सोग्रसजवळ पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटली

चांदवड शहरासह 44 गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत

चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सोग्रस फाट्याजवळ खोदकाम सुरू असताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने चांदवड शहर आणि परिसरातील 44 गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांसमोर तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
सोग्रस परिसरात महामार्गालगत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान यंत्राचा धक्का मुख्य जलवाहिनीला लागला आणि ती फुटली. या वाहिनीद्वारे चांदवड शहरासह 44 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ही जलवाहिनी
फुटल्याने परिसरातून पाण्याचे पाट वाहू लागले आणि पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी झाली. माहिती मिळताच प्रशासनाने पुढील नासाडी रोखण्यासाठी तातडीने पाणीपुरवठा बंद केला. मात्र, यामुळे संपूर्ण परिसरातील नळांना पाणी येणे बंद झाले.
विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी (22 मे रोजी) चांदवडमधील उड्डाणपुलाच्या कामादरम्यानही याच मुख्य जलवाहिनीला फटका बसला होता. वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे संबंधित यंत्रणा आणि खोदकाम करणार्‍या ठेकेदारांच्या बेजबाबदार कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

युद्धपातळीवर दुरुस्तीचे प्रयत्न

घटना समजताच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाने पाणीपुरवठा पुन्हा कधी सुरू होईल, याचा निश्चित कालावधी जाहीर केला नसला तरी यंत्रणा यावर काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Main water pipeline bursts again near Sogras.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *