हाणली. काही ठिकाणी उमेदवारी नाकारलेले उमेदवार चक्क कार्यालयातच उपोषणालाही बसले. एकूणच पार्टी विथ अ डिफरन्स म्हणणार्या भाजपच्या अब्रूच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या गेल्या. साधारणपणे उमेदवार एकच असतो. मात्र, त्या जागेसाठी किमान 10 जण इच्छुक असतात. अशावेळी सर्वांशी चर्चा करून सामंजस्याने एकाला उमेदवारी दिली तर तोडगा निघू शकतो. मात्र, भाजपामध्ये जे काही घडले त्यात तक्रारी अशा येत होत्या की, वर्षानुवर्षे पक्षासाठी जे झिजले त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्या उपर्यांना उमेदवारी दिली जात आहे आणि निष्ठावंतांना डावलले गेले आहे. याचे चांगले उदाहरण म्हणजे नाशिकमध्ये नुकतेच शिवसेनेतून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले सुधाकर बडगुजर यांना तर उमेदवारी दिलीच, पण त्यांच्या परिवारातील अजून दोघांना उमेदवारी दिली. चार पक्ष फिरून आलेले राहुल नार्वेकर यांच्या परिवारातीलही तिघांना उमेदवारी दिली गेली. हा प्रकार फक्त मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येच घडला असे नाही, तर बहुतेक सर्वच महानगरांमध्ये हा प्रकार घडल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. त्या निमित्ताने पदाधिकार्यांवर वेगवेगळे आरोपदेखील केले जात आहेत. निष्ठावंतांना डावलताना निवड समितीतील पदाधिकार्यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली, असा आरोप सरसकट केला जातो आहे. नागपुरातदेखील अशा अनेक तक्रारी कानावर आल्या आहेत.
साधारणपणे ज्या प्रभागात तुम्ही निवासी असता तिथलाच रहिवासी नगरसेवक म्हणून उभा राहत असतो. मात्र, अनेक ठिकाणी सहा-सात किलोमीटर अंतरावर राहणार्या व्यक्तीला दुसर्याच प्रभागातून उमेदवारी दिली गेली. नागपुरात लक्ष्मीनगर भागात असाच प्रकार घडला म्हणून जवळजवळ 40 पदाधिकार्यांनी एकत्रितपणे पक्षाचे राजीनामे दिले. एका महिलेला ती लग्नानंतर राहत असलेल्या परिसरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर तिचे माहेर असलेल्या प्रभागातून उमेदवारी दिली गेली. इथे आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही तक्रार केली गेली.
1999 नंतरच्या कालखंडात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाले. शिवसेनेतून आलेल्या प्रवीण दरेकर यांनाही विधान परिषदेत चक्क विरोधी पक्षनेतादेखील केले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघांना ताबडतोब विधान परिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केले गेले. मात्र, माधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे वर्षानुवर्षांपासूनचे निष्ठावंत तसेच दुर्लक्षित राहिले. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमधून आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे वाढते प्रस्थ बघून तीन पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या छोटू भोयरला शेवटी पक्ष सोडून काँग्रेसचा आधार घ्यावा लागला. यात दुर्दैवाची बाब अशी की, भाजपची मातृसंस्था असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हादेखील त्यांना आवरू शकलेला नाही. या सर्व प्रकारात दहा निष्ठावंतांपैकी एकाला उमेदवारी दिली असती तर बाकीच्यांनी कदाचित सामंजस्याने घेतले देखील असते, मात्र दहाही जणांना डावलून एखाद्या बाहेरून आलेल्या परक्याला डोक्यावर घेतले गेले. त्यामुळे कार्यकर्ते जास्त दुखावले हा मुद्दादेखील नाकारता येत नाही. भाजपच्या स्थापनेपासून किंवा मग अगदी सुरुवातीपासून जे भाजपशी जुळले आहेत, तेच पक्षाशी अखेरपर्यंत निष्ठावंत राहू शकतात. दुसर्या पक्षात आपली सोय लागली नाही म्हणून जे भाजपात आले आहेत, ते दीर्घकाळ टिकतीलच याची खात्री नसते, याचे अनुभवदेखील भारतीय जनता पक्षाने घेतलेले आहे. काँग्रेसमध्ये जमले नाही त्यावेळी नाना पटोले भाजपमध्ये आले. तिथे काही काळ राहून ते परत काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. तोच प्रकार अमरावतीच्या सुनील देशमुख यांचादेखील झाला. स्वार्थ संपला की परत निघून जातात. मात्र, भाजपामध्ये अशाच नेत्यांना पायघड्या घातल्या जातात हे इथे दुर्दैवाने नमूद करावे लागते. त्यामुळेच मग अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
भाजपमध्ये ही अंतर्गत अस्वस्थता गेल्या काही वर्षांपासून सुरूच होती. मात्र, यावेळी या अस्वस्थतेचा भडका उडालेला दिसतो आहे. त्यामुळेच असे तमाशे झाले आहेत. ठिकठिकाणी नेत्यांचे फोटो फाडले. त्यांच्या गाडीला काळे फासले. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग केला गेला. त्यांना घेराव घातला. त्यांच्या नावाने शिमगा केला. असे प्रकार भाजपमध्ये प्रथमच होत आहेत आणि ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर होत असल्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. अजूनही भाजप नेतृत्वाने सर्वच संबंधितांना विश्वासात घेऊन हे चित्र कसे बदलता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. जर आधीच सर्वांना विश्वासात घेऊन नेतृत्वाने प्रभागश: चर्चा केली असती आणि सर्व सहमतीने निष्ठावंतांमधूनच एक निवडून उमेदवार ठरवले असते, तर इतका गोंधळ झाला नसता. हे कार्पोरेटायझेशन टाळले असते तर असा भडका उडाला नसता हे निश्चित.
आज सर्वांनीच लक्ष घालून परिस्थिती सुधारली तर भाजपची पार्टी विथ अ डिफरन्स ही ओळख कायम राहील. अन्यथा भाजपची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, हा धोका सर्वांनीच लक्षात घ्यायला हवा.
Maharashtra BJP's spectacle सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…