विधान परिषदेवर महायुतीचेच वर्चस्व

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरणांच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने दणदणीत यश संपादन केले आहे. एकूण 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर विजय मिळवत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, विरोधी महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत सहा जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 11 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत महायुतीने दहा जागांवर विजय मिळवला. नाशिकमध्ये मात्र अपक्ष उमेदवाराने बाजी मारत अनपेक्षित निकाल दिला आहे.

नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांचा पराभव झाला. या पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली. शिंदे गटात गेलेल्या आष्टीकरांच्या मुलाला फक्त 84 मते पडली. इथे अशोक चव्हाण यांचे खास असलेले भाजपचे उमेदवार अमर राजूरकर यांनी मोठा विजय मिळवला.
नांदेडच्या या जागेसाठी आधी काँग्रेसच्या रामदास पाटील सोमठाणकर यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार नागेश पाटील आष्टीकरांचे सुपुत्र कृष्णा आष्टीकर हे इच्छुक होते. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या रामदास पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली आणि महाविकास आघाडीकडून कृष्णा आष्टीकर हे अधिकृत उमेदवार झाले होते.

11 मतदारसंघांमधील विजयी उमेदवार

नांदेड : अमर राजूरकर, नागपूर (पोटनिवडणूक): डॉ. राजीव पोतदार, भंडारा- गोंदिया : भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर- जालना : सुहास शिरसाट, परभणी- हिंगोली : शिवसेनेचे सईद खान, जळगाव : नंदकिशोर महाजन, सांगली-सातारा : धैर्यशील कदम, सोलापूर : राजेंद्र राऊत, धाराशिव- लातूर – बीड : बसवराज पाटील, अमरावती : प्रवीण पोटे (सर्व भाजप). मात्र, नाशिक या मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) यांचा पराभव करत विजय मिळवला.

बिनविरोध निवडून आलेले सहा उमेदवार
निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच सहा जागांवर एकच वैध अर्ज राहिल्यानेे उमेदवार आधीच बिनविरोध घोषित झाले होते. वर्धा- गडचिरोली- चंद्रपूर : अरुण लखानी (भाजप), पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस), ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना), रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना), अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप). या निकालांमुळे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल बदलणार आहे. महायुतीचे सभागृहातील स्थान भक्कम झाले आहे.

Mahayuti Dominates the Legislative Council

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *