संपादकीय

महाराष्ट्रच खचलाय

अहमदाबादमध्ये गेल्या गुरुवारी (दि.12) एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पायलट, क्रू मेेंबर्स मिळून महाराष्ट्रातील 18 नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर रविवारी (दि. 15) सकाळी केदारनाथ येथील गौरीकुंड परिसरात दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्यावर काळाने झडप घातली. रविवारीच दुपारी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील पूल कोसळून चार जण मृत पावले, तर अनेक पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. मागील आठवड्यातील या विविध दुर्घटनांमुळे महाराष्ट्र हा मनाने पूर्णतः खचला आहे. राज्यातील एकेकाळचा शूर मावळा आता स्वतःला असुरक्षित समजत आहे. निसर्ग आणि तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यांचा काळजीपूर्वक वापर केला तर त्या वरदान ठरतात. मागील वर्षी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्राची मान लज्जेने खाली झुकली. ज्या महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांना किल्ल्यांंमध्ये रूपांतरित केले, त्यांचे बुरूज, भिंती शेकडो वर्षांनंतर आजही अंगावर ऊन, वारा, पाऊस झेलत दिमाखात उभे आहेत. त्याच महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा मात्र वर्षभरदेखील दिमाखाने उभा राहू शकत नाही, ही घटना महाराष्ट्रातील खचलेली नीतिमत्ता दर्शविण्यास पुरेशी आहे. त्याजागी पुन्हा नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतर्‍याच्या बाजूची जमीन आता वर्षभराच्या आतच खचली आहे. ‘कणखर देशा महाराष्ट्र देशा’ ही बिरुदावली मिरवणारा महाराष्ट्र राजकारणातील चढाओढीमुळे आधीच रसातळाला गेला आहे. ‘हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावून गेला’ अशी एकेकाळी ज्या महाराष्ट्राची ओळख दिल्लीच्या राजकारणात केव्हाच पुसली गेली आहे. महाराष्ट्रातील ब्याऐंशी वर्षांचे तरुण नेतृत्व आता सत्तेसाठी आघाडीच्या कुबड्या शोधत आहे. मुलगी की पुतण्या या वादात त्याचा पक्षातील राष्ट्रवाद हरवल्याने जानता राजाही खचला आहे. हिंदुहृदयसम्राटांच्या पक्षाचीदेखील तीच अवस्था आहे. या पक्षाचे नेतृत्व नक्की कोणाकडे, या संभ्रमात शिवसैनिक आहेत. ठाकरेशाही, शिंदेशाहीत महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवशाहीला मुकला आहे. राज्यात पुन्हा शिवशाही उदयास यावी म्हणून मनोमिलनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ‘राज की बात’ ओढावर येताना दिसत नाही. मुलाखतीमधून मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येऊ म्हणणारे हॉटेलच्या चार भिंतीत सख्खे सोडून पळत्याच्या मागे लागले आहेत. राजकारणातून राष्ट्रहित जोपासले तर जातच नाही; परंतु नातेगोते, मैत्रीलाही स्थान नाही. राजकारणातील सामाजिक पाया कधीच खचला असून, अर्थकारण आणि गुन्हेगारीच्या पायावर सध्याचे राजकारण टिकून आहे. मतदारांनी आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. तुटपुंजा निधी जाहीर करून सरकारने सर्वांनाच लाडके करून ठेवले आहे. रेशनवर महिनाभर पुरेल एवढे गहू आणि तांदूळ मिळत आहे. भ्रांत आहे ती केवळ भाजीचीच. शेतकर्‍यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत असल्याने तो प्रश्नदेखील मिटला आहे. एकवेळचे जेवण व भाजीसाठी शेतातून रोजंदारी करणारा मजूर आता मिळेनासा झाला आहे. कारण सरकारने त्याची राहण्यापासून ते जेवणापर्यंतची सोय करून ठेवली आहे. त्यामुळे अंगमेहनतीची कामे करण्यास तो आता तयार होत नाही. हाताला काम मिळावे ही त्याची गरज राहिली नाही, तर हातातील मोबाईल ही त्याची गरज बनली आहे. मोबाईलच्या विश्वात तो आपली स्वप्ने शोधताना दिसत आहे. रोजंदारी हा विषय त्यांच्यासाठी इतिहासजमा झाला आहे. भाकरीत त्याला पूर्णचंद्र दिसत आहे. सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढे नोकरीसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करूनही त्यांना वेळेत नोकरी मिळत नसल्याने त्यांचे वय उलटून जात आहे. उच्चशिक्षित असूनही त्यांना नोकरीमुळे छोकरी मिळेनाशी झाली आहे. त्यातून राज्याचा सामाजिक पाया खचत चालला आहे. बळे बळे राजा बनवलेला शेतकरी निसर्गाचा आणि सरकारी नीतीचा बळी ठरला आहे. शेतात त्याला देव नाही, तर त्याचा मृत्यू दिसत आहे. शासनाला लाडकी बहीण, भाऊ यांची चिंता आहे. मात्र, या राजाला शेतातील राजवैभव प्राप्त करून देईल अशी चांगली योजना सरकारकडे नाही. त्याला कर्जमाफी नको मात्र, त्याने पिकवलेल्या शेतमालाचा दर ठरविण्याचा अधिकार हवा आहे. घरात अंधार असला तरी चालेल; परंतु शेतशिवार फुलविण्यासाठी विजेची गरज आहे. नुकतेच दारूचे भाव वाढले. पण कोणीही आंदोलनाची हाक दिली नाही. शेतकर्‍याच्या शेतमालाला किमान भाव मिळावा यासाठी आंदोलन करावे लागत आहे. योग्य भाव मिळाला तर जनता रस्तावर उतरत आहे. सरकारच्या नीतीमुळे शेतीचा पायाच खचला आहे. ग्रीन झोनचे यलो झोनमध्ये रूपांतर होऊन काळ्या मातीत सिमेंटची पांढरी जंगले उभारली जात आहेत. या जंगलांमधील मानव प्राणी दिवसेंदिवस हिंस्त्र बनत चालला आहे. पवित्र समजल्या जाणार्‍या नात्यांंमधून आता रक्ताचे पाट वाहत आहेत. माणुसकीचा थाट आता प्राण्यांनाही लाजवत आहे. फास्टफुडच्या जमान्यात अनेक जीव भूतलावरून लुप्त होत आहेत. सरकार आता म्हणते नव्याने सर्व उभारू. गरज भासेल तिथे डागडुजी करू. पण हे उशिराचे शहाणपण काय कामाचे? दुर्घटना घडून गेल्यावर काय काय सावरायचे? सरकारला सत्ता सावरण्यातून वेळ मिळाला तर तेे देश सावरू शकतील. राज्यात आज मावळ्यांचे नाही, तर टोळ्यांचे राज्य आहे. त्यांना देशसेवेची नाही, तर सत्तेची हाव आहे. महाराष्ट्र खचला तरी चालेल, त्यांची सत्ता खचली नाही पाहिजे. सत्तेसाठी त्यांनी पक्ष नाही, देशच विक्रीला काढला आहे. छप्पन इंचाची छातीही खचली आहे.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago