पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न, एकास मारहाण; लाखोंचा ऐवज लंपास

श्वान पथकाकडून तपास
उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी साहेबराव तुपलोंढे यांच्यावर निफाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचारण केलेल्या श्वान पथकाने चोरट्यांचा माग धारणगाव रस्त्यावरील जनता विद्यालयापर्यंत काढला आहे. गुरव तपास करत असून, आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निफाड : विशेष प्रतिनिधी
नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या नैताळे शिवारात गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ते सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यांपैकी दोन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. तसेच चोरीला विरोध करणार्या एका वृद्धाला दगडाने मारहाण करून जखमी केले.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चार ते पाच चोरट्यांनी माजी सरपंच दादा बाबूराव बोरगुडे यांच्या वस्तीवर डल्ला मारला. घरातील सदस्य झोपलेले असताना चोरट्यांनी खोल्यांचे दरवाजे बाहेरून बंद केले आणि ओसरीत ठेवलेल्या पेट्यांमधून दीड तोळे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिवरे रस्त्यावरील धनंजय बोरगुडे व शंकर कवडे यांच्या वस्तीकडे वळवला, मात्र तेथे यश आले नाही.
रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी नवनाथ बोरगुडे यांच्या वस्तीवर चोरीचा प्रयत्न केला. यावेळी शौचास गेलेल्या अभिषेकच्या धाडसामुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला. यानंतर नामदेव घायाळ यांच्या वस्तीवर कुत्रा भुंकल्याने कुटुंबीय जागे झाले. चोरट्यांचा डाव फसला.
पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी नैताळे-गाजरवाडी रस्त्यावरील साहेबराव तुपलोंढे यांच्या वस्तीवर कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. त्यांनी बेबीबाई तुपलोंढे यांची दीड तोळ्याची सोन्याची पोत, दोन तोळ्यांचे टॉप्स, तीन तोळ्यांचे मणीमंगळसूत्र, अंगठी, चांदीच्या तोरड्या आणि 70 हजारांची रोकड असा ऐवज लंपास केला. साहेबराव यांनी विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. चोरट्यांनी धारणगाव रस्त्याच्या दिशेने पलायन केले. निफाड पोलिसांची महामार्गावर रोज गस्त असते. बोरगुडे वस्तीवर चोरी झाल्यावर ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला. पोलीस तातडीने तेथे पोहोचले तोपर्यंत चोरटे शिवरे रस्त्याला पोहोचले होते. तिथे फोन आल्यावर पोलीस तिकडे धावले, तोपर्यंत चोरट्यांनी गाजरवाडी रस्त्यावरील तुपलोंढे वस्तीवर चोरी करून मारहाण केली. तेथून फोन गेल्यावर पोलीस पोहोचण्यापूर्वीच चोरटे धारणगाव रस्त्याने पसार झाले. शिवारातील चारही रस्त्यांवर पहाटेपर्यंत हा चोर-पोलिसांचा खेळ सुरू होता.
Thieves’ daring spree in Naitale area